Total Pageviews

Saturday, 24 January 2015

जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी

स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. त्यानिमित्त….. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यु फोर्मोसा या राष्ट्रीय चीनच्या तैपहे या विमानतळावर 18 ऑगस्ट 1945 रोजी रात्री 11.30 ला तेथील हॉस्पिटलमध्ये झाला हे वृत्ती बी.बी.सी.ने दिले होते परंतु 1942 च्या डिसेंबरमध्ये आणि 1943 मध्ये असे दोनवेळा बी.बी.सी.ने नेताजींच्या मृत्युचे वृत्त दिले होते. ते वृत्त खोटे ठरल्यामुळे बोस बंधू आणि त्यांच्या मातोश्री यांनी 1945 चे वृत्त कधीच मान्य केले नाही. त्यांच्या भावनांचा आदर म्हणून भारत सरकारनेही कधीही नेताजींच्या मृत्यूचा आग्रह धरला नाही. त्याचा राजकीय फायदा घेण्याचाच आजवर प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय चीन, भारत यांचे राजकीय संबंध आजही नाहीत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 14 ऑगस्ट 1945 च्या रात्री 10 वा. जगाला व भारतीयांना उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात आझाद हिंद रेडिओ स्टेशनमधील ध्वनीफित उपलब्ध असून मी स्वतः हे भाषण ऐकलेले आहे. त्यांच्या आवाजात निर्धार व पूर्ण धैर्य होते. ते म्हणाले, “आमच्या दोस्त राष्ट्राचा पराभव झाला आहे. आझाद हिंद फौजेचा पराभव झाला नाही. वेळ येताच आम्ही पुन्हा युद्ध सुरु करू व भारत स्वतंत्र करू.’’ 1945 च्या 14 ऑगस्टच्या रात्री प्रगट केलेली नेताजींची भारत स्वातंत्र्याची इच्छा पंडित नेहरूनी नेताजींचीच स्मृती म्हणून 15 ऑगस्ट 1947 हा दिवस निवडला हे भारतीयांनी विसरू नये. स्वातंत्र्याचा ठराव ब्रिटीशांनी 7 जून 1947 लाच केलेला होता ही वस्तुस्थिती आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्ता येथील आपल्या निवासातून 16 जानेवारी 1943 रोजी रात्री पठाणाच्या वेशात टॅक्सीने लखनौला गेले. तेथून पुढे ते रेल्वेने लाहोरला गेले आणि नंतर मोटारीने खैबर खिंडीतून सुरक्षितपणे अफगाणमार्गे जर्मनीला गेले. याबद्दल कुणाचेही दुमत नाही. परंतु इंग्रजांच्या नजरकैदेतून सुमारे 60 सी.आय.डी घराभोवती असूनही त्यांच्या बंधूनी सुभाषचंद्र बोस गायब झाल्याची पोलीस कम्प्लेन्ट 25 जानेवारी 1943 ला केली. त्यामुळे बी.बी.सा.r व टाइम्स यांनी ‘पक्षी पिंजऱयातून उडाला’ असे वृत्त 26 जानेवारीला दिले हे जगजाहीर आहे. जरी 1930 मध्ये काँग्रेसने 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन घोषित केला होता तरी पंडित नेहरू आणि घटना समितीने प्रजासत्ताक दिन हा नेताजींचा स्मृतीदिन म्हणूनही स्वीकारला या गोष्टीला का महत्त्व देत नाहीत समजत नाही. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे नेताजींचे स्मृतीदिन आहेत आणि त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नेताजींची दुर्दम्य इच्छा होती की आझाद हिंद फौजेने लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवावा आणि तीच इच्छा 15 ऑगस्ट 1947 पासून आपण दरवर्षी पूर्ण करीत आहोत. नेताजींची विजयी घोषणा ‘जय हिंद’ ही लाल किल्ल्यावरून प्रथम पं. नेहरूंनी त्रिवार केली ना? त्यात नेताजींचे प्रेम, देश प्रेम, आदर्श या गोष्टी येतात. आजही भारतीय तिन्ही दलाचे सैनिक व अधिकारी एकमेकांना अभिवादन ‘जय हिंद’ या विजयी घोषणेने करतात. आझाद हिंद सरकारचा तिरंगा ध्वजच आमचा राष्ट्रध्वज आहे हे नेताजींचेच स्वप्न होते. पंडित जवाहरलाल नेहरूनी 15 ऑगस्ट 1947 च्या मंत्रिमंडळात ‘आझाद हिंद’ सरकारच्या नेताजींच्या सर्व मंत्र्यांना स्थान दिलेले होते. नेताजींच्या आझाद हिंद फौजेतील सर्व आठ हजार सैन्याला पेन्शन दिली गेली हे काही शत्रुत्वाचे लक्षण नव्हे. नेताजींच्या आझाद हिंद सरकारची (नेताजींची) खुर्ची बँकाकमधून आणून सन्मानाने राष्ट्रपती भवनात ठेवून मोठे चिरंतन स्मारक केले असून ते ‘भारत रत्न’ खुर्ची रूपाने राष्ट्रपती भवनात आहे. दिल्लीच्या ज्या लाल किल्ल्यात कै. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर इंग्रजांनी देशद्रोहाचा खटला चालविला त्या इमारतीच्या उजव्या बाजूला तीन मजली मोठी इमारत बांधून त्यात नेताजींच्या एकूण एक वस्तू, त्यांचे ड्रेस, पाकिट, पेन, चष्मा, बूट, सैन्याचे रजिस्टर, मिनिस्टरांचे पुतळे मांडून त्यांच्यात जिवंतपणा आणला आहे. एक अद्वितीय असे हे कै. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे लाल किल्ल्यातील संग्रहालय स्वतःच्या डोळय़ांनी पहावे आणि तर्कटाचे खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये, तरुण पिढीत द्वेषाचे बी पेरू नये अशी नम्र विनंती आहे. जपानची शरणागती हिंदची नव्हे एस. ए. अय्यर यांनी आपल्या ‘अन्टू हिम विटनेस’ या पुस्तकात पाचव्या प्रकणात तेव्हाचे हुबेहूब वर्णण केले आहे. मलायातील सेरांबानला नेताजी भेट देते होते. डॉ. लक्ष्मय्या आणि श्री गणपती यांनी 12 ऑगस्टला मोटारीने तातडीने येऊन जपान शरण आल्याची विदारक बातमी त्यांना सांगितली. परंतु नेताजी अविचलित राहिले. ते म्हणाले, जपानची शरणागती म्हणजे हिंदुस्थानची नव्हे त्यांना 14 तारखेच्या संध्याकाळी ए. एन. सरकार बँकॉकहून येऊन मिळाले. त्यांनी जनरल दुसोदा आणि जपानी मिनिस्टर हाचिआ यांच्याकडून निरोप आणला होता की, शक्यतो मलाया व सयामहून पुढे पूर्वेकडे नेताजीनी निघून जावे म्हणजे ते ऍग्लो अमेरिकन सैन्याच्या हाती पडणार नाहीत. शेवटी ठरले की त्यांनी मलायातून रशियन मुलखात आणि शक्य तर खुद्द रशियात जावे आझाद हिंद सैन्याने जपानी सैन्याच्या भाग म्हणून किंवा स्वतंत्र म्हणून शरण जावे हा मोठा प्रश्न होता. स्वतंत्र म्हणूनच शरण जावे असा नेताजींचा बेत होता मि. किटाझावा (जपानी पार्लेमेंट सभासद) यांची कमिटीने साक्ष घेतली. त्यांनी सांगितले की जपान सरकारने सगळय़ा राज्यांच्या प्रमुखांना आसरा देण्याचे ठरविले होते. नेताजींनी या सूचनेचा फायदा घेतला की नाही ते माहीत नाही कारण त्यांना लढा चालवायचा होता. त्यांना जपान आसऱयासाठी फार लहान राष्ट्र वाटत होते. नेताजी 16 ऑगस्टला बँकॉकला आले होते. त्यांना जपान सरकारने शरण जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले म्हणून त्यांनी रशियाशी संबंध ठेवण्याचे ठरविले. त्याकरिता त्यांनी टोकिओला जाऊन जपान सरकारशी विचारविनिमय करावा व मांचुरियातून रशियाला जपान सरकारच्या मदतीने जावे असे ठरले. वेळ नव्हता, धांदल चालली होती. रशिया त्यांना कैद करील नंतर ते हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकरिता लढत असल्याची खात्री करून देतील व रशियाची मदत मिळवतील अशी त्यांच्या कार्याची दिशा. कर्नल हबिबूर रहिमान, मेजर अबिद हसन, कर्नल गुलझारासिंग, कर्नल प्रितमसिंग, मि. देवनाथ दास आणि एस. ए. अय्यर यांना बरोबर येण्यास नेताजींनी सांगितले होते. पण चीफ ऑफ द जनरल स्टाफ जनरल जगन्नाथराव भोसले यांना आझाद हिंद सैन्यासाठी मागेच ठेवण्यात आले. त्यांना नेताजी म्हणाले होते की नेताजी रशियात जात आहेत. परंतु जपान सरकारबरोबर पुन्हा वाटाघाटी करणार होते. जपान शरण आले, त्यानंतर 2 दिवसपर्यंत नेताजी अनिश्चित स्थळाकडे प्रवास करीत होते. खरोखरच ती अंधारात उडी होती आणि यातून ते कधीच परत आले नाहीत. नेताजींच्या मृत्यूचे भांडवल नको. त्यांच्या देशभक्तीला इतिहासात तोड नाही. ते भारतरत्नचे खरे मानकरी आहेत. -प्रभाकर कुलकर्णी

No comments:

Post a Comment