March 12, 2017
बुधवारी उत्तरप्रदेशातील शेवटची मतदानाची फेरी पार पडायची होती आणि त्याच्या आदल्या दिवशीच राज्याची राजधानी लखनौच्या जुन्या भागात एक भयंकर थरारक नाट्य रंगले होते. ठाकुरगंज भागातील एका घरात इसिस नामक जिहादी संघटनेचा सैफुल्ला नावाचा अतिरेकी दबा धरून बसला होता. त्याच दिवशी मध्यप्रदेशात एका रेल्वेगाडीत घातपात झाला होता आणि त्यात गुंतलेला असा हा जिहादी होता. त्याचे सहा साथीदार पकडले गेले होते आणि मध्यप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने तत्परता दाखवली होती. त्यांनी विनाविलंब सैफुल्लाच्या अड्ड्याचा शोध लागला व त्या जागेला चहूकडून वेढा दिलेला होता. साहजिकच तिथून निसटणे सैफुल्ला याला अशक्य झाले होते. पण तो एकटाच किल्ला लढवल्यासारखा पोलिसांशी खेळत राहिला. पोलिसांनी त्याला शरण येण्यास संधी दिली होती. त्याच्या नातलगांना शोधून समजूतही घालण्याचे प्रयास केले होते. शक्य तितके त्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न पोलिस करीत होते. त्यासाठी घरात अश्रुधूर सोडूनही त्याला बेजार करण्याचा डाव खेळून झाला होता. पण सैफुल्लाच्या डोक्यावर शहीद होण्याचे भूत बसलेले होते. म्हणूनच अखेर कमांडो घरात घुसल्यावर त्याने गोळीबार करून जणू आत्महत्याच केली. हे नाट्य एव्हाना माध्यमातून लोकांना कळलेले आहे. पण त्याची योग्य पार्श्वोभूमी लोकांना समजू शकलेली नाही. आता सैफुल्ला कसा खतरनाक जिहादी होता वा त्याच्यापाशी कोणते स्फोटक साहित्य मिळाले; त्याची वर्णने सांगितली वा छापली जातील. पण त्याची खरी प्रेरणा वा प्रोत्साहक कोण आहेत, त्याविषयी मौन राखले जाईल. इसिस वा अन्य कोणी धर्मांध मौलवी हा सैफुल्लाचा पाठीराखा नाही. त्याचे खरे पाठीराखे पुरोगामी दिवाळखोर लोक आहेत. त्यांच्यामुळे अशा प्रवृत्ती देशात दिवसेंदिवस बोकाळत गेल्या आहेत.
उत्तरप्रदेशचे मतदान संपत आले असताना ही घटना घडली. पण त्याच विधानसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सुरक्षेचा विषय काढलेला होता. उत्तरप्रदेशात गुन्हेगारी व कायदा व्यवस्थेचा विषय मोदींनी आपल्या प्रचारात काढला होता. त्यात त्यांनी कानपूर येथील रेल्वे अपघातात जिहादी घातपाताचा संशय असल्याचे विधान केले होते. त्यावरून तथाकथित पुरोगाम्यांनी गदारोळ केला होता. रेल्वे अपघातात घातपात असल्याचे सिद्ध झालेले नसल्याने, त्याचा उल्लेख प्रचारात वापरताना मोदी धार्मिक धृवीकरण करीत असल्याचे आरोप झाले होते. पण मंगळवारच्या घटनेमुळे मोदींच्या आरोपावरच सैफुल्लाने शिक्कामोर्तब केले. त्याच दिवशी मध्यप्रदेशात रेल्वेमध्ये घातपात झाला होता आणि पोलिसांनी अतिशय तत्परतेने त्याचा माग काढला होता. यातला एक आरोपी उत्तरप्रदेशात निसटल्याची सुचना मिळताच लखनौ येथील पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने दाखवलेली चपळाई कौतुकास्पद आहे. यांनी काही तासातच सैफुल्लाने दडी मारलेली जागा शोधून काढली व त्या जागेला वेढा दिला होता. नंतरचे नाट्य जगाने बघितले व ऐकलेले आहे. पण जी गोष्ट त्यातून सिद्ध झाली, तसे काही नसल्याचा दावा करणार्यां चे मुखवटे कधी फाटणार आहेत? ते मुखवटे कोणी फाडायचे आहेत? पंतप्रधानांवर धृवीकरण केल्याचा आरोप करणारे आता कशाला गप्प आहेत? आता त्यांनी तितक्याच आवेशात पुढे येऊन आपली चूक मान्य करायला नको का? सैफुल्ला वा त्याचे सहकारी इसिसच्या जिहादी हेतूंना साकार करण्यासाठी घातपात करीत होते. रेल्वेत अपघात घडवत होते, यालाच यातून पुष्टी मिळाली आहे. पण मग जे कोणी मोदींवर धृवीकरणाचा आरोप करीत होते, ते कोणाला प्रोत्साहन देत होते? कोणाला पाठीशी घालत होते? असे पुरोगामित्व मिरवणारेच सैफुल्लाचे खरे आश्रयदाते नाहीत काय?
देशात गेल्या दोन दशकात जागोजागी जिहादी हिंसा वा तत्सम बहकलेल्या मुस्लिम तरुणांची संख्या वाढते आहे. त्याचे खापर पाकिस्तानातील सईद हाफीज वा इराक सिरीयातल्या अबु अल बगदादीवर फोडले जाते. पण त्यांचा इथल्या बहकलेल्या मुस्लिम तरुणांशी तसा थेट संपर्क सिद्ध होऊ शकत नाही. अशा तरुणांना सोशल माध्यमातून जी माहिती मिळत असते, त्यातून ते बहकत जातात. पण बहकण्यासाठी माणूस आधी हळवा किंवा अस्वस्थ असावा लागतो. त्याला अस्वस्थ वा हळवा बनवण्याचे पाप इथले तथाकथित पुरोगामी करीत असतात. सातत्याने मुस्लिमांवर अन्याय होतो आहे वा मुस्लिमांना भारतात पक्षपाती वागणूक मिळते आहे, असला प्रचार जे कोणी करतात, तेच मुस्लिम तरुणांना धर्माच्या दिशेने अधिक हळवे बनवीत असतात. अशा मानसिकतेमध्ये गेलेला तरुण मग अधिकाधिक धर्माच्या आहारी जातो आणि त्याच दिशेने वाटचाल सुरू झाली, म्हणजे पुढला मार्ग त्याला इसिस वा तोयबाच्या संकेतस्थळावर किंवा गुगल संशोधनातून सापडत जातो. त्यात बहकलेला तरुण हाती लागला, मग पोलिस त्याचे धागेदोरे शोधत असतात. तेव्हा तपास होण्याआधीच त्यात राजकीय हस्तक्षेप सुरू होतो. कुठलाही पुरावा नसताना मुस्लिम मुलांना सतावले जात असल्याचे पुरोगामी आरोप सुरू होतात. त्यामुळे अधिक मुस्लिम तरुण अस्वस्थ होतात आणि दुसरीकडे पोलिस व सुरक्षा यंत्रणांनाही सावधपणे हालचाली कराव्या लागतात. त्यांचे खच्चीकरण होते आणि तितकी पोषक स्थिती जिहादींसाठी निर्माण होत जाते. सैफुल्ला त्याचेच उदाहरण आहे. अनेक महिने त्याची टोळी या ठाकुरगंज भागात वास्तव्य करून होती आणि आसपासच्या रहिवाशांनाही त्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिसही त्यांचा माग काढू शकलेले नव्हते. ही स्थिती इसिसच्या बगदादीने निर्माण केलेली नाही, तर इथल्या दिवाळखोर पुरोगाम्यांनी निर्माण केलेली आहे.
इसिसचा बगदादी वा तोयबाचा हाफ़ीज मोदींच्या उत्तरप्रदेशातील भाषणावर आक्षेप घ्यायला आला नव्हता. त्यांनी तर मोदींच्या त्या भाषणाची दखलही घेतलेली नाही. पण त्यावर काहूर माजवणारे इथलेच तथाकथित प्रुरोगामी आहेत. मोदींनी रेल्वेत घातपात होतात, म्हटल्यावर झोड उठवणारे आता कुठल्या बिळात वा घरात दडी मारून बसले आहेत? सैफुल्ला याला लपलेल्या जागेतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी मिरची बॉम्ब वा अश्रुधूर सोडला होता. जेणे करून त्याने घुसमटून बाहेर पडावे. पण आता या घटनेनंतर आपापल्या बिळात लपलेल्या पुरोगाम्यांना बाहेर काढायला कुठला अश्रुधूर सोडला जाणार आहे? मोदी धृवीकरण करतात, असे ओरडून ज्यांनी सैफुल्ला वा तत्सम लोकांना सातत्याने पाठीशी घातले आहे; त्यांचा बंदोबसत कोणी करायचा? भारतातल्या जिहादी घातपातांना कुठली मुस्लिम संघटना जबाबदार नाही, इतके इथले पुरोगामी घातपाती जबाबदार आहेत. कारण त्यांनीच मुस्लिमांना बहकावणे व चिथावण्या देण्याचे पाप सातत्याने चालविले आहे. त्यामुळे धर्मांध मुस्लिम अशीही समस्या नाही. भारतातले खरे जिहादी पुरस्कर्ते व आश्रयदाते आता पुरोगामीच होऊन बसले आहेत. तसे नसते तर मोदींच्या रेल्वे घातपाताच्या भाषणाला पुरोगाम्यांनी मुद्दा बनवला नसता. कुठल्याही मुस्लिम संघटनेने तसा आक्षेप घेतला नव्हता. पण तेच निमित्त करून पुरोगाम्यांनी मोदींना लक्ष्य केले होते. अशा जिहादी पुरोगामित्वाच्या मुसक्या कायदा कसा बांधणार, ही खरी समस्या वा संकट आहे. कारण बगदादी वा हाफीजपेक्षा खतरनाक हे लोक झाले आहेत. सैफुल्लाने आपल्या कृतीने त्यांना चपराक हाणली आहेच. पण त्याहीपेक्षा उत्तरप्रदेशचा तरुण मुख्यमंत्री अखिलेशच्याच पोलिसांनी त्यालाच खोटा पाडला आहे. सैफुल्ला याला लखनौमध्येच कोंडीत पकडणारे पोलिस अखिलेशच्याच सरकारचे आहेत ना
No comments:
Post a Comment