धोका आहे, सावधान! (अग्रलेख)
दिव्य मराठी | Mar 09, 2017, 03:05 AM IST
धोका आहे, सावधान! (अग्रलेख)
भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये बाँबस्फोट होणे व लखनऊमध्ये इसिसचा एक संशयित दहशतवादी चकमकीत मारला जाणे, या वेगवेगळ्या घटना दिसत असल्या तरी त्यामागे इसिससारखी कडवी संघटना असल्याचे पुढे येणे हे चिंताजनक आहे. भारताला इसिससारख्या संघटनेकडून कोणताही धोका नाही, असे काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांनी वक्तव्य केले होते. पण वास्तव तसे नाही. उलट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी, भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये झालेल्या बाँबस्फोटामागे इसिसच असून स्फोटानंतरचे फोटो सिरियात पाठवण्यात आले होते, असा दावा केला आहे. पोलिसांनीही इसिस संघटनेच्या ज्या काही उपसंघटना आहेत, त्यापैकी ‘खोरासान मॉड्यूल’मार्फत हे दहशतवादी कृत्य घडवण्यात आल्याचे म्हटले आहे. खोरासान हा अफगाणिस्तान - पाकिस्तान सीमेवरील भाग आहे आणि तेथे नव्याने आता दहशतवादी प्रशिक्षण तळ चालवले जात असल्याचे सांगितले जाते. या दहशतवाद्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्याचे, बाँबस्फोट घडवून आणण्याचे कट शिकवले जातात व सोबतीला पाकिस्तान-अफगाणिस्तानचे काही दहशतवादी अशा मोहिमांमध्ये सामील होतात, अशी माहिती पुढे आली. ही माहिती नवी आहे, कारण आजपर्यंत इसिसकडून थेट दहशतवादी कारवाया देशात घडल्या नव्हत्या. ज्या दहशतवादी कारवाया झाल्या होत्या त्यामागे पाकस्थित दहशतवादी संघटनांचा हात असायचा. महत्त्वाचा भाग असा की, अमेरिका-इराकी फौजांनी जवळपास नेस्तनाबूत केलेल्या इसिसचा उरलासुरला अजेंडा नेणारी जी काही मॉड्यूल जन्माला येत आहेत त्यापैकी हे खोरासान मॉड्यूल आहे. भविष्यात अशा उपसंघटना मुख्य संघटनेपेक्षा अधिक सक्रिय होऊन कडव्या ठरू शकतात. कारण त्यांचे कार्यक्षेत्र सीमित असू शकते व त्यांना आर्थिक मदत सहज मिळू शकते. अशी मॉड्यूल्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापरही करू शकतात. खोरासान मॉड्यूलमधील दहशतवादी इन्स्टाग्राम या मेसेजिंग अॅपमार्फत आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क ठेवत असल्याची माहिती बाहेर आली आहे. हे अॅप रशियात तयार केले असून त्यातून माहिती काढून घेणे अथवा ती चोरणे अतिशय कठीण अाहे. भारतात व्हॉट्सअॅप व फेसबुकचे ग्राहक अधिक आहेत. त्या तुलनेत इन्स्टाग्राम फारसे लोकप्रिय नाही. असे हे अॅप इसिसकडून मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. हे सगळे चित्र पाहता इसिसची नवी मुळं शोधताना भारतीय सुरक्षा यंत्रणांना अधिक दक्ष राहावे लागणार आहे. त्यात इराक व सिरियात घडणाऱ्या घटनांबाबत अधिक चौकस असण्याची गरज आहे.
गेल्या आठवड्यात इसिसचा गड समजल्या जाणाऱ्या मोसूल शहरातील काही भाग इराकी फौजांनी ताब्यात घेतला. त्यात तैग्रीस नदीचा काही भाग आहे. २०१४ मध्ये हेच शहर इसिसच्या दहशतवाद्यांनी सुमारे ६० हजार इराकी सैनिकांना मागे रेटून जिंकले होते. त्या वेळी मोसूलवरचा विजय ईश्वरी संकेत असल्याचा भावनिक प्रचार इसिसकडून जगभर केला गेला. अत्याधुनिक असे इराकी सैन्य तेवढ्याच ताकदीच्या दहशतवादी संघटनांकडून हरू शकते. यावरून इसिस संघटना भविष्यात जगाला धोकादायक ठरू शकते, असे अंदाज त्याच वेळी लावण्यात आले होते. ते कालांतराने खरे ठरत गेले. मोसूलच्या विजयानंतर इसिसने इराकचा उत्तर भाग व सिरिया यामध्ये इतकी आगेकूच करून तेथे जम बसवला होता की त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी युद्धाशिवाय अन्य पर्याय शिल्लक नव्हते. एकीकडे इसिसचे वाढते वर्चस्व व सिरियातील यादवी शिगेला पोहोचल्यानंतर अमेरिका, रशियाने त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उडी घेऊन इसिसचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली. त्याला दोन-अडीच वर्षांनंतर यश मिळू लागल्याचे दिसू लागले आहे. त्यात सिरियातील असाद सरकारने महत्त्वाचे अलेप्पो शहर ताब्यात घेतल्याने इसिसला जबर धक्का बसला. तरीही इसिसकडे जवळपास चार हजार असे कडवे सैनिक, कमांडर आहेत की त्यांचा गनिमी युद्धाचा अनुभव इराकी व मित्रराष्ट्रांच्या सैन्यासाठी डोकेदुखी ठरणारा आहे. इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने गेल्या आठवड्यात मोसूल आपल्या ताब्यातून जात असल्याची खंत व्यक्त केली होती; पण त्याने आपला ईश्वरी संदेश घेऊन घरोघरी लढाई लढण्याचे सामर्थ्य संघटनेकडे असल्याचेही म्हटले होते. अर्थात बगदादीची ताकद यापुढे वाढेल, अशी शक्यता आंतरराष्ट्रीय राजकारणातील वारे पाहता सध्या दिसत नाही. पण इसिसचा कडवा इस्लामी राष्ट्रवाद दिसावा यासाठी छोट्यामोठ्या दहशतवादी कारवाया जगभर दिसू शकतात. अमेरिकेतील ट्रम्प सरकार इसिसविषयी किती कठोर भूमिका घेते यावरही बरेचसे या संघटनेचे भवितव्य आहे. आपल्याला मात्र धोका आहे.
No comments:
Post a Comment