इ
२०१२ च्या निवडणूकांमध्ये ६० जागांपैकी ४२ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता
मणिपूरमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मणिपूर विधानसभेच्या एकूण ६० जागांसाठीचे मतदान ४ आणि ८ मार्च अशा दोन टप्प्यात पार पडले. दोन दिवसांपूर्वीच आलेल्या मतदानोत्तर चाचणीचे कौल हा जरी भाजपच्या बाजूने झुकला असला तरी सुरूवातीच्या टप्प्यातील मतमोजणीत हे चित्र पालटताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना येथे पाहायाला मिळत आहे. दोन्ही पक्षात चुरशीचा सामना दिसत आहे. ६० जागांपैकी ३० जागांचे कल हाती येत असून भाजप १०, काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने दोन जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेस एका जागेवर विजयी आहे. भाजप आणि काँग्रेसबरोबरच सगळ्यांचे लक्ष लागून होते ते इरोम शर्मिला आणि मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्या लढतीकडे. दोघेही थौबल येथून निवडणूक लढवत होते. पण शर्मिला यांच्यावर मात करत इबोबी विजयी झाले आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार शर्मिला यांना फक्त ८० ते १०० च्या आसपासच मते मिळाली आहेत. इरोम शर्मिला यांचा पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स अजूनही पिछाडीवरच दिसत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. ओकराम इबोबी सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने सलग तिस-यांदा विजय मिळवला आहे. अनेक राज्यातून काँग्रेसला हद्दपार करण्यात भाजपला यश आले आहे, तेव्हा ईशान्यकडल्या आणखी एका राज्यात ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. तेव्हा भाजपचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. तर दुसरीकडे मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हटवण्याच्या मागणीसाठी तब्बल १६ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला या देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यातच त्यांनी पिपल्स रिसर्जंस अॅण्ड जस्टिस अलायन्स पक्षाची स्थापना केली आहे. इबोबींचे सरकार आपल्याला पाडायचे आहे अशा निश्चय त्यांनी केला पण यात त्यांना अपयश आले. ६० पैकी ६ जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. ५६ वर्षीय नॉन्गथोमबाम बीरेन मणिपूर विधानसभा निवडणूकामध्ये भाजपचा चेहरा असणार आहे. गेल्याच वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तर भाजपत आले होते.
मणिपूरमधली सत्तेची गणिते थोडी वेगळी आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाला ३१ जागांची गरज आहे. २२ आणि ३८ जागा अशा दोन टप्प्यात मतदान झाले होते. मतदानाचा टक्का पाहता दोन्ही टप्प्यांत ८०% च्या वर मतदान झाले. मणिपूरमधल्या ६० जागांपैकी २२ जागा या डोंगराळ भागातल्या तर ३८ जागा या घाटावरच्या भागातल्या आहेत. डोंगराळ भागात नागा लोक राहतात, तर घाटावर मेताई समाजाची वस्ती आहे. त्यामुळे साहजिकच या निवडणूकांमध्ये मेतई समाजाचा दबदबा आहे. या राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ६३ टक्के जनता ही मेतई समाजाची आहे, इबोबी हे देखील मेतई समाजाचे आहे. याचाही फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.
एकीकडे काँग्रेसच्या काळात या राज्याचा विकास खुडला असे अनेक आरोप मोदींनी केले. तेव्हा पारदर्शक कारभाराच्या जोरावर भाजप निवडून येईल का हे पाहण्यासारखे ठरेल. २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये ६० जागांपैकी ४२ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला ७, नागा पीपल्स फ्रंटला ४ जागांवर यश मिळता आले होते. पण यावेळी मात्र काँग्रेसला केवळ १७-२३ पर्यंत जागा मिळू शकतात, तर भाजपला २५-३१ पर्यंत जागा मिळून त्यांची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे इंडिया टूडे-अॅक्सिसच्या सर्व्हेत मणिपूरमध्ये काँग्रेसलाच सर्वाधिक मतं मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसच्या बाजूने ४२ टक्के, तर भाजपला ३१ टक्के मतं मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसच्या खात्यात ३० ते ३६ जागा, तर भाजपला १६-२२ जागा मिळू शकतात
No comments:
Post a Comment