2017017
वास्तव
प्राध्यापक जी. एन. साईबाबा निर्दोष आहे… पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे… अपंग प्राध्यापकावर पोलिस अत्याचार करीत आहे. त्याचा माओवादी संघटनांसोबत कुठलाही संबंध नाही… नक्षली कारवायात त्याचा सहभाग नाही… अशी एक ना अनेक विधाने साईबाबाला अटक केल्यानंतर नक्षलवाद्यांनी आणि त्यांच्या फ्रंटल संघटनांनी केली होती. एकप्रकारे त्याचा नक्षल चळवळीशी संबंध न जोडता पोलिसांनाच खोटे पाडण्याचा डाव नक्षल्यांनी रचला होता. मात्र, आता त्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्याच्या शिक्षेच्या विरोधात हेच नक्षलवादी आणि त्यांच्या फ्रंटल संघटना उघडपणे समोर आल्या आहेत. याबाबत त्यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून साईबाबाच्या शिक्षेचा निषेध केला आहे. साईबाबाच्या समर्थनार्थ २९ मार्च रोजी नक्षलवाद्यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. एकप्रकारे प्रा. साईबाबासोबत संबंध असल्याची कबुलीच नक्षलवाद्यांनी दिली असल्याचे बोलले जात आहे.
नक्षलवाद्यांशी थेट संबंध आणि अनेक हिंसक घटनांचा मास्टरमाईंड असलेल्या प्रा. साईबाबाला गडचिरोली पोलिसांनी ९ मे २०१४ रोजी दिल्ली येथून अटक केली होती. याबाबत गडचिरोली येथील सत्र न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध तीन वर्षे खटला चालला. यादरम्यान साईबाबाला सर्वोच्च न्यायालयातून जामीनसुद्धा मिळाला. अखेर पोलिसांनी सादर केलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारावर ७ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रा. जी. एन. साईबाबा, हेम मिश्रा, प्रशांत राही, महेश तिरकी, पांडू नरोटे यांना आजन्म कारावासाची, तर विजय तिरकी याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेच्या विरोधात नक्षलवाद्यांच्या भामरागड एरिया कमिटीने एटापल्ली आणि भामरागड या भागात पोस्टर्स लावली आहेत. यात जी. एन. साईबाबासह त्याच्या पाच सहकार्यांना न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसेच या सर्वांची तत्काळ सुटका करावी, या मागणीसाठी नक्षलवाद्यांनी शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ मार्च ते २९ मार्च या कालावधीत विरोध सप्ताह आणि २९ मार्च रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. सुरवातीला साईबाबासोबत संबंध नाकारणार्या नक्षलवादी आणि त्यांच्या फ्रंटल संघटनांनी आता त्याचे थेट समर्थन केल्याने नक्षलवाद्यांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
साईबाबाला अटक झाल्यानंतर त्याचा नक्षल चळवळीसोबत संबंध न जोडता पोलिसांची कारवाई कशी खोटी आहे, हे सांगण्यासाठी अनेक मानवाधिकार संघटना सुरुवातीपासूनच सक्रिय राहिल्या. एवढेच नाही तर तपास अधिकारी सुहास बावचे यांना ९० देशांमधून २० हजारांच्या वर साईबाबाच्या अटकेच्या विरोधात पत्रे आली होती.
यात अमेरिका, रशिया, कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन, चीन आदी देशांतील पत्रांचा समावेश होता. २३ मे २०१५ रोजी दिल्लीमध्ये कमिटी फॉर डिफेन्स ऍण्ड रिलीज ऑफ प्रो. जी. एन. साईबाबा या संघटनेने साईबाबाच्या अटकेच्या विरोधात निदर्शने केली. यात विविध फ्रंटल संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच संघटनेने नंतर देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. याचाच भाग म्हणून १८ जून २०१५ रोजी नागपूर येथील संविधान चौकात प्रा. साईबाबा आणि त्याच्या सहकार्यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. ग्रीन हंट मोहीम मागे घ्या, सैन्य विशेषाधिकार कायदा (आस्फ्पा), बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (युएपीए) रद्द करा, अशा मागण्यासुद्धा यावेळी करण्यात आल्या होत्या. साईबाबाला युएपीए कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे ११ मार्च २०१७ रोजी मुंबई येथे काही संघटनांनी युएपीए कायदाच रद्द करण्याची मागणी केली. साईबाबाच्या सुटकेची थेट मागणी केली, तर शासनापुढे आपल्या हालचाली उघड होतील त्यामुळे युएपीए कायद्याला विरोध करून तो रद्द करण्यासाठी या संघटनांनी पुढाकार घेत निदर्शने केली. तर गत आठवड्यात १७ ते १९ मार्च २०१७ दरम्यान नागपूर, गडचिरोली आणि आरमोरी येथे साईबाबाच्या सुटकेसंदर्भात दबाव वाढविण्यासाठी काही समर्थकांच्या हालचाली आणि गुप्त बैठका घेण्यात आल्याची माहिती आहे. १८ मार्च २०१७ रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सीताराम येचूरी यांनी नागपूर येथे आवाहन करताना म्हटले की, माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे. सशस्त्र क्रांतीचा मार्ग योग्य नाही. लोकशाहीच्या प्रवाहातूनच सर्वांगीण विकास शक्य आहे.
मात्र, कडव्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी सुरुवातीपासूनच म्हणजे १९८० च्या दशकापासूनच हिंसाचाराचा अवलंब केला आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम जी. एन. साईबाबासारख्या अनेक पांढरपेशे नक्षलवादी सातत्याने करीत आहेत. म्हणूनच ९ मे २०१४ रोजी दिल्लीहून साईबाबाला अटक केल्यानंतर दोनच दिवसांनी ११ मे २०१४ रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी ब्लास्ट घडवून आणला. यात ७ जवान शहीद झाले होते. आता ७ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने साईबाबाला शिक्षा दिल्यानंतर लगेच छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी हिंसाचार घडवून आणला. यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) १२ जवान शहीद झाले.
गत आठवड्यात दंतेवाडा येथेसुद्धा नक्षली हल्ल्यात २ जवान शहीद, तर एटापल्ली जांभियागट्टा येथे फॉरेस्ट गार्ड जनकलाल कुंजम याची नक्षलवाद्यांनी हत्या केली. १९८० पासून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत आतापर्यंत जवळपास सातशे लोकांच्या हत्या केल्या आहेत. ९ मे २०१४ रोजी दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या जी. एन. साईबाबाला ४ एप्रिल २०१६ रोजी वैद्यकीय कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतरही त्याच्या विचाराच्या संघटनांनी ४ एप्रिल २०१६ ते ९ मार्च २०१७ यादरम्यान गडचिरोलीत हिंसक कारवायांचे सत्र सुरूच ठेवले. यादरम्यान एकूण ७२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात २२ नागरिकांचा मृत्यू, तर २ पोलिस जवान शहीद झाले. हिंसक कारवायांचा मास्टरमाईंड असलेल्या साईबाबाच्या समर्थनार्थ नक्षलवाद्यांनी आणि त्यांच्या फ्रंटल संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता त्यांचे हे मनसुबे उधळून लावावे, असे पोलिस विभागाचे आवाहन आहे.
४ नक्षलवादाचे आव्हान Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5660308543730989926?BookName=Nakshalvadache-Avhan:-Chinche-Bhartashi-Chhupe-Yuddha
माओवादाचे आव्हान पार्ट २ (google play)
https://play.google.com/store/books/details/%E0%A4%AC_%E0%A4%B0_%E0%A4%97_%E0%A4%A1_%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%B9_%E0%A4%AE_%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9_%E0%A4%9C%E0%A4%A8_Maovadache_Awhan?id=8R_-DAAAQBAJ&hl=en
No comments:
Post a Comment