Total Pageviews

Saturday 11 March 2017

मेजर अमित देस्वाल पत्नी नीता, पतीच्या निधनास दोन महिने झाल्यानंतर लगेच ३३व्या वर्षी लष्करातील भरतीच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली.तीन वर्षांचा आपला मुलगा अर्जुन यास त्यांनी आपल्या आईवडिलांकडे पाठवून दिले. चेन्नई येथील अकादमीत त्यांना अत्यंत कठोर असे प्रशिक्षण -LOKSATTA


देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झालेल्या जवान वा अधिकाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस हा कसोटीचा असतो. काश्मीर वा ईशान्य भारतात ते तैनात असतील तर कधी अतिरेकी हल्ला होईल याची काहीच शाश्वती नसते. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी अतिरेक्यांना शोधून काढण्याची लष्कराची ‘हिफाजत’ ही मोहीम चालू असताना अचानक अतिरेक्यांनी अत्याधुनिक रायफलींमधून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात मेजर अमित देस्वाल हे शहीद झाले आणि त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. आपल्या दिवंगत पतीची आठवण काढत अश्रू ढाळत बसण्यापेक्षा त्यांची पत्नी नीता यांनी पतीच्या पावलावर पाऊल टाकत लष्करात दाखल होण्याचा निश्चय तेव्हाच केला होता. आता त्यांचे स्वप्न पूर्ण होत असून पुढील महिन्यापासून नीता देस्वाल यांचे लष्करी अधिकाऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण सुरू होईल. गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी मणिपूरच्या नुंग्बा येथील घनदाट जंगलात अतिरेकी लपले असून ते मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. अतिरेक्यांना जेरबंद करण्यासाठी राष्ट्रीय रायफल्स तसेच विशेष पथकाने जंगलात त्यांचा शोध सुरू केला. या पथकात मेजर अमित देस्वाल यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. गर्द झाडीत दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत देस्वाल यांना वीरमरण आले. अवघ्या ३८व्या वर्षी देशाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला. अमित हे हरयाणाच्या झज्जर जिल्ह्य़ाचे रहिवासी असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांची पत्नी नीता यांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी देऊ केली होती. पण नीता यांनी ती विनम्रपणे नाकारली. ‘माझे पती सदैव राष्ट्रभक्ती आणि देशसेवेबद्दलच बोलत. त्यांचे अपूर्ण राहिलेले काम सचिवालयाच्या वातानुकूलित दालनात बसून पूर्ण करता येणार नाही. माझा आतला आवाज मला याची परवानगीही देणार नाही. लष्करातील आयुष्य कितीही खडतर आणि कठीण असले तरी मलाही आता सैन्यदलातच जायचे आहे’ असा निर्धार त्यांनी केला. यासाठी तीन वर्षांचा आपला मुलगा अर्जुन यास त्यांनी आपल्या आईवडिलांकडे पाठवून दिले. पतीच्या निधनास दोन महिने झाल्यानंतर लगेच त्या आसाममधून दिल्लीत आल्या. ३३व्या वर्षी लष्करातील भरतीच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली. आपल्या पतीने ज्या अॅ कॅडमीतून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेथेच त्यांनी प्रवेश घेतला. दररोज दहा ते बारा तास अभ्यास त्या करत. लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे नीता यांची ‘शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन’साठी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. काही वर्षे तरी त्यांना आता देशसेवा करता येईल. या आधी त्या जोऱ्हाटमधील लष्कराच्या शाळेत समन्वयक होत्या. डेहराडूनच्या राहणाऱ्या नीता या विज्ञानातील पदवीधर आहेत. पतीच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यांनी पाठिंबा दिलाच, पण अमित यांच्याबरोबर असलेल्या अधिकाऱ्यांनीही माझा आणि मुलाचा सांभाळ केला. मी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला त्याला येथील चांगले वातावरण व चांगले अधिकारी हेही एक कारण आहे, असे त्या सांगतात. आता चेन्नई येथील अकादमीत त्यांना अत्यंत कठोर असे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. लेफ्टनंटपदाचा गणवेश परिधान करून जेव्हा देशाच्या सेवेसाठी मी सज्ज होईन तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा राहील आणि तीच दिवंगत पतीला माझी श्रद्धांजली राहील, असेही महिलादिनी नीता यांनी सांगितले..

No comments:

Post a Comment