Total Pageviews

Monday 22 August 2016

सिरियाला इसिसमुक्त करण्याच्या मोहिमेचा आरंभ-वसंत गणेश काणे,


सिरियाला इसिसमुक्त करण्याच्या मोहिमेचा आरंभ सिरियाच्या अलेप्पो शहरावर करण्यात आलेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर इमारतीच्या ढिगार्याीखालून वाचविण्यात आलेल्या एका चिमुकल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मुळात कोणतेही युद्ध वाईटच. त्यातही जेव्हा युद्धात निष्पापांचे बळी जातात, तेव्हा तर ते फारच वेदनादायी असते. सध्या सिरियातून इसिसला हद्दपार करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून रशियाची विमाने सिरियातील इसिसच्या तळांवर हल्ले चढवीत आहेत. त्यापैकी एका हल्ल्यात ही हृदयद्रावक घटना घडली असावी. इराकमधून इसिसला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर आता सिरियामधून इसिस आणि साथीदारांविरुद्ध मोहीम सुरू झाली असून रशियाची बॉम्बफेकी विमाने इराणमधील विमानतळांवरून मध्य सिरियाच्या दिशेने झेप घेत आहेत. परस्परपूरक कारवाई - या निमित्ताने इराक, इराण व रशिया यात निर्माण झालेला सहयोग जसा महत्त्वाचा आहे, तसाच एकमेकावर सतत गुरगुरत असलेल्या अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि रशिया यांनी वेगवेगळे राहून पण इसिसला मात द्यायचीच या उद्देशाने केलेली पृथक पण परस्परपूरक कारवाई वेग घेईल, अशी चिन्हे दिसत आहेत. चीन तटस्थ आहे किंवा नुसती तोंडपाटीलकी करतो आहे. कारण इसिस आज ना उद्या आपल्यालाही जड जाणार आहे, हे चीनलाही कळून चुकले आहे. थोडक्यात असे की, जगातील सर्व महाशक्ती आपापसातले मतभेद विसरून किंवा निदान या विषयापुरते तरी तात्पुरते बाजूला सारून एकाच उद्देशाने सरसावलेले दिसत आहेत. असे दृश्य जगाच्या इतिहासात फार कमी वेळा पाहावयास मिळाले असेल. वर्षभर चाललेल्या चर्चेच्या गुर्हाीळाल यश : या कारवाईबाबत रशिया व अमेरिका यात जवळजवळ एक वर्ष चर्चेचे गुर्हा ळ सुरू होते. रशियाची अचानक समजूत पटली आणि रशियाची बॉम्बफेकी विमाने सिरियातील अलेप्पो या शहरातील अतिरेक्यांच्या तळावर आग ओकू लागली. आता या मोहिमेला अधिक वेग आला आहे. भौगोलिकदृष्ट्या सिरिया व रशिया यातील अंतर अमेरिका व सिरिया यातील अंतराच्या मानाने खूपच कमी आहे. त्यामुळे रशियाचा सहभाग या मोहिमेत महत्त्वाचा आहे. सोबतीला सिरिया सरकारचीही विमानेही आहेत, त्यामुळे दोघेही हे यश आपलेच असल्याचा दावा करीत आहेत. इराणने आजवर आपले तळ वापरण्याची अनुमती अन्य राष्ट्रांना दिल्याची नोंद आढळत नाही. मध्यपूर्वेतील देशांमधले इतर देशांचे तळ वापरून रशियानेही आजवर सिरियावर बॉम्बहल्ला केल्याची नोंद नाही. सिरियाचे अध्यक्ष बशर असाद यांच्या समर्थनार्थ ही मोहीम सुरू आहे. शीर्षस्थ स्तरावरील एकोप्याचा परिणाम : अतिरेकी हल्ल्यामुळे जायबंदी झालेल्या सिरियाला मदत करण्याचा निर्णय मास्को व तेहरान (इराणची राजधानी) येथील शीर्षस्थ नेत्यांनी घेतल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सोबतीला आता वॉशिंग्टनही आहे. या तिघांपैकी कुणाकुणांमधून एकेकाळी विस्तव जात नसे, हे पाहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये कसे व कोणते बदल केव्हा होतील, याचे अनुमान करणे किती कठीण आहे, ते जाणवेल. बगदाद (इराकची राजधानी), तेहरान ( इराणची राजधानी) मास्को व वॉशिंग्टन या ठिकाणच्या शीर्षस्थ नेत्यांचे एकमत होताच तृणमूल पातळीवरही (ग्रासरूट लेव्हल) संक्रांत साजरी होत आहे. आपापली विमाने केव्हा, कुठे व किती उंचीवरून उड्डाण करीत आहेत, हे परस्परांना पुरेसे अगोदर कळवून आपापसातल्या टक्करी टाळण्याची खबरदारी मनापासून घेतली जात आहे. इसिस व समविचारी गट यांच्याविरुद्ध कारवाई करणे कसे आवश्यक आहे व त्याशिवाय कसे गत्यंतर नाही, हे या चौघांना मनापासून पटल्याची ही चिन्हे आहेत. इराण, सिरिया व रशिया आणि इसिस विरोधी गट हेही एकत्र आले आहेत. अमेरिकेने इराणवरील बंधने उठवल्यानंतर इराणवरचा गुपचूप अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न सुरू असल्याचा आळ दूर झाल्यामुळेच हे शक्य झाले आहे. इराणचे तळ वापरता येत असल्यामुळे रशियाचा युद्धखर्चही कमी झाला आहे. पायदळाला कूच करता यावे म्हणून : इसिस आणि मित्रगटांच्या ताब्यात असलेला प्रदेश अजून ताब्यात आलेला नाही. पण त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे उध्वस्त झाले आहेत, प्रशिक्षण केंद्रे समूळ नष्ट झाली आहेत, मोहिमेवर नियंत्रण ठेवणारी मुख्यालये बेचिराख झाली आहेत. आता रणगाडे व तोफखाने यांच्या छत्राखाली पायदळाला आगेकूच करताना फारशी मनुष्यहानी सहन करावी लागणार नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून इसिसमध्ये फूट पडली असून त्यातील एक गट एकीकडे रशियाशी, तर दुसरीकडे अमेरिकेशी संधान बांधण्याच्या प्रयत्नात आहे. पण या दोघांनीही त्यांना अंगावरील झुरळ झटकून टाकावे तसे झिडकारले गेले आहे. इसिसच्या समान संकटाचा धोका ओळखून छोटी-बडी राष्ट्रे आपापसातले वैर विसरून निदान आजतरी एकत्र आली असून संक्रांतीचे वातावरण दिसते आहे. पण संक्रांतीनंतर शिमगा येतो, तसे होऊ नये, अशी शांतताप्रेमी जनतेची ईश्व्रचरणी प्रार्थना असणार. त्यांच्या हाती अशी प्रार्थना करण्याशिवाय दुसरे असणार तरी काय? ‘फेटो’चा नवा धोका? तुर्कीत सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न नुकताच फसला. तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलुत कावूसोग्लू यांनी एक नवेच रहस्योद्घाटन केले आहे. तुर्कीत बंड करणार्याा फतुल्लाह गुलेन टेररिस्ट ऑर्गनायझेशनने (फेटो) भारतासह अनेक देशांमध्ये छुप्या मार्गाने प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत भेटीवर आले असताना, त्यांनी हे विधान केले आहे आणि आमच्या देशाने भारताला आधीच सतर्क केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रामुख्याने फेटो ही भारतात विविध संघटनांच्या बुरख्याखाली कारवाया करण्याच्या प्रयत्नात आहे आणि काही शाळांमध्येही त्यांनी घुसखोरी केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. भारतासह ज्या ज्या देशात फेटोचा वावर आहे, अशा सर्व देशांनी फेटोला आपल्या देशांच्या हद्दीतून हाकलून लावावे, अशी सूचनाही तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली आहे. भारताने या माहितीची आधीपासूनच दखल घेतली असून, त्यावर विविध गुप्तवार्ता संस्थांकडून कामही सुरू झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले आहे की, तुर्कीच्या माहितीची आम्ही अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. आज जगात दहशतवाद या ना त्या रूपात वाढत आहे. या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांची माहिती आणि त्यांच्या कारवायांच्या माहितीचे आम्ही सातत्याने आदानप्रदान करीत आहोत. आंतरराष्ट्रीय जाणकारांचा कयास आहे की, फेटो या संघटनेचा इसिससोबत संपर्क आहे. इसिसवर चोहोबाजूने हवाई आणि जमिनी हल्ले होत असल्यामुळे त्यांनी आपली व्यूहरचना बदलली आहे. गेल्या सहा महिन्यात विविध देशांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत इसिसचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर नवनव्या दहशतवादी संघटनांची दखल आतापासूनच घ्यायला हवी, असे संरक्षणविषयक जाणकारांचे मत आहे. तुर्कीकडून आलेल्या इशार्या ने मात्र भारताची आणखी डोकेदुखी वाढविली आहे. पेन्सिलव्हॅनिया, अमेरिका

No comments:

Post a Comment