Total Pageviews

Saturday, 13 August 2016

एक गाव : योद्ध्यांंचं!


एक गाव : योद्ध्यांंचं! सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. अनेक युद्धाच्या जखमा अंगावर लेऊन बाळोबांचा खडतर प्रवास चालला होता. उनाडक्या करणारी गावातली पोरं बघितली की, मनाचा संताप व्हायचा- ‘‘लेकहो, उनाडक्या करत काय फिरता, जा जरा दांडपट्‌टा शिका. तलवारी हातात घ्या. लढाईवर जा. शौर्य गाजवा. देशाला गरज आहे तुमच्यासारख्या शूर शिलेदारांची.’’ बाळोबांचे ते शब्द मनावर घेऊन शौर्य सिद्ध करायला काही पोरं सरसावली अन् मग सुरू झाली एक परंपरा- शौर्याची...! गावातली नंतरच्या पिढीतली पोरं ती परंपरा आजही जपताहेत अन् बाळोबांच्या स्मृतीही! नंतरच्या काळात गावकर्‍यांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या एका मंदिरात स्थापना झालीय् ती बाळोबांच्या पादुकांची. सातत्याने शत्रूंशी लढलेल्या बाळोबांना संतपदही बहाल केले ते गावकर्‍यांनीच. मंदिरात ठेवलेल्या श्रीविष्णूच्या मूर्तीला अभिषेक घातला की, या पादुकांनाही आपोआपच अभिषेक घडतो... पण, गावकर्‍यांचा संकल्प फक्त पादुकांना अभिषेक घालण्याचा नाही, तर त्यांनी सांगितलेला मंत्र अंगीकारून इथली तरुणाई अजूनही शौर्याचे प्रदर्शन करते आहे. उनाडक्या केव्हाच मागे पडल्या. आता ध्येय एकच- देशासाठी लढण्याचे. जगायचेही देशासाठीच अन् मरायचे तेही देशासाठीच! या परंपरेतूनच हे आता वीर योद्ध्यांंचं गाव झालं आहे. त्याचा इतिहासही तसाच आहे- रोमांचक, प्रेरणादायी अन् धमण्यांतले रक्त सळसळायला लावणारा. बेरोजगारीच्या नावाने शंख करणार्‍या इतर ठिकाणच्या तरुणाईसमोर, आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्याची- जगण्याची आगळी तर्‍हा सादर करणारा. देशात इतरत्र सर्वदूर क्रिकेटचा ज्वर पसरलेला असताना या गावातली पोरं मात्र कुस्त्यांच्या दंगलीत अन् दांडपट्‌टा फिरवून शरीर कमावण्यात रमलेली दिसतात. अंगावरच्या कपड्यांची त्यांची निवडही काहीशी जगावेगळीच आहे. त्यामुळे त्यालाही सैनिकांच्या गणवेशाचा रंग चढलेला दिसतो. तशीही सैनिकी गणवेशाच्या त्या कपड्यांची महिमाच न्यारी आहे. अंगावर नुसता चढवला, तरी स्फुल्लिंग फुलवण्याची ताकद लाभलेली. इथली तरुणाई तर आधीच निर्धार करून बसलेली. त्यात साध्या टी-शर्टवरही सैनिकी बाज चढला की, मग तर विचारायलाच नको! अपशिंगे. सातार्‍याच्या दक्षिणेला १८ किलोमीटर अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव. ८५० घरांचे. लोकवस्ती असेल फारतर आठ-दहा हजारांची. गावातली झाडून सारी माणसं एकाच ध्येयानं झपाटलेली. देशासाठी लढण्याकरिता सज्ज झालेली. या गावातल्या प्रत्येक घरातल्या निदान एकातरी सदस्याने भारतीय सैन्यात योगदान दिले आहे वा आज देत देत आहे. सैन्यात भरती होऊन युद्धात प्राणपणाने लढण्याच्या त्यांच्या जिद्दीमुळेच या गावाला इंग्रजांनी ‘अपशिंगे-मिल्ट्री’ असे नामाभिधान बहाल केले. इंग्रजांच्या वतीने पहिल्या महायुद्धात लढण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या अपशिंगेतील तत्कालीन तरुणांवर चिनी सैनिकांकडून वेढले जाण्याचा आणि चीनच्या कारागृहात दोन वर्षे बंदी म्हणून वावरण्याचा प्रसंगही ओढवलेला. चीन आणि पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात या गावातले तरुण केवळ सहभागीच झाले नाहीत, तर या युद्धात प्राणांची आहुतीही दिलीय् भारतीय सैन्यदलातील इथल्या युवकांनी. १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात चार, १९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात दोन, तर १९७१ च्या युद्धात एक जवान देशासाठी समर्पित केल्याचा इतिहास सांगताना अपशिंगेकरांच्या डोळ्यांत पाणी नसतेच. सार्थ अभिमान व्यक्त करत या शहीदांच्या शौर्याची गाथा मांडतात इथले गावकरी. वेगवेगळ्या युद्धातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे उभारलेली स्मारकं तर नव्या पिढीलाही सैन्यात भरती होण्याची प्रेरणा देतात. बहुधा म्हणूनच की काय, या गावातल्या तरुणांना दुसर्‍या कुठल्या नोकरीची गरज वाटत नाही. कारण आयुष्यात जगायचं ते सैन्यात भरती होण्यासाठीच, असा ध्यास मनाशी बाळगूनच इथली तरुणाई कामाला लागलेली असते. त्यामुळे मुलांची गर्दी कुठे कुस्त्यांच्या दंगलीत रमलेली, तर कुठे कसरतीत व्यग्र असल्याचे चित्र छोट्याशा अपशिंगे गावात बघायला मिळते. त्यामुळे शेतातल्या पिकांपेक्षाही इथल्या मातीतून सैनिक अधिक संख्येत तयार होताहेत! पहिलं महायुद्धच कशाला, अगदी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद सेने’तही अपशिंगेचा सहभाग होता. इथले चार तरुण सुभाषबाबूंच्या सेनेत सहभागी झाले होते. असं म्हणतात की, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या गोतावळ्यातही इथल्या युवकांचा सहभाग होता. लढाऊ राजपुतांचा वारसा चालविण्याचा दावा सांगणारे निकम आडनावाचे लोक या गावात मोठ्या संख्येत आहेत. देशाच्या सैन्यात योगदान देण्याची या गावची परंपरा लक्षात घेत, माऊंटबॅटनपासून तर जनरल करिअप्पापर्यंत बर्‍याच बड्या मंडळींनी अपशिंगेला भेट देऊन त्या अनमोल योगदानाची नोंद घेतली होती. निधड्या छातीनं सीमेवर लढायला निघालेली पोरं तर पोरं, पण त्यांना युद्धात धाडताना मनाची जराही चलबिचल होऊ न देणारी माउलीही मनानं तेवढीच खंबीर असते. पाच दशकांपूर्वीचा तो प्रसंग. अगदी परवा घडल्यासारखा. अद्याप कुणाच्या विस्मरणात न गेलेला... चीनविरुद्धच्या युद्धात नवरा शहीद झाला असल्याचा सांगावा घेऊन पोस्टमन आला तेव्हा मालन गरोदर होती. बातमी ऐकून सारे लोक क्षणभर स्तब्ध झालेले. तिच्या तर पायाखालची जमीनच खचली होती! पण, असं हतबल होऊन चालणार नव्हतं. लवकरच जगात येणार्‍या बाळासाठी बळ एकवटायला हवं होतं. तिनं तेच केलं. नवरा गेल्याच्या दु:खाचं मणभर ओझं उंबरठ्याबाहेर ठेवून वावरण्याला दुसरा पर्यायच नव्हता. काही दिवसांनी बाळंतपणाचे सोपस्कार पार पडले. एक गोंडस बाळ जन्माला आलं. नंतरच्या काळात तिच्या पालनपोषणात रमलेल्या त्या माउलीच्या मनातला, या देशाच्या रक्षणार्थ सीमेवर लढताना प्राण गमावलेल्या नवर्‍याबद्दलचा अभिमान आज ५० वर्षांनंतरही तसूभरही कमी झालेला नाही. आणि या गावाचं कौतुक अशासाठी की, गावकर्‍यांनी एका शहीदाच्या वीर विधवेचा सन्मान जराही कमी होऊ दिलेला नाही. सीमेवर लढलेल्या एका वीर सैनिकाची पत्नी म्हणून मदतीचा हात देत सारे गाव पाठीशी उभे राहिल्याचा अनुभव तीही तेवढ्याच अभिमानाने सांगते. कारण, सैन्यात जाणार्‍या इथल्या पोरांची मायही तेवढीच स्वाभिमानी अन् बायकोही तेवढ्याच खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिलेली. उगाच थोडी या छोट्याशा गावातली निदान पाचशे पोरं आजघडीला सैन्यात दाखल आहेत. सैन्यातून परतलेल्या माजी सैनिकांची संख्या निदान दोन हजारांच्या घरातली. प्रत्येक घरातून निदान एकतरी पोरगं सैन्यात असलेलं हे आगळं गाव आहे. कुटुंबातली दोन्ही पोरं सैन्यात असलेली घरंही कमी नाहीत अन् पिढ्यान्‌पिढ्या सैन्यात दाखल होत असलेली घरंही वानगीदाखल आहेतच. इंग्रजांनी लावलेल्या ‘मिल्ट्री’च्या बिरुदाला धक्का लागणार नाही, याची काळजी गावकरी घेताहेत. खरं तर या गावात कुठलंही सैनिकी प्रशिक्षण केंद्र नाही किंवा अपशिंगेकरांचा हा आगळा छंद जोपासण्याचा आग्रह धरायलाही कुणी नाही. पण, गावातल्याच आजी-माजी सैनिकांकडून धडे घेत नव्या पिढीची जडणघडण सुरू आहे. शिवाय लढण्याची प्रेरणा द्यायला गावातली शहीद स्मारकं आहेतच की...! - सुनील कुहीकर

No comments:

Post a Comment