Total Pageviews

Tuesday, 30 August 2016

चीनला मिरच्या झोंबल्या?-मोदींच्या बलुचिस्तान उल्लेखाने चीन बिथरला आहे

चीनला मिरच्या झोंबल्या? By pudhari भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख आलेला होता. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली तर समजू शकते. कारण आजवर तसा उल्लेख कधी झाला नव्हता; पण मोदींच्या त्या वक्तव्याने भारतातलेच काही शहाणे विचलीत झाले होते आणि आता चीनमध्येही अस्वस्थता दिसू लागली आहे. चीनच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाशी संबंधित असलेल्या एका धोरणकर्त्या संस्थेच्या संचालकाची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. त्यातून मोदींच्या बलुचिस्तान उल्लेखाने चीन किती बिथरला आहे, त्याची साक्ष मिळते. कारण ही संस्थात्मक प्रतिक्रिया चिनी राजकीय मानसिकतेची चाहूल आहे. भारताने बलुचिस्तान विषयात फार मतप्रदर्शन केले, तर चीनला त्यात हस्तक्षेप करावा लागेल, असा इशाराच हु शिशाँग यांनी दिला आहे. तेच दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक आहेत. त्यांची भाषाच चीनच्या अस्वस्थतेचं प्रतीक आहे. चीनच्या झिंगझियांग प्रांताला थेट बलुचिस्तानातील ग्वादार बंदराशी जोडणारा महामार्ग चीन अब्जावधी रुपये ओतून उभारतो आहे. शिवाय ते पाकिस्तानी बंदरही चीनच गुंतवणूक करून बांधून देतो आहे. कारण त्यामुळे दक्षिण चिनी समुद्राच्याच मार्गाने कराव्या लागणार्‍या सागरी माल वाहतुकीवर चीनला अवलंबून रहावे लागणार नाही; पण दोन दशकांपासून काम सुरू असलेल्या या बंदर व महामार्गाचे काम सुरळीत होऊ शकलेले नाही. त्यात सातत्याने जिहादी, बलुची व पख्तूनी बंडखोरांनी व्यत्यय आणलेला आहे. साहजिकच पाकसेनेला तिथे बंदोबस्ताला उभे करून काम चालवावे लागत आहे. तरीही व्यत्यय संपत नसल्याने महामार्गाच्या प्रदेशात आता चिनी लालसेना तैनात करण्यात आली आहे. हा महामार्ग बहुतांश बलुचिस्तान, बाल्टीस्तान व गिलगिट या प्रदेशातून जाणारा आहे. त्याला तिथल्या स्थानिक लोकांनी कडाडून विरोध केला असून, आधी पाकिस्तानचे वर्चस्व नाकारणारे हे गट आता तिथून चीनलाही हाकलण्याची मागणी करीत आहेत. त्याला दाद मिळाली नसल्याने आता त्यांनी विभक्त व स्वतंत्र होण्याची मागणी सुरू केली आहे. त्या मागणीला पाठिंबा व प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. मोदींच्या भाषणातील बलुची आदी स्वातंत्र्य चळवळी व मानवी हक्कांची पायमल्ली यांचा उल्लेख म्हणूनच अतिशय सूचक होता. तेवढ्या नुसत्या शब्दांनी अशा चळवळी चालवणार्‍या पाकिस्तानी असंतुष्टांना हत्तीचे बळ चढले आहे. त्यातून परागंदा झालेल्यांनी जगभरात अनेक जागी निदर्शने आरंभली आहेत, तर खुद्द पाकिस्तानात तशा उठावाला चालना मिळाली आहे. तिथे हस्तक्षेप करण्याची थेट मागणी जगासमोर येऊ लागली आहे. हा नुसता पाकला दिलेला दणका नाही, तर चीनलाही देण्यात आलेला शह आहे. मोदी लाल किल्ल्यावरून काय बोलले व कशासाठी बोलले, त्याचा अर्थ अनेकांना लागला नाही. कारण अशी वक्तव्ये राष्ट्रप्रमुख करतो, तेव्हा त्याचे अनेक संदर्भ असतात. केवळ मनात ऐनवेळी काही आले म्हणून बोलून गेले, असे कधीच होत नाही. वरकरणी निरर्थक वा निरूपद्रवी वाटणार्‍या अशा शब्दात अनेक इशारे व संकेत लपलेले असतात. ते सामान्य माणसाला उमजणारे नसतात, की तर्कबुद्धीने तत्त्वज्ञान मांडणार्‍यांच्या आवाक्यातले नसतात. त्यामागे अतिशय सूक्ष्म स्वरूपाची मुत्सद्देगिरी दडलेली असते. साहजिकच त्यातला इशारा संबंधितांना नेमका समजू शकतो. मात्र त्यासाठी बोलणार्‍याला शब्दात पकडण्याची सोय नसते. पाकिस्तान वा अन्य कुठल्या देशाचे नेते-पंतप्रधान भारतातील मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी अश्रू ढाळत असतील, तर भारताचे पंतप्रधानही अन्य कुठल्या देशातील चिरडल्या गेलेल्या सामान्य पीडितांना सहानुभूती दाखवू शकतात. त्या सहानुभूतीला कोणी राजकीय हस्तक्षेप म्हणू शकत नाही; पण अशा शब्दांनी त्या देशातील असंतोषाच्या आगीत तेल मात्र ओतले जात असते. पाकचा राजदूत काश्मिरी फुटीरवाद्यांना मेजवान्या देत असेल आणि पाकिस्तान बुरहान वानीसाठी ‘काळा दिवस’ साजरा करीत असेल, तर भारताला बलुचिस्तानातील कत्तलीवर अश्रू ढाळण्यात कसली अडचण आहे? पण मुद्दा तिथेच संपत नाही. काश्मिरात कितीही हिंसा झाली तरी भारताच्या विकासकामात कुठला अडथळा येण्याची शक्यता नसते; पण ज्या पाकव्याप्त प्रदेशात सध्या असंतोष उफाळला आहे, त्यातून पाक व चीनसाठी भविष्यातील विकासाची गंगा वाहून आणायची आहे. त्यावर त्या दोन्ही देशांचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणून तिथे असलेला इवलाही असंतोष त्यांच्या संपन्न भवितव्यातली मोठीच अडचण व संकट आहे. त्याच असंतोषाच्या आगीत भारतीय सहानुभूती तेल ओतणारी ठरते आणि मोदींनी नेमके तेच काम स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून केलेले आहे. ज्या वाकुल्या पाक-चीन गेल्या दोन-तीन दशकांपासून भारताला दाखवित आहेत, त्याच भाषेत दिले गेलेले हे पहिले प्रत्युत्तर आहे. म्हणूनच पाकिस्तान रडकुंडीला आला आहेच; पण चीनलाही मिरच्या झोंबल्या आहेत. इथे ग्वादार बंदर व महामार्गात भारतामुळे अडथळे येत आहेत आणि तिकडे दक्षिण चिनी समुद्रात चीनविरोधी आघाडीशी भारताने प्रेमाचे संबंध जोडण्याचा पवित्रा घेतलेला आहे. थोडक्यात, पाकिस्तानातील असंतोषाला चिथावणी देतानाच मोदींनी चिनी गुंतवणूक धोक्यात आणायचे पाऊल काही शब्द वापरून केले आहे. हू शिशाँग यांच्या तोंडून प्रत्यक्षात चिनी परराष्ट्र खात्यानेच त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे लाल किल्ल्यावरून झालेला बलुचिस्तानचा उल्लेख कशासाठी होता, हे हळूहळू अनेकांच्या लक्षात येऊ लागेल.

No comments:

Post a Comment