पुन:पुन्हा तेथे ‘खान’ का जातात?
Saturday, August 13th, 2016
अमेरिकेतील बहुतेक सर्वच मोठ्या विमानतळांवर श्रीमान शाहरुख खानच्या बाबतीत हा ‘हादसा’ वारंवार झाला आहे व तरीही हे सहिष्णू मंडळ अमेरिकेच्या थपडा खाण्यासाठी पुन:पुन्हा त्यांच्या दरवाजात जात आहे. हा ‘काटा’ देशातील त्यांच्या चाहत्यांना सलत आहे. ‘‘तुम्ही माझा असा अपमान करणार असाल तर मला तुमच्या देशात पाऊल ठेवायचे नाही. हा पहा मी निघालो, आल्या पावली परत!’’ असा प्रखर स्वाभिमानी बाणा दाखवून शाहरुख महाशय हिंदुस्थानात परतले असते तर अमेरिकेचेच थोबाड फुटले असते.
अमेरिकेत पुन्हा अपमान!
पुन:पुन्हा तेथे ‘खान’ का जातात?
‘गड्या, आपला गाव बरा!’ असे विचार अभिनेता शाहरुख खानच्या मनात पुन्हा नक्कीच आले असतील व तेदेखील अमेरिकेच्या लॉस एंजलिस विमानतळावर. हिंदुस्थानी ‘बॉलीवूड’मधील ‘मशहूर’ स्टार शाहरुख खान यास पुन्हा एकदा अमेरिकेच्या विमानतळावर तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले. झाडाझडती, चौकशी करून सोडून दिले. शाहरुख खानच्या बाबतीत हे प्रकार वारंवार घडत आहेत. याचे कारण त्याचे ‘माय नेम इज खान!’ हिंदुस्थानात सिनेसृष्टीतील खान मंडळींचा चांगलाच बोलबाला आहे. अनेक राजकीय, सामाजिक व इतर विषयांवर ही मंडळी मतप्रदर्शन करून वाद निर्माण करीत असतात. एका खान महाशयांच्या पत्नीला तर हिंदुस्थानात वाढलेली असहिष्णुता असह्य झाल्याने देश सोडून परदेशात जाऊन स्थायिक व्हावे असे वाटले होते, पण हिंदुस्थानात चमकणार्या या तार्यांचे युरोप-अमेरिकेतील विमानतळांवर जे हाल होतात व त्यांना ज्या अपमानास तोंड द्यावे लागते ते पाहिले की, सगळ्यात जास्त असहिष्णुता युरोप-अमेरिकन मंडळींच्या मनात आहे असेच दिसून येते. गुरुवारी शाहरुख खानच्या बाबतीत लॉस एंजलिस विमानतळावर जे घडले
त्याचा निषेध
हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने करायलाच हवा. ज्या खानांना येथील जनता डोक्यावर घेऊन नाचते त्या खानांचा असा कचरा अमेरिकेच्या विमानतळावर करण्याचा अधिकार अमेरिकन सुरक्षा यंत्रणेला खरोखरच आहे काय? विशेषत: शाहरुख खानच्याच बाबतीत ही असभ्य झाडाझडती पुन:पुन्हा का व्हावी? शाहरुख महाशय हे हिंदुस्थानचेच सन्माननीय नागरिक आहेत व सुरक्षेच्या नावाखाली त्यांना असे ‘उघडे’ करणे अमेरिकेच्या कोणत्या कायद्यात बसते? अमेरिकेतील, घटनेनंतर शाहरुख महाशय दु:खी झाले व त्यांनी सांगितले, ‘‘सुरक्षा व्यवस्थेचा मी सन्मानच करतो, पण प्रत्येक वेळी अमेरिकेच्या इमिग्रेशनमध्ये ‘अटक’ करणे मला काट्यासारखे टोचत आहे!’’ अमेरिकेतील बहुतेक सर्वच मोठ्या विमानतळांवर श्रीमान शाहरुख खानच्या बाबतीत हा ‘हादसा’ वारंवार झाला आहे व तरीही हे सहिष्णू मंडळ अमेरिकेच्या थपडा खाण्यासाठी पुन:पुन्हा त्यांच्या दरवाजात जात आहे. हा ‘काटा’ देशातील त्यांच्या चाहत्यांना सलत आहे. ‘‘तुम्ही माझा असा अपमान करणार असाल तर मला तुमच्या देशात पाऊल ठेवायचे नाही. हा पहा मी निघालो, आल्या पावली परत!’’ असा
प्रखर स्वाभिमानी बाणा
दाखवून शाहरुख महाशय हिंदुस्थानात परतले असते तर अमेरिकेचेच थोबाड फुटले असते व महासत्तेच्या तकलादू सहिष्णुतेचे बिंग फुटले असते, पण आमच्या बॉलीवूडकरांना स्वदेशावर सिनेमे काढायचे असतात व युरोप, अमेरिकेत जाऊन या अशा थपडा खायच्या असतात. वास्तविक खान मंडळींनी यातून एक धडा घेतला पाहिजे तो म्हणजे, ‘‘सारे जहां से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा!’’ शेवटी मातृभूमी हीच माता. अमेरिकेसारखी राष्ट्रे आज मुसलमानांना दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत व प्रत्येक मुसलमानाकडे संशयाने पाहत आहेत. प्रत्येक मुसलमान हा जणू अतिरेकी किंवा लादेनचाच वंशज असल्याप्रमाणे त्याच्याशी अपमानास्पद वर्तन करीत आहेत. डोनाल्ड ट्रम्पसारखे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार तर अमेरिकेतून सर्व मुसलमानांना हाकलून देण्याची गर्जना करीत आहेत. त्यामुळे इतक्या असहिष्णू देशाविषयी बॉलीवूडच्या विचारवंत, सेक्युलर ‘खान’ मंडळींना खरे म्हणजे आकर्षण वाटू नये. हिंदुस्थानातील मुसलमान निदान या अमेरिका प्रकरणातून धडा घेतील व हिंदुस्थानचे गुणगान करतील याविषयी आमच्या मनात शंका नाही. कश्मीरातील तरुण वर्ग सैराट होऊन आज रस्त्यावर उतरला आहे. त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी बॉलीवूडमधील खान मंडळींनी एखादे ‘ट्विट’ करावे. त्याचा निश्चितच फायदा होईल. पहा जमतेय का!
- See more at: http://www.saamana.com/sampadkiya/punpunha-tethe-khan-ka-jatat#sthash.UJUrEotn.dpuf
No comments:
Post a Comment