Total Pageviews

Monday 22 August 2016

बांगलादेशच्‍या वाटेवर बलुचिस्‍तान-By pudhari


बांगलादेशच्‍या वाटेवर बलुचिस्‍तान-By pudhari पाकिस्तान जर जम्मू-काश्मीर आणि भारतात अन्य ठिकाणी दहशतवादाला खतपाणी घालून अस्थैर्य निर्माण करणे बंद करणार नसेल, तर भारतालाही पाकमधील बलुचिस्तान प्रांतातील दडपल्या गेलेल्या स्वातंत्र्यवाद्यांना फुंकर घालण्याचा पर्याय अवलंबावा लागेल, असा सणसणीत इशारा 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला, तेव्हा पाकिस्तानला चांगलाच ठणका बसला! जम्मू-काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या व अतिरेकी बुरहान वानीला सुरक्षा दलांनी मौत के घाट उतरल्यानंतर, राज्यात हिंसाचार उसळला. महिनाभर हे सत्र सुरू असून, यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण, आपण पकडलेल्या काही पाक घुसखोरांनीच तशी कबुली दिली आहे. काश्मीरबद्दल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिटमध्ये पाक सैनिक करत असलेले अत्याचार जगासमोर उघड करण्याची वेळ आली आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. मोदी यांनी काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, अलीकडे वानीच्या मृत्यूनंतर शरीफ यांनी त्याचा ‘हुतात्मा’ या शब्दात गौरव केला. देशभर या हत्येचा निषेध करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि एक ना एक दिवस काश्मीर जिंकून घेऊ, अशी गर्जना केली. अतिरेकी संघटनांनी धमकीवजा इशारे देऊनही सार्क देशांच्या इस्लामाबादेतील शिखर परिषदेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह गेले. मात्र, पाकिस्तान सरकारने भारतीय माध्यमांना व पाकमधील खासगी वृत्तवाहिन्यांना त्यांचे भाषण कव्हर करण्यापासून मज्जाव केला. अतिरेक्यांचा हुतात्मा म्हणून जयजयकार करू नका, असा टोला राजनाथ सिंह यांनी इस्लामाबादमध्येच शरीफ यांना उद्देशून सार्थपणे मारला. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार खान यांनी राजनाथ यांचे स्वागत अगदी हातचे राखून थंडपणे केले. सार्क देशांच्या अधिकृत मेजवानीप्रसंगी निसार खान यांनी हजर राहायलाच हवे होते; पण त्यांनी गैरहजर राहून एकप्रकारे राजनाथ सिंह यांचा व भारताचाच अपमान केला. राजनाथ सिंहही तिथे फिरकले नाहीत. पाकिस्तानात आपण काही पुख्खे झोडायला आलो नव्हतो, असे त्यांनी सुनावले. त्यात काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही 14 ऑगस्ट हा आमचा स्वातंत्र्यदिन अर्पण करत आहोत, असे पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अबुल बसित यांनी नवी दिल्लीत अत्यंत मुजोरपणे सांगितले. कोणताही देश हे सहन करणार नाही. या स्थितीत आधी तुम्ही सीमापार दहशतवाद थांबवा, तोपर्यंत जम्मू-काश्मीरबाबत कोणतीही बोलणी होणार नाहीत, असे भारताने ठणकावले. मोदी यांनी पाकिस्तानमधील पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बलुचिस्तानात होत असलेल्या अत्याचारांचा उल्लेख केला, एवढेच नव्हे, तर पेशावरमध्ये शाळेवर हल्ला करून निष्पाप लहान मुलांचा जीव घेण्यात आला, त्यामुळे भारतीयांची मने विदीर्ण झाली, असे कथन त्यांनी केले. आमचे वैर पाक जनतेशी नाहीच मुळी, असे दाखवून पाक शासन, ‘आयएसआय’, लष्कर यांच्यात व सामान्य जनतेत त्यांनी रास्तपणे फारकत केली. आपल्याला इथे मुख्यतः बलुचिस्तानबद्दल बोलायचे आहे. हा प्रांत पाकच्या नैऋत्येस आहे. त्या देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 47 टक्के जमीन बलुचिस्तानातील आहे. त्याची उत्तर सीमा अफगाणिस्तानला, पूर्व व उत्तरेस पाकिस्तानला आणि पश्‍चिमेस इराणला भिडली आहे. तिथे बहुसंख्य बलुची लोक राहतात; पण अफगाणिस्तान व इराणमधील पाकच्या सीमेलगतच्या भागातही त्यांची वस्ती आहे. तर 50 टक्के लोकवस्ती पठाणांची आहे. मीर चकर खान रिंद हा पंधराव्या शतकात पाकिस्तानी व अफगाण-बलुचिस्तानचा पहिला सरदार झाला. तेव्हा पूर्वेकडील भागातील कलातच्या खानशाहीची तेथे सद्दी होती. पाकिस्तानच्या जन्मानंतर जीना यांनी या खानसाहेबांना सक्तीने बलुचिस्तानचे पाकमध्ये विलीनीकरण करायला लावले. बलुचिस्तानातील राष्ट्रवादी भावना उसळल्या, त्या तेव्हा. लोक रस्त्यावर आले; पण खानशाहीच्या प्रशासनावर पाकने आपली हुकूमत प्रस्थापित केली. स्वातंत्र्यासाठी लढणारे महंमद खोया, अब्दुल अचाकझाई प्रभृती बलुची नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि काँग्रेसचा अनुनय करतो म्हणून अंजुमन-ई-वतन या पक्षावर बंदी घातली गेली. नैसर्गिक वायू, खनिजे, गंधक, सोने यांनी समृद्ध असलेला हा भाग. बांगलादेश मुक्त झाला, तो पश्‍चिम पाकिस्तानच्या दादागिरी, शोषण व अत्याचारामुळे. पाक संसदेत बलुचिस्तानचे प्रतिनिधित्व अल्पस्वल्प. बलुचिस्तानात धड रस्ते नाहीत. एखाददुसराच लोहमार्ग. याविरुद्ध आवाज उठवणार्‍या आंदोलकांना गेली 60-70 वर्षे चिरडले गेले. तीस हजारांची हत्या झाली. हजारो लोक बेपत्ता झाले. आजही मामा कादिर या नागरी हक्क कार्यकर्त्यावर दबाव आणला जात आहे. पाकिस्तानात सत्तेत पंजाबी व सिंधी नेत्यांचे प्राबल्य. अशावेळी बलुचींना आपली उपेक्षा होत आहे, असे वाटते. त्यामुळे त्यांच्या आझादीसाठी भारताने सहाय्य केले, तर पाकचे काश्मिरातील नाक खुपसणे कमी होईल, असे काहींचे मत. कारण, त्यामुळे पाकिस्तानला ‘पीओके’मधील आपले सैन्यबळ अंशतः बलुचिस्तानकडे वळवावे लागेल. देशातील फक्त 5 टक्के लोक बलुचिस्तानात राहतात. परंतु, पाक राज्यकर्त्यांना ते हलवून सोडू शकतात. अलीकडे कुलभूषण यादव या भारतीय नौदल अधिकार्‍यास पाकिस्तानने अटक केली. कारण काय, तर ते म्हणे स्वतंत्र बलुचिस्तानवाद्यांना मदत करत होते. ते ‘रॉ’चे अधिकारी आहेत, असे पाकने बेफाम आरोप केले. वास्तविक, भूषण यांनी मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारल्याने, भारत सरकारशी त्यांचा काहीएक संबंध नाही. तेव्हा ते ‘रॉ’चे एजंट कसे? उलट पाकमधील सर्व प्रांतांना मदतीचा हात देण्याची भारताची भूमिका असते. बलुची नेते बेझनजो राजीव गांधी पंतप्रधान असताना भारत भेटीवर आले होते. आम्हाला भारताशी मैत्री हवी आहे. भारत सरकार मायदेशातील प्रांतांना जशी मदत करते, तशी ती आम्हालाही केली जावी, अशी मागणी त्यांनी केली होती. पाचएक वर्षांपूर्वी ‘सिक्स्टी इयर्स इन सेल्फ एक्झाईल : नो रिग्रेटस्’ या पुस्तकाचे प्रकाशन पाकिस्तान, इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसीतर्फे झाले. या पुस्तकाचे लेखक बिय्याथिल मोहुद्दीन कुट्टी हे 60 वर्षे पाकिस्तानातील राजकारणात महत्त्वाची भूमिका वठवणारे नेते. 1947 मध्ये कुट्टी कराचीत दंगे झाले म्हणून नव्हे, तर स्वखुशीने गेले. परंतु, त्यांना अजूनही आपण ‘हद्दपार’, ‘बाहेरचे’ आहोत, असे वाटते. उत्तर भारतात दंगे झाले म्हणून हजारो मुसलमान पाकमध्ये गेले. ते अजूनही स्थानिक लोकांपासून वेगळे - मुजाहिद्दीन. म्हणजे निर्वासित समजले जातात, तसेच हे. मोदींनी ज्या बलुचिस्तानवरून पाकला इशारा दिला, तेथे 1948 पासून 2016 पर्यंत 30 हजार आंदोलकांचे प्राण गेले आहेत. काहींना तो स्वतंत्र देश म्हणून हवा आहे, तर काहींना स्वायत्तता पाहिजे आहे. शरीफ यांचा पक्ष व स्थानिक नॅशनल पार्टीचे मिळून सध्या बलुचिस्तानात संयुक्त सरकार आहे. 16 जुलै 2009 मध्ये इजिप्तमधील शर्म अल शेख येथे भारत-पाकिस्तानने संयुक्त निवेदन काढले होते. तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात तेथे अलिप्ततावादी देशांच्या परिषदेच्या निमित्ताने उभयपक्षी वाटाघाटी झाल्या. त्यानंतर ‘यापुढे कुठेही दहशतवादी कारवायांची योजना असेल, तर त्याची माहिती भारत पाकिस्तानला व पाकिस्तान भारताला देईल. बलुचिस्तान व अन्य भागांत काही धोक्याच्या शक्यता असल्याची माहिती पाकिस्तानकडे आहे, याचा उल्लेख गिलानी यांनी केला,’ असे या निवेदनात म्हटले होते. थोड्याच दिवसांत संसदेत यावरून गदारोळ झाला. तेव्हा लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, यशवंत सिन्हा या भाजप नेत्यांनी आरोप केला की, डॉ. सिंग यांनी भारताचे पाकविषयक धोरण बदलले आहे. संयुक्त निवेदनात बलुचिस्तानचा उल्लेख झाल्यामुळे या भागात भारत घुसखोरी करत आहे, असा आरोप करण्याची संधीच पाकिस्तानला मिळाली आहे. अर्थात, आता भाजपच्या भूमिकेत फरक पडला आहे. मात्र, तेव्हा बलुचिस्तानातील पाकविरोधी कारवायांना भारत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सहाय्य करत आहे, हे पाकिस्तानने भारताकडून कबूल करून घेतले होते. आता यावेळी मोदींनी बलुचिस्तान व इतरत्र मानवी हक्कांची गळचेपी होत आहे, याचा संदर्भ दिला आहे. तसेच तेथील लोकांच्या आकांक्षांचा उल्लेख करून, या समस्या मांडणे रास्त असल्याचे मोदींनी म्हटले असल्याचा युक्तिवाद केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. मात्र, 2009 च्या निवेदनात पाकिस्तानने बलुचिस्तानचा विषय समाविष्ट करून घेतला, तर भारताने आपलेही मुद्दे रेटून त्यात अंतर्भूत करून का घेतले नाहीत, अशी टीका अडवाणींनी केली. तर बलुचिस्तानबद्दलची ही चूक आपल्याला दीर्घकाळ भोवेल, असे मत माजी परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले होते. बलुचिस्तानातील असंतोषास भारत खतपाणी घालत असल्याचे पुरावे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडेल, असा इशारा पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी तेव्हा दिला होता. अफगाणिस्तानमधील भारतीय वकिलातीचा उपयोग करून भारत बलुचींना प्रशिक्षण देतो, पैसे व शस्त्रास्त्रे देतो, असा पाकचा आरोप आहे. त्यामुळे 2009 च्या संयुक्त निवेदनात भारताने बलुचिस्तानचा उल्लेख करण्यास मान्यता देऊन यास पुष्टी दिली, असे भाजपचे प्रतिपादन होते. विशेष म्हणजे, शर्म अल शेख परिषद संपल्यावर लगेचच पाकने या प्रश्‍नावरून भारताविरुद्ध तोफ डागली. वास्तविक, बलुचिस्तान चळवळीशी भारताचा काहीएक संबंध नाही, अशी भारताची अधिकृत भूमिका होती व आहे... 2006 मध्ये प्रसिद्ध बलुच राष्ट्रवादी नेते अकबर बुग्ती यांची हत्या झाली. त्यांचे नातू ब्रहमध यांनी मात्र मोदींच्या वक्तव्याची प्रशंसा केली आहे. बलुच लढ्याबद्दल बॉलीवूडने अमिताभ बच्चनला आपल्या आजोबांची भूमिका देऊन चित्रपट बनवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ब्रहमध बुग्ती बलुच रिपब्लिकन पार्टीचा नेता आहे. बलुच बंडखोरांचा तो प्रमुख आहे. आजोबांच्या हत्येनंतर ब्रहमध अफगाणिस्तानला पळाला. तेथून 2010 पासून तो स्वित्झर्लंडमध्ये परागंदा अवस्थेत राहत आहे. राष्ट्रीय व्यासपीठांवर तो बलुचिस्तानची कैफियत मांडत असतो. मात्र, भारताशी आपला कसलाही संबंध नाही. फक्त ‘युनो’त मानवी हक्क मंडळात बलुचींचे प्रश्‍न मांडण्यासाठी जातो, तेव्हाच त्यांची भेट होते, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. म्हणजे भारत त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा पाकचा आरोप खोटा आहे. अर्थात, अशा गोष्टी जगाला सांगूनसवरून करायच्या नसतातच! भारताने श्रीलंकेत लष्करी हस्तक्षेप केला व नंतर माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या झाली. नेपाळमध्ये लक्ष घातल्यावर तेथे अस्थिरता निर्माण झाली. तेव्हा भारताने हे करू नये, उलट त्यामुळे पाकिस्तान सूडबुद्धीने अधिक अत्याचार करेल, अशी शंका उपस्थित केली जात आहे. शिवाय, आपण बलुचिस्तानबद्दल बोललो, तर पाकिस्तान जम्मू-काश्मीरबद्दल, तेथील भारतीय लष्कराकडून होणार्‍या खर्‍या-खोट्या अत्याचारांबद्दल बोलत राहील व भारतास उत्तर देता येणार नाही, अशीही मांडणी केली जाते. खरे तर, पंतप्रधानांनी बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिकांबद्दल फक्त सहानुभूती दाखवलेली आहे. कसलीही कबुली दिलेली नाही. त्यांना थेट मदतीचे आश्‍वासन दिलेले नाही. भारताने तेथे अद्याप काहीच कृती केली नाही. त्यामुळे पराचा कावळा करण्याचे कारण नाही. कदाचित पाकिस्तानबरोबरच्या संबंधात कसलीच प्रगती झालेली नसल्यामुळे काहीतरी नवा प्रयत्न करण्याचा हा प्रयोग असू शकतो. नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान व ‘पीओके’च्या संदर्भात परराष्ट्र धोरणास हे एक नवे वळणच दिले आहे. खरे तर, पी. व्ही. नरसिंह राव, वाजपेयी व डॉ. मनमोहन सिंग या तिघांनीही जम्मू-काश्मीर राज्य अख्खेच्या अख्खे आमचे आहे आणि पाकिस्तानने ‘पीओके’चा बेकायदेशीर ताबा सोडावा व दहशतवाद्यांना मदत करणे थांबवणे हे दोनच विषय उभयपक्षी चर्चेचे ठरले आहेत, असे लाल किल्ल्यावरून भाषण करताना सांगितले आहे. पाकिस्तानला वाटते की, संपूर्ण काश्मीर त्यांचेच आहे. हा कल्पनाविलास झाला. ‘पीओके’तील लोकांची पाक सरकार उपेक्षा करते व भारत सरकार त्यांना आपले मानते, हेही लक्षात घ्यायला हवे. बांगलादेशनिर्मितीस भारताने मदत केली होती. त्यामुळे बलुचिस्तानच्याही भारताबाबतच्या अपेक्षा तेव्हापासून उंचावल्या. भारत तेथे हस्तक्षेप करत आहे, असा संशय पाकला आहेच. नुकत्याच क्वेट्टातील स्फोटात 100 जण मृत्यू पावले. पाकने लगेच भारताला दोष दिला; पण भारत असले उद्योग कधी करत नाही. तो स्वभाव पाकिस्तानचा आहे. अफगाणिस्तान व इराणच्या सहकार्याने भारत बलुचिस्तानात हस्तक्षेप करत आहे. तेथे चीन काही प्रकल्प राबवत असल्याने भारत व अमेरिका तेथे हिंसाचारास प्रोत्साहन देत आहेत, असे आरोप पाक करत आहे. बलुचिस्तानच्या माकन किनार्‍यावर चीनचा पाकिस्तानमधील आर्थिक महामार्ग अरबी समुद्रास भिडतो. ग्वादार बंदरात चीनचा नाविक तळ होत आहे. इराण सरकारविरोधी सुन्नी बंडखोर गट, तसेच अफगाण राजवटीविरुद्धचे तालिबानी गट बलुचिस्तानात सक्रिय आहेत. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही भूमी महत्त्वाची आहे. म्हणूनच भारताने तेथे चतुराईने पावले टाकली पाहिजेत. परंतु, यामुळे आपले काश्मीरचे प्रश्‍न सुटतील, हा गैरसमज आहे. त्यापेक्षा पीडीपी-भाजप सरकारने तेथे प्रभावीपणे काम केल्यास, कदाचित बलुचिस्तानचा दबावतंत्र म्हणून विचार करावा लागणार नाही. बलुचिस्तानात हस्तक्षेप न करता, तेथील आंतरराष्ट्रीय राजकीय खेळात स्वहितसंबंध जपता येतील.

No comments:

Post a Comment