Total Pageviews

Friday, 19 August 2016

असा घडला सेनानी’-लेफ्टनंट कर्नल मनीष कदम tarun bharat belgaum


‘असा घडला सेनानी’ हे एका चरित्र कादंबरीचं नाव. पण खरंतर तो एक देदीप्यमान इतिहास आहे. एक खंदा सेनानी. लेफ्टनंट कर्नल मनीष कदम इतक्या लवकर इतिहासात जमा झाला हे खरं तर देशाचंच खूप मोठं नुकसान आहे. नुकसान हा शब्द केविलवाणा वाटावा एवढी हानी झालेली आहे. त्याच्या कुटुंबाची, समाजाची, देशाचीसुद्धा. दि. 16 मार्च 2008 रोजी सकाळी काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्हय़ात ‘चल्लुरा’ येथे दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या घराभोवती ले. क. मनीष कदम यांनी वेढा घातला. निष्पाप नागरिकांना शस्त्राच्या धाकावर ओलीस धरून वेढा तोडण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी करू नये म्हणून मनीष कदम यांनी तातडीने निर्णय घेऊन जलद हालचाली केल्या आणि एका दहशतवाद्याला जखमी केले. यामुळेच नागरिकांना कोणतीही इजा पोचली नाही. त्यांना सुरक्षित स्थळी हलवता आले. नंतर त्यांनी अतिरेक्यांचा पाठलाग करून त्यांना वेगाने दुसऱया एका घरात घेरले. या सेनानीने प्रसंगावधान दाखवत घरावर बॉम्बवर्षाव सुरू केला. दहशतवाद्यांनी पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल बंदुकीच्या फैरीची चकमकही झाली. ले. क. मनीष यांनी मोठय़ा धैर्याने या अतिरेक्यांचा खातमा केला. या चकमकीनंतर दहशतवाद्यांच्या एका बंदुकी हल्ल्यात ले. क. मनीष जायबंदी झाले. तातडीने त्यांना इस्पितळात हलवण्यात आले. पण त्यांचा त्याच दिवशी सायंकाळी 4.25 वा. दुर्दैवी अंत झाला. झालेली घटना एवढय़ा शब्दात मांडता येते. पण त्या घटनेच्या आधी आणि नंतर जे जे बिघडलं, घडलं त्याचा घेतलेला वाङ्मयीन परामर्ष म्हणजे माझ्याकडून लिहवून घेण्यात आलेली ‘असा घडला सेनानी’ ही कादंबरी. कदम कुटुंबीयांचे आम्हा पंडित परिवाराशी फार जवळीकीचे नाते आहे. त्या नात्याचे दुवे म्हणजे आमची संरक्षक दलात असलेली मुलं. त्यांचा मुलगा मनीष आर्मीमध्ये तर आमचा अमेय वायुसेनेमध्ये विंग कमांडर. दोघेही घरापासून लांब. दोघीही आई आम्ही एकत्र आल्यावर लेकांच्या मनसोक्त आठवणी काढून घेत असू. त्यामुळे काळजीनं तडफडणारी आमची मनं निदान एकमेकांशी बोलल्याने तरी निवायची. मनीष सुट्टीवर आला की, आम्ही दोघं पती-पत्नी त्यांच्या घरी जायचो. मनीष नमस्काराला वाकला की, आम्ही त्याला जवळ घ्यायचो. आम्हाला आमच्या अमेयच्या स्पर्शाची तहान त्या स्पर्शात भागवता यायची. मनीष भरभरून बोलायचा. आमचा अमेय सुट्टीवर आला तेव्हा एकदा मनीषच्या आईनं त्याला मुद्दाम जेवायला घरी बोलावलं होतं. चवीपरीचं रांधून नैवेद्याच्या भाविकतेनं त्याचं पान सजवलं होतं. स्वतः त्याच्यासमोर बसून डबडबलेल्या डोळय़ांनी त्या आग्रह करकरून अमेयला वाढत होत्या. मनीषला आता असंच या ना त्या जवानात बघावं लागणार आहे. तो प्रत्यक्षात कधीच तिच्यासमोर बसून तिनं वाढलेलं जेवू शकणार नाही.. हा धक्का त्या माउलीनं कसा पचवला असेल? नियतीच्या या तडाख्याने ती किती घायाळ झाली असेल! तो दुःखाचा लोळ उरात सांभाळत त्याच्या पित्याने-शशिकांत कदम यांनी मनाशी एक संकल्प केला. मनात काहूर माजवणाऱया मनीषच्या आठवणी त्यांना पुस्तकरूपात आणायच्या होत्या. त्यांच्या मनात तर आठवणी होत्याच पण त्याचबरोबर त्यांचे पत्रव्यवहार, फोटो, डायऱया, कात्रणं, त्याला मिळालेले मानसन्मान या रूपाने आठवणींचा महासागर सभोवती होता. आम्हा दोन कुटुंबातला जिव्हाळा आणि माझी लेखिका म्हणून असलेली थोडीफार ओळख या दोन्हींचा आधार घेत त्यांनी मला या सामुग्रीवर पुस्तक लिहिण्याची विनंती केली. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच्या जन्मापासून, बाल्य, तारुण्य, शिक्षण, खोडय़ा, नाराजी, पुरस्कार, चढाओढी, त्याचं हसणं, रुसणं, वाढणं सगळय़ा नोंदी होत्या. जोडीला छायाचित्रे होती. पत्रं होती. त्याचं अक्षर होतं… काय न काय समोर उचंबळत होतं. लेखिका सजगपणे ते निवडत होती, त्याची वर्गवारी करीत होती. त्यांचा अन्वयार्थ लावून संदर्भ जोडत होती. लावलेल्या या क्रमवारीचं रूपांतर एका कादंबरीत होत होतं. त्याला साहित्यिक स्पर्श घडत होता. आता मनीष माझ्या घरात लहानाचा मोठा होत होता. तो जन्माला आल्याचे पेढे आमच्या जिभेवर विरघळले होते, तो उपडा पडू लागला, रांगू लागला, पावलं टाकू लागला…. शाळेत नाव घातलं, त्याच्या खोडय़ा, त्याचा वांडपणा… त्याची माया सगळं सगळं माझ्या घराच्या भिंतीआड घडत होतं. त्याचा एनडीएत प्रवेश, त्याच्या आईचा विरोध, वडिलांचा प्रेमळ करारी निर्णय, त्यांची करडी शिस्त, सगळं आत्ता माझ्यासमोर घडू लागलं. त्याच्या लग्नात मी मिरवलं. त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेची मी साक्षीदार झाले. …….आणि, ती वेळ आली. त्याच्या पित्याला त्याच्या निधनाची वार्ता सांगणारा तो फोन…. माझी लेखणी थांबली. तिच्यातला जोष, ओघ नाहीसा झाला. मी ती दुर्दैवी घटना लिहिण्याची टाळाटाळ सुरू केली. जे लेखन मी एकटाकी सुमारे महिनाभर करत होते ते मी थांबवलं… लिहू आज लिहू उद्या करत लांबणीवर टाकत होते. शेवटी मनाला लेखिकेने चपराक लगावली. ‘अगं बये।़ जे नियतीला पुढे ढकलता आलं नाही ते तू पुढे ढकलणारी कोण लागून गेलीस?’’ मी तो प्रसंग हातावेगळा केला…. आणि हमसून हमसून रडले. सारं काही हातून निसटलं या जाणिवेनं रिती रिती झाले…. कसा घडला सेनानी हे या कादंबरीत तर सगळंच आहे पण ‘असा घडला सेनानी’ या कादंबरीच्या मागे हे एवढं सगळं घडलं होतं. गानसम्राज्ञीकडून गौरव या कादंबरीचं प्रकाशन दै. तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या हस्ते सावंतवाडीत झालं. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी मनीषच्या पिताश्रींना सचिवाकरवी फोन करून कादंबरी भावल्याचं कळवलं आणि ऊर भरून आला. माझं हे कादंबरीरूपी लेकरू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं, मनीषच्या वीरमातेची आणि वीर पित्याची ही ठेव समाजाने पहावी यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता?

No comments:

Post a Comment