Total Pageviews

Friday, 19 August 2016

आझादी’च्या नारेबाजीत कर्नाटक तापले -TARUN BHARAT BELGAUM

आझादी’च्या नारेबाजीत कर्नाटक तापले काश्मीरच्या आझादीसाठी घोषणाबाजी करणाऱयांना अटक करा ही मागणी कर्नाटकात तीव्र होत आहे. यासाठी सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करण्यात येत आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलला बळ देऊन जेएनयु प्रकरणात जसे परस्पर विरोधी वातावरण तयार झाले, तशीच परिस्थिती कर्नाटकातही तयार होऊ लागली आहे. सत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या ठीक दोन दिवस आधी कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे देश आणि भारतीय लष्कराविरुद्ध नारेबाजी झाली. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घोषणाबाजी करणाऱयांना अटक करा या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. भाजपच्या नेत्यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. श्रीराम सेनेसह अनेक हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांनी केलेल्या देशविरोधी नारेबाजीची चर्चा अद्याप थांबलेली नाही. तोच बेंगळूरमध्ये 13 ऑगस्ट रोजी झालेल्या एका कार्यक्रमात देश आणि लष्कराविरुद्ध नारेबाजी करण्यात आली आहे. मिल्लर्स रोडवरील थियालॉजिकल कॉलेजच्या प्रांगणात ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया या एनजीओने ‘ब्रोकन फॅमिलीज’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. जम्मू-काश्मीरमधील विस्तापितांच्या व्यथा मांडण्यासाठी हा कार्यक्रम होता असा आयोजकांचा दावा आहे. काश्मीरमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या मन्सूर अहमद मीर, शहजाद अहमद खान या दोन तरुणांच्या कुटुंबीयांनी व्यथा (?) मांडल्यानंतर ‘भारतीय सैनिकांनो काश्मीरमधून चालते व्हा. काश्मीर पाकिस्तानला द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या. शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरमधून बेंगळूरला आलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नारेबाजीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. देशाविरुद्ध नारेबाजी करणाऱयांना अटक करा अशी मागणी करणाऱया अभाविपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. या प्रकाराने कर्नाटकातील वातावरण ढवळून निघाले आहे. नारेबाजी करणाऱयांविरुद्ध अभाविपच्या पदाधिकाऱयांनी पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र दोन दिवस ती फिर्याद दाखल झाली नाही. ज्या कॉलेज कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला, त्या कॉलेजसमोर धरणे धरण्यात आले. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. बेंगळूरनंतर तुमकूरमध्येही असा प्रकार घडला आहे. 14 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात काश्मीर व उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या शिक्षणसंस्थेत हा प्रकार घडला आहे. काश्मीरमधील तनीष अहमद भट आणि बिहारमधील प्रवीणकुमारसिंग, मंजितकुमारसिंग या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. वसतिगृहाच्या टेरेसवर बर्थ डे पार्टी करून मध्यरात्री पाकिस्तानचा जयजयकार करण्यात आला आहे. वसतिगृहाच्या वॉर्डनने स्वतःच पोलिसात फिर्याद दिली आहे. या दोन्ही घटनांचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. देशाविरुद्ध नारेबाजी करणाऱयांना अटक करून त्यांना अद्दल घडविण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. ही जबाबदारी वेळेत आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यात आली नाही. आता सरकारला जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्यानंतर याला राजकीय वळण लागले आहे. जेएनयुमधील नारेबाजी आणि त्यानंतर या प्रकरणाचा राजकारणासाठी झालेला वापर याची उदाहरणे तर आपल्या डोळय़ासमोरच आहेत. काश्मीरमधील समस्या आणि तेथील विस्थापितांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात पाकिस्तानचा जयजयकार होणे अनपेक्षित असले तरी असे प्रकार देशाच्या एकतेला आणि अखंडतेला सुरूंग लावणारे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने आपल्याच देशाविरुद्ध गरळ ओकण्याचे प्रकार सुरू आहेत. देशहिताचा बळी देणारे आणि सुरक्षिततेला धक्का पोहचविणारी घोषणाबाजी करणाऱयांमध्ये प्राध्यापकांचाही समावेश आहे. देशाची अखंडता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱया भारतीय लष्कराविरुद्ध लोकभावना भडकविण्याचा हा प्रयत्न नसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या नारेबाजीच्या पार्श्वभूमीवर वादाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया या एनजीओविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. मानवी हक्कांसाठी आंदोलन करणाऱया ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने अभाविपचा आरोप फेटाळला आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करीत नाही अशी पुस्तीही या संस्थेने जोडली असली तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आडोसा घेत समाजात अशांतता निर्माण होईल अशी स्थिती निर्माण करणाऱया या कार्यक्रमामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेला बेंगळूर पोलिसांनी नोटीस दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत अटकसत्र होऊ नये अशी सूचना काँग्रेस हायकमांडने राज्य सरकारला केली आहे. जेएनयु प्रकरणात काँग्रेसचे युवराज राहुल गांधी कन्हैय्याकुमारच्या बाजूने थांबले होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली होती. आता कर्नाटकात काँग्रेसची राजवट आहे. एफआयआर दाखल झाला म्हणून काय झाले? देशद्रोहाचा गुन्हा प्रथमदर्शनी तरी सिद्ध होईपर्यंत धरपकड नको असे फर्मान काढण्यात आले आहे. जगभरात 70 लाख पाठीराखे आहेत असा दावा करणारी ऍम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था मानवी हक्काच्या नावाखाली नेहमी चुकीची बाजू घेत असते असा या संस्थेवर आरोप आहे. भारतासह जगभरातील 10 देशात कार्यरत असणाऱया या संस्थेने काश्मीर प्रश्नावर बेंगळूरात कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रयोजनच काय होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवस आधी काश्मीरच्या आझादीची नारेबाजी करून काश्मीर खोऱयात दहशतवादी संघटनांनी चालवलेल्या हिंसाचाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न झाला आहे. पाक पुरस्कृत हिंसाचार मोडून काढण्यासाठी प्राणपणाने लढणाऱया भारतीय लष्कराचा अपमान करून काश्मीरमधील हिंसाचार देशभरात पोहचविण्याचा प्रयत्न झाला आहे असा अर्थ काढण्यात येत आहे. काश्मीरच्या आझादीसाठी नारेबाजी करणाऱयांना अटक करा ही मागणी तीव्र होत आहे. यासाठी सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करण्यात येत आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलला बळ देऊन जेएनयु प्रकरणात जसे परस्परविरोधी वातावरण तयार झाले. तशीच परिस्थिती कर्नाटकातही तयार होऊ लागली आहे

No comments:

Post a Comment