रोम शर्मिला १६ वर्षे मणिपूरची लोहनायिका होती, मात्र उपोषण सोडताना राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा तिने व्यक्त करताच ती समाजद्रोही ठरली..
इरोमने राजकारणात उतरण्याबरोबरच लग्नाची इच्छाही व्यक्त केली होती. हा साधा तिच्या निवडीचा प्रश्न. पण तिला विश्वासघातकी म्हणणारे तिचा हा अधिकारही नाकारताना दिसतात. इरोम ही सुद्धा एक व्यक्ती असून,तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून निवडीचे स्वातंत्र्य आहे हेच या सगळ्यातून विसरले जात आहे.
अवघ्या चार दिवसांपूर्वीपर्यंत इरोम शर्मिला ही मणिपूरची लोहनायिका होती. जनतेच्या लढय़ाचे प्रतीक होती. आदर्श लढवय्यी होती. आज तिला राहायला घर नाही. सोळा वर्षे तिने उपोषण केले. सोळा वर्षे तिच्या तोंडात पाण्याचा थेंब गेला नव्हता की अन्नाचा तुकडा. चार दिवसांपूर्वी तिने मधाचे बोट चाखले. उपोषण सोडले आणि आज ती अन्नाला मोताद झाली आहे. आज एका सेवाभावी संस्थेच्या दयेवर ती जगत आहे. सोळा वर्षे तिने आपल्या आईचे तोंडही पाहिले नव्हते. का, तर आईला पाहिले आणि काळजातील चलबिचलीने उपोषणाचा निर्धार डळमळीत झाला तर? तब्बल सोळा वर्षे ती पोलिसांच्या अटकेत राहिली. पोलीस शिपाई आणि रुग्णालयातील परिचारिका हेच तिचे सखेसोबती बनले, त्या इरोमला जेव्हा आपल्या माणसांत जाऊन राहावे, त्यांच्याशी बोलावे असे वाटू लागले, तेव्हा त्या माणसांनीच तिला दूर ढकलून दिले. हे का झाले, कशामुळे झाले? अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे अत्यंत कटू आहेत. समाज नावाच्या घटिताची नालायकी चव्हाटय़ावर आणणारी आहेत. त्याच समाजाचे आपणही घटक. अखेर आपल्यामुळेच तर समाज बनतो. तेव्हा तो असे का वागतो हे समजून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. काल पालखीतून मिरविलेली मूर्ती एखादा समाज आज पायदळी का फेकून देतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.
इरोम शर्मिलाची नेमकी काय चूक होती? लोकांच्या म्हणण्यानुसार तिने विश्वासघात केला. समाजाशी द्रोह केला. एखादी व्यक्ती समाजाच्या विरोधात गेली तर तिला समाजद्रोही म्हटले जाते. या न्यायाने संपूर्ण समाज व्यक्तीच्या विरोधात गेला तर त्याला व्यक्तिद्रोही म्हणावे लागेल. पण समाजासाठी असा शब्दच आपल्या वापरात नाही की संकल्पनाकोशात नाही. याचे कारण समाज व्यक्तीशी द्रोह करूच शकत नाही असे आपण केव्हाच मान्य करून टाकलेले आहे. व्यक्ती हा एक स्वतंत्र बिंदू असतो. त्याला त्याचे केंद्रक असते, परीघ असतो, अवकाश असतो. त्याला स्वातंत्र्य असते. या मूल्याची जाणीव आपल्याला नसते असे नाही. पण ते पाश्चात्त्य म्हणून हिणवण्याकडेच आपला कल असतो. आणि तरीही स्वत:पुरता व्यक्तिस्वातंत्र्याचा उदो करत पुन्हा समष्टीच्या मांडीवर बसून त्याच व्यक्तिस्वातंत्र्याला लाथाही आपण घालत असतो. ढोंगीपणाचा हा खास देशी प्रकार. मणिपूरमध्ये पाहावयास मिळते आहे ते हेच. शिवाय तो केवळ ढोंगीपणाही नाही. ती सामाजिक कृतघ्नताही आहे. इरोम शर्मिलाने राजकारणात जाण्याची, मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्याने मणिपूरमधील लोक चिडले असे सांगितले जाते. ते खरेच आहे. समाजात, त्यातही मध्यमवर्गामध्ये राजकारणाविषयी तीव्र तिटकारा आहे. या देशातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठे लोकआंदोलन झाले ते अण्णा हजारे यांचे. त्यातही हेच दिसून आले. राजकारणाविषयीचा राग, द्वेष, तिटकारा यावर ते आंदोलन उभे होते. त्यातील काही आंदोलनकर्ते जेव्हा राजकारणाच्या सत्ताकारणनामक दालनात शिरले तेव्हा अण्णा हजारे यांच्यासारख्या अनेकांनी त्याला विरोध केला. अण्णा त्यातून बाहेर फेकले गेले. इरोम शर्मिलाही पहिल्या दिवसापासून राजकारणच करीत होती.
पण तिचा निर्धार मात्र कोणीही तोडू शकले नाही. सोळा वर्षे तिच्या जिभेला अन्नाची चव माहीत नव्हती. पण सोळा वर्षे अफ्स्पा तेथेच होता. तिच्या आत्मपीडेच्या, त्यागाच्या नैतिक परिणामातून ती दमनशाही विरोधातील लढय़ाची एक नायिका बनली. पण निबरलेल्या राज्ययंत्रणेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो का झाला नाही हा पुन्हा वेगळ्या चर्चेचा विषय. पण युद्धात एक डाव नाकाम झाला, तर दुसरा आखायचा असतो. इरोमनेही तोच विचार केला असावा. उपोषण लांबवणे आता खरोखरच फायद्याचे नाही हे लक्षात येताच तिने राजकारणाचा दुसरा डाव मांडायची तयारी केली. आपण निवडणूक लढवणार असे तिने जाहीर केले. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे ती म्हणाली. लोकांनी तेवढेच ऐकले आणि तिच्यावर समाजद्रोही असा शिक्का मारून मोकळे झाले. मला अफ्स्पा कायदा हटविण्यासाठी हे करायचे आहे हे तिचे बोल कोणी लक्षातच घेतले नाहीत. याचे कारण लोकांच्या मनातील राजकारणाबद्दलची प्रतिमा आणि समाजकार्यकर्त्यांकडून असलेल्या गैरवाजवी अपेक्षा. राजकारणातील व्यक्ती स्वार्थीच असणार असे जसे आपण मानतो, त्याचप्रमाणे समाजकार्यकर्त्यांनी ऋषितुल्य कर्मयोगी असावे असे आपणांस वाटते. उद्या एखादा समाजकार्यकर्ता नाटक-सिनेमाला गेला वा मॉलमध्ये दिसला तरी आपणांस धक्का बसतो. कारण आपल्या लेखी त्याला या जगण्याचा अधिकारच नसतो. इरोम शर्मिलाने केवळ राजकारणात जाण्याचे सूतोवाच केले होते असे नाही. तिने लग्नाची इच्छाही व्यक्त केली होती. हा साधा तिच्या निवडीचा प्रश्न. पण तिला विश्वासघातकी म्हणणारे तिचा हा अधिकारही नाकारताना दिसतात. इरोम ही सुद्धा एक व्यक्ती असून, तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून निवडीचे स्वातंत्र्य आहे हेच या सगळ्यातून विसरले जात आहे. याला इरोमची शोकांतिका म्हणायची की समाजाच्या मध्यमवर्गी धारणांची?
उपोषण सोडत असताना तिने एक महत्त्वाचे विधान केले होते. ती म्हणाली होती, लोक म्हणतात की राजकारण घाणेरडे आहे. पण मग समाजसुद्धा तसाच आहे की. समाजाच्या या राजकारणाचा अनुभव एवढय़ा लवकर येईल असे तेव्हा तिलाही वाटले नसेल. पण तिच्या समाजाला एक देवता हवी होती. मिरवायला, पूजा करायला, तिच्यावर सारे काही सोडून आपण निश्चिंत व्हायला. इरोमची चूक ही की तिने हा आधारच काढून घेतला. अशा परिस्थितीत तिच्या प्रतिमेचे विसर्जन होणारच होते. ते झाले. झाले ते समाजरीतीनुसारच झाले.
No comments:
Post a Comment