Total Pageviews

Wednesday 3 August 2016

निर्जन पहाड म्हणजे शत्रूच्या घुसखोरीला निमंत्रण!-SETTLE POPULATION ON INDO CHINA BORDER

निर्जन पहाड म्हणजे शत्रूच्या घुसखोरीला निमंत्रण! उत्तराखंड येथे चीनने केलेल्या घुसखोरीविषयी विस्तृत माहिती हाती आल्यानंतरच त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल. आपल्याला गृहमंत्रालयाच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा करावी लागेल. मात्र, कटुसत्य हे आहे की डोंगराळ भागातून- खासकरून सीमेलगतच्या भागातून- सातत्याने होणारे स्थलांतर राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. लष्कराच्या दृष्टीने सीमेलगतच्या परिसरात चांगले व मैत्रीपूर्ण संबंध असणारे नागरिक मोठ्या संख्येत असणे अत्यावश्यक आहे. मात्र, उत्तराखंडप्रमाणेच अन्य हिमालयीन सीमेलगतची राज्ये तसेच हिमाचलप्रदेश आणि लडाखसारख्या चुशूलसारख्या परिसरात सीमेलगतच्या परिसरातून अतिशय वेगाने नागरिकांचे स्थलांतर होत आहे. तेथे डॉक्टरही नाहीत आणि कुठल्याही वैद्यकीय सुविधाही उपलब्ध नाहीत. एवढेच नव्हे, तर चांगले रस्ते आणि दळणवळणाच्या सोयी नाहीत. शिवाय हवामानही सतत बदलत राहणारे. मग अशा या प्रतिकूल परिस्थितीत कोण या दुर्गम पर्वतीय परिसरात राहायला जाईल? उत्तराखंड येथे बडा होती, माना, मिलम ग्लेशियरसारख्या भागात चांगले रस्ते नाहीत तसेच पायाभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे. मुंशियारी येथून मिले हिमनगापर्यंत १०५ किमी पायी प्रवास करणारा मी पहिलाच खासदार ठरलो! जेव्हा मी तेथे गेलो तेव्हा हे सीमावर्ती क्षेत्र पूर्णपणे निर्जन असल्याचे मला आढळून आले. तेथे मानवी वस्ती नव्हतीच. सर्वत्र शांतता आणि पायाखाली फक्त जमीन. औषधालाही माणूस नाही! ही अशी परिस्थिती म्हणजे शत्रूला घुसखोरी करण्याची संधीच!! मिले ग्लेशियर परिसरातील मर्तोलिया गावाजवळ कस्तुरीमृग आढळतात तसेच येथे भोजपत्राचे प्रचंड जंगल आहे. मात्र, परिसरात होणार्‍या बांधकामांमुळे हे अमूल्य जंगल हळूहळू नष्ट होत आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची आवश्यकता आहे. मुंशियारी ते मिलेपर्यंत शस्त्रास्त्रे आणि अन्य सामान नेण्या-आणण्याकरिता आमच्या सैनिकांना तब्बल तीन दिवस लागतात; तर दुसरीकडे चीनने मिलेपर्यंत बारमाही टिकतील असे पक्के रस्ते निर्माण केले आहेत. चीनच्या उत्तराखंड सीमेलगतच्या हालचाली संशयास्पद आणि तितक्याच धोकादायक आहेत. चीनच्या सेनेने जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारताची भूसीमा तसेच हवाई हद्द पार करून उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात घुसखोेरी केली. गांभीर्याची बाब म्हणजे सैन्यविहीन अशा भूभागात चिनी सैनिक उतरलेे होते आणि सुमारे पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ चीनचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई हद्दीत घिरट्या घालत होते. या सार्‍या घडामोडी बाराहोती परिसरात घडल्या. तिबेटला लागून असलेल्या ३५० किलोमीटर लांब असलेल्या या सीमेच्या सुरक्षा व्यवस्थेची भारतीय सैनिक नव्याने समीक्षा करीत आहेत. आयटीबीपीचे जवान या परिसरात डोळ्यांत तेल घालून गस्त घालत आहेत. जेव्हा राज्य सरकारचे अधिकारी आयटीबीपीच्या जवानांसमवेत बाराहोती मैदानाची पाहणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना धक्काच बसला! कारण भारतीय हद्दीत त्यांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)च्या जवानांना पाहिले. पीएलएने भारतीय अधिकार्‍यांना परत जायला सांगितले. हा परिसर आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. या सीमावर्ती क्षेत्राला चिनी सैनिक ‘वू-जे’ असे म्हणत होते. नंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली की, एक चिनी हेलिकॉप्टर आपल्या देशात परतण्यापूर्वी सुमारे पाच मिनिटांपर्यंत बाराहोती मैदानावरून सुमारे पाच मिनिटे घिरट्या घालत होते. या परिसराची चीनने पाहणी (रेकी) केली असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही रेकी करताना चिनी जवानांनी हेलिकॉप्टरमधून छायाचित्रेही काढली असावीत, असाही संशय आहे. असे जर असेल तर भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने हा फार मोठा धोका आहे. पीएलएच्या झिबा मालिकेतील हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे, इतपत माहिती आमच्या सुरक्षा यंत्रणेला प्राप्त झाली आहे. बाराहोती हे उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड क्षेत्रातील ‘मध्य सेक्टर’मधील सीमेलगतच्या तीन चौक्यांपैकी एक आहे. २००० मध्ये तत्कालीन सरकारच्या निर्णयानुसार आयटीबीपीच्या जवानांना आपली शस्त्रास्त्रे घेऊन जाण्याची परवानगी नाही. १९५८ मध्ये दोन्ही देशांनी ८० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या बाराहोती मैदानाला वादग्रस्त क्षेत्र मानले होते आणि या मैदानालगतच्या परिसरात दोन्ही देश आपले सैनिक पाठविणार नाहीत, असे ठरले होते. त्यानुसार १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चिनी लष्कर ५४५ किलोमीटर लांब असलेल्या या मध्य विभागात (सेक्टर) दाखल झाले नव्हते. त्यांचे सर्व लक्ष पश्‍चिम विभाग म्हणजे लडाख आणि पूर्व विभाग म्हणजे अरुणाचल प्रदेशावर केंद्रित झाले होते. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर आयटीबीपीचे जवान लढाईचा पवित्रा न घेता या विभागात डोळ्यांत तेल घालून गस्त घालतात. गस्तीच्या वेळी हे जवान आपल्या बंदुकांची नळी खालच्या दिशेने ठेवतात. मात्र, आता बदललेल्या परिस्थितीचा विचार भारताने केलाच पाहिजे. कारण आयटीबीपीचे जवान नागरी पोषाखात (सिव्हिल ड्रेस) पहारा देत असतात. बाराहोतीच्या या विस्तीर्ण चराऊ, गवताळ कुरणात सीमावर्ती भागातील भारतीय गुराखी आपले कुत्रे आणि तिबेटचे लोक आपले याक येथे चरायला घेऊन येतात. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या घडामोडींवर व चीनच्या घुसाखोरीवर चिंता व्यक्त केली आहे. पश्‍चिम आणि पूर्व विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या उल्लंघनानंतर आता चिनी सैनिक मध्य विभागाकडे लक्ष केंद्रित करीत आहेत आणि भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. चीनने या परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सेनादलासमोर आव्हान उभे ठाकले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून चीनशी नव्याने चर्चा व संवाद सुरू केला पाहिजे, तर दुसरीकडे सीमेवरील संरक्षणसिद्धताही मोठ्या प्रमाणात वाढविली पाहिजे. तरुण विजय

No comments:

Post a Comment