Total Pageviews

Saturday, 13 September 2014

UPDATE KASHMIR FLOODS

कोसळलेलं काश्मीर अन् देवभूमीतील देवदूत तारीख: 14 Sep 2014 00:53:33 जम्मू-काश्मीर प्रलयकारी महापुराने वेढलं आहे. अवघा देश या घटनेने हादरला आहे. प्रधानमंत्र्यांनी ‘राष्ट्रीय आपत्ती’ घोषित केली आहे. ‘तावी’ नदी जम्मूसाठी, तर ‘झेलम’ काश्मीरसाठी ‘काळ’ ठरली. महापुरात ४५० गावे गडप झालीत. दक्षिण काश्मीर, पश्चिम काश्मीर इतके प्रभावित झाले आहे की, आठ दिवस झाले तरी पाण्याची पातळी कुठे १० फूट, तर कुठे २० फूट आहे. श्रीनगरचा लाल चौक, राजबाग, इंद्रनगर, शिवपुरा, जवाहरनगर पाण्यात आहे. मुख्यमंत्र्याचे घर, मंत्रालय, पोस्ट ऑफिस यामध्ये तळी साचलेली आहेत. रस्ते, पूल नेस्तनाबूत झाले आहे व सामान्यपणे घरांचे दोन मजले पाण्यात असून, छपरांवर घरातले माणसे वाचवा वाचवा अशी आर्त हाक देताहेत... पाणी, अन्न यासाठी त्राही त्राही करताहेत... सर्वच चॅनेलवरून, दूरदर्शनवरून ही विदारक दृश्ये बघताना तुमचं माझं मन सुन्न होऊन जातं. काही घटना, प्रसंग हृदयद्रावक आहेत... ही तीन दृश्य बघा.... परिदृश्य एक- एक भीतियुक्त भेदरलेला चेहेरा सांगत होता... मेरे मकान में पॉंच लाशे परिवारकी पडी हुई है... मै दरवाजा बंद करके बचने.... खुदको बचाने आया....! परिदृश्य दोन- कुशीत सहा महिन्याचे पोर झाकलेली एक भगिनी केविलवाणे बोल बोलते... भैया हम तो तीन दिनसे भूके प्यासे है पर यह बच्ची...! दूध, पानी तक नही दे पायी मै...! ती ओक्साबोक्सी रडू लागली... शेजारचीने तर हंबरडा फोडला? परिदृश्य ३- उद्ध्वस्त झालेलं घर... कोलमडलेल्या बल्ल्या, छत, पडलेल्या भिंती... याहून उजाड झालेलं, वाहून गेलेलं शेत, सर्वत्र चिखल आणि त्या चिखलात रुतलेली कणसे. त्याची दाणे खाऊन काही मुलं, चिमुकली आपण पोट भरत होती. हेलिकॉप्टरच्या मागे धावणारी माणसे त्यांची अगतिकता, एखादा वृद्ध, त्याचा आक्रोश ‘जन्नत के जख्म’ म्हणून अशी कितीतरी दृश्ये दूरदर्शनवरून दाखविली जात आहेत. बघताना वाटतं... खरोखरीच आभाळ कोसळलं नि काश्मीर काळवंडलं ही अवस्था आहे. पुष्कळदा काश्मीरचा इतिहास नि भूगोल बघितला की वाटतं निसर्गाने काश्मीरला वरदान दिलं अवर्णनीय सौंदर्याचं, पण नियतीने जणू काश्मीरच्या कपाळी कायमचा अभिशापच कोरून ठेवला की काय. काश्मीर म्हणजे पृथ्वीतलावरचा स्वर्ग. कश्यपांची देवभूमी काश्मीर. चिनारच्या निसर्गरम्य रांगा, देवदार वृक्षांची वने, खोर्यातील देखणं सौंदर्य, इथला सूर्योदय, सूर्यास्त, केशराची शेती, सफरचंद, आक्रोट, काय नाही इथे. मोगल शासक जहांगीरचा शेर काश्मीरबाबत प्रसिद्ध आहे... गर फिरदौस बार रुई झमीन अस्त हमीन अस्त, हमीन अस्त, हमीन अस्त याचा अर्थ पृथ्वीवरील भूलोकीचा जो स्वर्ग आहे तो हाच स्वर्ग. पण हा स्वर्ग जिंकण्यासाठी किती रक्तपात झाला! अन्याय, अत्याचार, युद्ध झालं, अनेकदा सैन्याच्या बलिदानाने दाल सरोवर लाल झालं! असं म्हणतात की, काश्मीरचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ सदैव अस्वस्थच असतो, अशांत असतो. कारण तो अभिशापित आहे. रक्त आणि अश्रूंनी काश्मीरचा इतिहास बनला आहे. जगातल्या दोन जाती ‘ज्यू’ आणि कश्मिरी पंडित यांनी काळ भोगला आहे म्हणतात. अभिशापित सौंदर्य हा जणू काश्मीरचा इतिहास व्हावा! युद्ध, आतंक यांच्या तडाख्यातून काश्मीर हळूहळू सावरू लागला होता. तोच निसर्गाचा प्रकोप काश्मीरसाठी अभिशाप बनावा. साठ वर्षांत नव्हे, एवढी ढगफुटी व्हावी. उत्तराखंडाप्रमाणे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. नुकताच उत्तर चीनमध्ये असाच पाऊस कोसळला. चीनची शेती फार ध्वस्त झाली, तर ब्राझीलमध्ये ९० वर्षांत झाला नाही एवढा पाऊस कोसळला. पेरू, कॅरॅबियन इथे तर महापुराचे थैमान झाले आहे. तोच फटका निसर्गाने काश्मीरला दिला. कोसळलेलं काश्मीर आज निर्धाराने, हिमालयाच्या हिमतीने सांभाळताहेत ते भारतीय लष्कर! काश्मीरच्या जनतेला जिवाचे रान करून वाचवताहेत ते हे ‘जन्नत के फरिश्ते!’ म्हणजे या देवभूतील जणू देवदूत! पूरग्रस्तांची आर्त हाक जिथून येईल तिथं मदतीला धावताहेत जवान. रात्रीचा दिवस करून एक लाख लोकांना, पूरग्रस्तांना या सैनिकांनी सुरक्षित स्थळी हालविलं आहे. निसर्गाशी दोन हात करत, जनतेला धीर देत, हेलिपॅडच्या साहाय्याने मदत करत सैन्याचे जवान हिंमत देतात... घबराओ मत, हम है ना, संभालो बेटा... वो बेटीको हमारे पास दो, हम सम्भालेंगे!... प्राण वाचलेले पूरग्रस्त, महिला, वृद्ध सगळे या सैनिकांना दुवा देतात, मनोमन आभार मानतात... ‘फरिश्ते’ म्हणतात. आज श्रीनगरच्या आसपास, दक्षिण काश्मीर, जम्मू, बारामूल्ला, इथे लष्कर, एअर फोर्स, मरीन कमांडो, प्रशिक्षित विशेष पथ मार्कोस मिलटरी (आपत्कालीन मदत देणारे), तसेच एफ. डी. एफ. आर.; सीआरपीएफ अशा विविध दलांच्या ४७ हून अधिक तुकड्या अविरत, अविश्रांत मदतकार्य करत आहेत. जवळपास एक लाख सैनिक मदतकार्यात आहेत. ६१ हेलिकॉप्टरमधून, विविध यंत्रणेतून अन्न, पाणी, औषधी, आवश्यक वस्तू पोहचविणे, ६० ते ७० फेर्या दिवसभरातून केल्या जात आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या ११० बोटी, तर लष्कराच्या १४८ बोटी मदतकार्यात तैनात आहेत. ८१ ठिकाणी हेल्थसेंटर व हॉस्पिटल उभे केले आहेत, तर पाचशेहून अधिक तंबू उभारले आहेत. काही टन फूड पॅकेट्स, घोंगडी, वगैरे बाबी युद्ध पातळीवर वितरित होत आहेत. भारतीय सैन्याच्या या भगीरथ प्रयत्नांची सर्वत्र नोंद होतेय्. पण म्हणतात ना की, आपत्ग्रस्तांना मदत करणे हे सैन्याचे कर्तव्यच आहे. भारतीय सैन्याने हे रचनात्मक कार्य, आपत्ती निवारण कार्य अनेकदा केले आहे. उत्तराखंड असो की बिहार, की मुंबईतील पूरस्थिती, की पुण्यातील दरड कोसळण्याची घटना. लष्कराने सदैव मदतीचे कार्य अविश्रांत केले आहे. पण काश्मीरच्या संदर्भात एक वेगळा आशय भारतीय सैन्याबाबत इतिहासाने नोंद केलेला आहे. आजवर आम्ही सहज बोलून जायचो की, भारतात काश्मीर का आहे, कुणाच्या बळावर आहे, तर सैन्याच्या! इतकेच काय, काश्मिरातून सैन्य काढावे ही हाकाटी काहींनी सुरू केली होती. अर्थात वेगळ्या संदर्भाने. जे हाकाटी करत होते तेच आज म्हणताहेत की, आम्ही वाचलो ते सैन्यामुळेच! नियतीने संदर्भ बदलला. या महासंकटांत, पूरग्रस्तांना वाचविणारे सैन्य आज ‘फरिश्ते’ झालेत! असं म्हणतात, शत्रूविरुद्ध लढणे सोपी असते, मारणे सोपी असते पण ‘तारणे’, लोकांचे जीव वाचविणे हे युद्धस्तरीय प्रयास फार कठीण असतात. कारण जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत असतो व दुसर्याला वाचवीत असतो. देवदूताप्रमाणे भारतीय लष्कराने धाव घेतली. जम्मूमध्ये ‘तावी’ नदीचा पूल पुराच्या तडाख्याने वाहून गेला. चाळीस हजार लोकांचा संपर्क तुटला. तसे अनेक छोटे मोठे पूल तुटले, पण हा पूल महत्त्वाचा होता. जनजीवन विस्कळीत झालं. पण लष्कराने अवघ्या १८ तासांत रात्रीतून पूल उभा केला. जिथे खूप पाणी होते, २० फूट खोल पाणी होते, तिथे ७० फूट लांबीचा तरंगता पूल तयार केला एका तुकडीने, तर लष्कराच्या दुसर्या तुकडीने ८० मीटर लांब लाकडाचा पूल तयार केला. दोन्ही पूल एकमेकांना जोडलेत आणि नवा १५० मीटरचा पूल उभा झाला... त्याला नाव दिलं ‘राहत पूल!’ चाळीस हजार लोकांचा संपर्क पुन्हा सुरू झाला. असाच एक पूल पूँछ भागात केवळ आठ तासात लष्कराने उभा केला. सुमारे १५० गावांना संपर्क सुरू झाला म्हणतात. याशिवाय रस्त्याची डागडुजी, दरड कोसळलेला मलबा हटविणे अशी कितीतरी अविरत कामे लष्कराने केली आहे. विशेष असे की मदतकार्य करणारे जवान, त्यांचे स्वत:चे परिवार मात्र दक्षिण काश्मीर, भागात पुरात अडकलेले होते! सुमारे एक हजार सैन्य परिवार संकटग्रस्त आहेत! आपल्या परिवाराची, आप्तजनांची पर्वा न करता, रात्रंदिवस अविश्रांत मदतकार्य करणार्या या सैनिकांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करताना एकच ओळ ओठांतून येते ‘शूरा मी वंदिले!’ या सैनिकांना दुहेरी लढत द्यावी लागत आहे. एकीकडे, ‘ऑपरेशन जिंदगी’, तसेच ‘ऑपरेशन मेघराहत’ पार पाडताना पूरग्रस्तांना हवी ती मदत देणे, तर दुसरीकडे सीमेवर निगराणी ठेवणे, दारुगोळा, आर्मस् सांभाळणे, सीमेवरील तारबंद तुटली आहे, बंकर्स उद्ध्वस्त झालेले आहे, पाकव्याप्त प्रदेशातून पावसाच्या नावे पूरग्रस्त म्हणून घुसखोरीवर नियंत्रण ठेवणे... असे ‘अस्मानी सुलतानी’ संकट सैन्य झेलत आहे. तसे भारतीय लष्कराला काश्मीरमध्ये आजवर खूप ऑपरेशन्स सांभाळावी लागलेली आहे. जनरल करिअप्पांच्या काळातील ऑपरेशन ‘किपर’ असो की ऑपरेशन ‘विजय’ असो. या प्रत्येक वेळी जवानांना एक मोलाचा संदेश दिला जातो की, तुम्ही लढता ते तुमच्या वंशजासाठी, देशासाठी, देव, देश नि मंदिरासाठी. अजरामर ठरावा असा हा संदेश आहे. To evevry man upon this Earth, Death Cometh Soon or Late, And how man can die better, Than facing fearful odds, For the ashes of his father And the Temples of his God! परवा आर्मी चीफ जनरल दलरबीरसिंग यांनी सैन्याचे मनोबल वाढविताना कदाचित हाच संदेश दिला असेल. काश्मीरमध्ये सैन्य देवदूताप्रमाणे मदतकार्य करत असताना काही विघ्नसंतोषी, आतंकी म्होरके मात्र लष्कराविरुद्ध ट्विट करण्याचे जे चाळे करताहेत ते निंदनीय आहे. ही वेळ संकटाची आहे. मानवतेच्या हाकेला धावून जाण्याची आहे. मोदींनी तर पाकलासुद्धा मदतीचा हात देण्याचा जो शेजारधर्म दाखविला, तो खरोखीच ‘स्टेस्ट्मनशीप’चा आदर्श आहे. सर्वच राज्ये आपापल्या परिने मदत करीत आहेत. विविध राज्यांतील लोक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. खरं तर काश्मिरात आभाळ फाटलं आहे. थिगळ तरी कुठे कुठे लावणार? अजूनही तीन ते चार लाख लोक पुराने वेढलेले आहेत. करावी तेवढी मदत थोडी आहे. लष्कराच्याही मर्यादा आहेत. ते किती मदत करणार? खरी गरज तर इथून पुढे आहे. पूरग्रस्तांचे पुनर्वसन, तिथे संभाव्य रोगग्रस्तता, तिथलं आपत्तीनिवारण एक भीमकाय प्रचंड आव्हान आहे. ज्यांना मदत मिळाली नाही ते संतप्त आहेत. राज्य सरकारवर प्रचंड नाराज आहेत. ते स्वाभाविकही आहे. आता नागरिक स्वतः उभे झाले आहेत. स्वतःची मदत करताहेत्, ही अभिनंदनीय बाब आहे. उत्तराखंडाप्रमाणे इथेही मदतीचा ओघ राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर होणे अपरिहार्य आहे. भारतीय लष्कराप्रमाणे भारतीय मने पोलादी आहेत. ते काश्मीरचा भूगोल व इतिहास नव्याने उभा करतील की काश्मीरची जनता हे पुनर्निर्माण, हे नवे नंदनवन कधी विसरू शकणार नाही... देवदूतांचे देणे ते विसरणार नाहीत, हीच आशा नि अपेक्षा!

No comments:

Post a Comment