सुमारे 40-45 वर्षांपूर्वी पुण्यात आणि महाराष्ट्रात वृत्तपत्राद्वारे एक विवाह प्रकरण गाजलेले होते. यातील मुलगी हिंदू ब्राह्मण होती आणि तिने एका मुस्लीम तरुणाशी प्रेमविवाह केलेला होता. या आंतरधर्मीय विवाहाचे त्यावेळी पुरोगामी विचारांच्या मंडळींनी उत्साहाने स्वागत केले होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन समाजातील सौहार्दाचे प्रतीक अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले होते. त्या गाजलेल्या लग्नातली मुलगीच एक निराधार महिला म्हणून एका संस्थेत दाखल झाली होती.
सध्या चालू असलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या चर्चेच्या संदर्भात मला वरील प्रसंग आठवला. इथे मी तो सांगितला. ‘हिंदू मुलींनो, बघा मुस्लीम युवकांशी तुम्ही लग्न केलेत तर तुमची कशी परवड होईल,’ असा इशारा देण्यासाठी मी हा प्रसंग सांगितलेला नाही. अशी परवड हिंदू मुलाशी लग्न करणाऱया मुस्लीम मुलींच्याही वाटय़ाला येऊ शकते. एकाच जातीतल्या मुला-मुलींच्या प्रेमविवाहानंतरही मुलीच्या वाटय़ाला अशीच परवड येऊ शकते. (परवड वाटय़ाला येते ती मात्र बहुतेक उदाहरणात मुलींच्याच!). भिन्न धर्मिय, भिन्न जातीय मुला-मुलींत लग्ने होतात ती बव्हंशी प्रेमलग्नेच असतात. दोन्हीकडल्या कुटुंबात मानसिक आणि वैचारिक मोकळेपणा नसेल, स्वागतशीलता नसेल, उदारमनस्कता नसेल तर सांस्कृतिक, जातीय, धार्मिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. त्या परिस्थितीत मुलगेच विचारांनी ठाम नसतील तर मुलीच्या वाटय़ाला दुःख आणि गुदमरलेपणाच येणार. हिंदू समाजात आता पुष्कळ प्रमाणात परघरातून आलेल्या मुलींना मोकळेपणाची आणि सन्मानाची वागणूक मिळते. पण मुस्लीम समाजात ती मिळत नसावी. (मी मुद्दामच ‘नसावी’ असे म्हटले आहे.) म्हणून मुस्लीम समाजातील जे मुलगे परधर्मीय मुलींशी प्रेमविवाह करतील किंवा करू इच्छित असतील त्यांनी पत्नीची परवड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातला हिंदू-मुस्लीम विवाह हा प्रेमविवाह होता. त्यात कपटकारस्थान किंवा अन्य कोणता हेतू नव्हता. सध्या ज्या ‘लव्ह जिहाद’ची चर्चा चालू आहे. त्यात हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळय़ात ओढण्याचे डावपेच असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच प्रेमाचे राजकारण करण्यात येत असल्याचा संशय घेण्यात येत आहे. प्रेमाच्या जाळय़ात ओढून लग्न करायचे आणि लग्नानंतर मुलीचे सक्तीने धर्मांतर करायचे, असे कपटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या जबरदस्तीमुळेच अशा विवाहांना विरोध होत आहे. हा सक्तीचा प्रकार नसता तर आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहांना विरोध करण्याचे कारण नव्हते. विरोध होत आहे तो ‘लव्ह’ला नाही, तो होतो आहे ‘लव्ह’च्या आधारे होणाऱया ‘जिहाद’ला!
समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील एक नेते आझम खान यांनी ‘लव्ह जिहाद’ या भाषेला विरोध करताना प्रतिप्रश्न करीत म्हटले आहे की, मुख्तार अब्बास नक्वी आणि शहानवाज हुसेन यांना विचारा की लव्ह जिहादचा खरा अर्थ काय आहे ते! कारण, या दोघाही भाजप नेत्यांच्या बायका हिंदू आहेत!
अनेक नेत्यांचाही हिंदू-मुस्लीम प्रेमविवाहांना विरोध नसावा. विरोध होत आहे तो ‘प्रेमा’च्या नाटकाला आणि ते नाटक ज्या फसवणुकीच्या पायावर आधारित आहे, त्या फसवणुकीच्या पायाला! आझम खान यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हटले की, काही मोजकेच लोक लव्ह आणि जिहाद या दोन्ही शब्दांचा गैरवापर करीत आहेत. आणि दोन धर्मीयांत अंतर पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताची सव्वाशे कोटी जनता या समाजभेद्यांना योग्य ते उत्तर देईल. आझम खान ज्या सव्वाशे कोटी जनतेचा संदर्भ देत आहेत, त्या जनतेत निदान ऐंशी-नव्वद कोटी हिंदूधर्मिय आहेत. या एवढय़ा मोठय़ा जनतेच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी आझम खान यांनी पंचवीस कोटी मुस्लीमांचे प्रबोधन केले पाहिजे. सव्वाशे कोटी जनतेला एकमेकांशी न भांडता भारतातच एकत्र नांदायचे आहे हे पटवून दिले पाहिजे. सव्वाशे कोटींपैकी नव्याण्णव टक्के जनतेला एकमेकांशी न भांडता एकाच भूमीवर नांदायचे आहे, हे पटलेलेच आहे. फक्त एकच शंका या नव्याण्णव टक्यांच्या मनात असते ‘हस के लिया पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान’ या घोषणेला आझम खान विरोध का करीत नाहीत? मुस्लीम मतांच्या व्होट बँकेला तर विरोध का करीत नाहीत? मुस्लीम समाजाच्या मतांचे राजकारण करण्याला विरोध का करीत नाहीत? किंबहुना ते स्वतःच मुस्लीम मतांचे राजकारण का करतात?
भारतात हिंदू आणि मुस्लीम समाजात वर्षातील काही दिवसच परस्परांबद्दल अविश्वास निर्माण होतो. मुस्लीम समाजाबद्दलचे अविश्वासाचे वातावरण कमी करून विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी बिगर राजकारणी मुस्लीमांनी पुढे आले पाहिजे, असे मुस्लीम समाजातील विद्वानांना आणि युवकांनाच वाटू लागल्याचे सांगणाऱया एक-दोन बातम्या माझ्या वाचनात आल्या. त्या अशा-
1) अलिगड (वृत्तसंस्था)-हिंदू तरुणींशी प्रेमाचे नाटक करून त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱया ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असताना अलिगड मुस्लीम विद्यापीठातील विद्वानांनाही आता जाग आली आहे. ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पनाच इस्लाममध्ये अस्तित्वात नाही. खोटी वचने, आश्वासने देऊन मुलींची फसवणूक करणे इस्लामला मान्य नाही, असे या विद्वानांचे म्हणणे आहे.
विद्यापीठाच्या सुन्नी तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख मुफ्मती झहीद अली खान आणि सहयोगी प्राध्यापक एम. सलीम यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ‘लव्ह जिहाद’चा निषेध केला आहे. ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदू तरुणींची फसवणूक करून त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न होत असेल, तर मुस्लिम संघटनांच्या निदर्शनास हा प्रकार आणून द्यावा. मुस्लीम संघटनांनी हे धर्मांतर रोखून संबंधित दोषीला शिक्षा करावी, असे या विद्वानांनी म्हटले आहे. (दै. सामना, 12 सप्टेंबर 2014).
2) अलिगड मुस्लीम विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थ्यांच्या ‘स्टुडण्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन’ या संघटनेने ‘ब्रिज द गॅप, ब्रिंग द चेंज’ (अंतर मिटवा, बदल घडवा) या नावाने एक यात्रा काढायचे ठरविले आहे. या संघटनेचे 20 हजार सदस्य आहेत. या यात्रेद्वारा हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. (टाइम्स ऑफ इंडिया. 10 सप्टेंबर 2014). ‘लव्ह जिहाद’ला विरोध होऊ लागल्याने मुस्लीम समाजातील अभ्यासक, विद्वान, शिक्षक, प्राध्यापक, कॉलेज विद्यार्थी असा सुशिक्षितांचा वर्ग धैर्याने बोलू लागला ही स्वागतार्ह बाब
आहे. धार्मिक धुरीणांच्या वर्चस्वाखालून आणि धर्मनिष्ठ मतपेटय़ांच्या राजकारणातून मुस्लीम समाजाची सुटका होणे आता आवश्यक आहे. समाजप्रबोधनाचे वारे मुस्लीम समाजात जेवढय़ा वेगाने वाहतील, तेवढे स्वागतार्हच ठरेल!.
No comments:
Post a Comment