मोदींच्या भाषणाला अभूतपूर्व प्रतिसाद
सुहास बिवलकर, न्यूयॉर्क
भारत माता की जय... वंदे मातरम्... या घोषणांनी न्यूयॉर्कमधला मॅडिसन स्क्वेअरचा परिसर रविवारी दणाणून गेला होता. इंडियन-अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी अमेरिकेतील भारतीयांना अभूतपूर्व गर्दी केली होती. वीकएंड असूनही अमेरिकेतील हजारो भारतीय आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने दिवाळीच्या आधीच येथे दिवाळीचे आनंददायी, उत्साही वातावरण निर्माण झाले होते...
मी स्वत: या कार्यक्रमासाठी न्यू हॅम्पशायर येथून पहाटे तीन वाजता निघालो. तब्बल २२० मैल अंतरावरून नऊ वाजता न्यूयॉर्कला पोहोचलो. माझ्यासारखेच अनेकजण अमेरिकेच्या विविध प्रांतातून या कार्यक्रमासाठी आले होते. जॉर्जिया, पेनिन्सुला, न्यूजर्सी, नॉर्थ कॅरोलिना... एवढेच नाही, तर कॅनडामधे राहणारे काही भारतीय नागरिकही या कार्यक्रमासाठी आले होते. पारंपरिक पोषाख परिधान केलेले भारतीय, नऊवारी साड्या नेसलेल्या युवती, ढोल-ताशे, लेझीम पथके हे सारे पाहून आपण अमेरिकेत नसून भारतातच आहोत, असे भासत होते...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या संयुक्त राष्ट्र संघातील आमसभेत दहशतवादप्रश्नी पाकिस्तानला खडे बोल सुनावल्याने आज ते काय बोलणार याबद्दल आम्हा सगळ्यांना खूप उत्सुकता होती. सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येकाला कडक सुरक्षा व्यवस्थेतून सभागृहात प्रवेश दिला जात होता. त्यासाठी लांबलचक रांगाही लागल्या होत्या. पण त्याबद्दल कुणीही तक्रार करत नव्हते. सभागृहात गेल्यानंतर वंदे मातरम, भारत माता की जय... अशा जयघोषामुळे वातावरण भारावून गेले होते. हळूहळू सभागृह भरत गेले आणि वातावरणातील उत्साहही वाढत गेला. रंगमंचावर सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे हा उत्साह अधिकच द्विगुणीत झाला. पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी तमाम उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पाहून, ऐकून खूप खूप अभिमान वाटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेजारधर्माला प्राधान्य देत दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचे (सार्क) सदस्य राष्ट्र असणाऱ्या श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली. दहशवादाबरोबरच अन्य महत्त्वाच्या विषयांवरही या चर्चेत ऊहापोह झाल्याचे समजते. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी मोदींच्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषणाची स्तुती करत त्यांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा दिनाचा स्वीकार केला जावा म्हणून पूर्ण पाठिंबा देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
या वेळी नरेंद्र मोदी यांनी "सार्क‘ अधिक बळकट प्रादेशिक संघटना करण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन या नेत्यांना दिले. या तिन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी नरेंद्र मोदींना आपापल्या देशांना भेट देण्याचे आमंत्रणही दिले. या वेळी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांच्यासोबत चर्चा करताना नरेंद्र मोदींनी लवकरच आपण नेपाळ दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले. तसेच गौतम बुद्धांच्या जन्मस्थळाला भेट देण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखविली. मोदींनी मागील नेपाळ दौऱ्यात करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांबाबतही कोइराला यांच्याशी चर्चा केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबतही मोदींनी प्रत्येकी तीस मिनिटे चर्चा केली.
लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मोदी
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये आयोजित "लाइव्ह कॉन्सर्ट‘ला हजेरी लावली. या वेळी "हाऊ आर यू डुईंग, न्यूयॉर्क?‘ असा प्रश्न मोदींनी व्यासपीठावरून उच्चारताच उपस्थित साठ हजार तरुण-तरुणींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल सात मिनिटे मोदींनी इंग्रजीतून भाषण केले. मोदी यांच्यासोबत हॉलिवूड अभिनेता ह्युग जॅकमनदेखील व्यासपीठावर उपस्थित होता. गरिबी निर्मूलनासाठी "ह्युग इव्हान्स‘ या आंतरराष्ट्रीय
संस्थेकडून या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोदींनी संस्कृत श्लोक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
पाक माध्यमांकडून दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेल्या भाषणाची पाकिस्तानी माध्यमांनी ठळकपणे दखल घेतली आहे. डॉन, दि न्यूज इंटरनॅशनल, दि एक्स्प्रेस ट्रिब्युन आदी दैनिकांनी मोदींच्या भाषणाचे वृत्त ठळकपणे पहिल्या पानावर प्रसिद्ध केले. "दि नेशन‘नेही मोदींच्या भाषणाची दखल घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेच्या ट्रॅकवर आल्याचा सूर बहुतांश पाकिस्तानी दैनिकांनी आळवला आहे.
No comments:
Post a Comment