केवळ शिक्षक दिनच नव्हे, तर वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या अनेक दिनांचे स्वरूप आपल्याकडे उपचारासारखे झाले आहे. जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात, थोर पुरुषांचे गुणगान केले जाते आणि त्यांचे 'महत्त्वाचे विचार' त्यानंतर बासनात बांधून ठेवले जातात. कालच्या शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण देशभरातील विद्यार्थ्यांना ऐकवण्याच्या उपक्रमामुळे यावेळी या दिवसाचा मोठा गाजावाजा झाला. मुळात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, त्यांना तशी गरज वाटावी, हेच औत्सुक्याचे होते. मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सार्वजनिक स्वच्छता, शाळांमधील स्वच्छतागृहे यांचा उल्लेख करून आपल्या पुढील वाटचालीचे सुतोवाच केले होते. शिक्षक दिनी त्यांनी साधलेला संवाद हा त्याच प्रयत्नांचे पुढचे पाऊल म्हणता येईल. हे भाषण मुलांना ऐकवण्याच्या सक्तीचे नाट्य रंगवले गेले नसते, धमकीवजा परिपत्रके काढली गेली नसती तर ते अधिक परिपक्वपणाचे ठरले असते. मोदी यांनी उणीपुरी २०-२५ मिनिटे भाषण केले आणि नंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपल्याकडील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत राजकारण्यांच्याच कृपेने प्रचंड चिखल झाला आहे. केवळ कमाईआधारित शिक्षणाला महत्त्व आल्यामुळे संशोधन, अभ्यास आणि चिंतन याकडे उपहासाने पाहण्याची दृष्टी तयार झाली आहे. मोठ्यांचे हे दूषीत दृष्टिकोन घेऊनच पाल्य आपल्या विचारांचा पाया रचतात. हे बदलायचे तर शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याच्या दृष्टीतच बदल व्हायला हवा. मोदी यांनी शिक्षक दिनाचे निमित्त साधून स्वतःची प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून का होईना, या विषयाला एक गांभीर्य बहाल केले, हे चांगले झाले.
मुलांना उपदेशांचे डोस न पाजता सहज आणि सोप्या भाषेत मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला. केवळ पुस्तकी शिक्षणाऐवजी खेळ, व्यायाम यांनाही महत्व द्या, पाठ्यपुस्तकांच्या पलिकडले जग वाचा आणि अनुभवा, असे म्हणत त्यांनी आपल्या पदामुळे आलेले अंतर सहजगत्या दूर केले. त्यांच्या भाषणानंतर झालेल्या प्रश्नोत्तरात मुलांनी ज्या धिटाईने प्रश्न विचारले त्यावरून ते लक्षात आले. त्यांना उत्तरे देताना मोदी यांनी कोणतीही मोठी, गहन अशी वैचारिक भूमिका न मांडता खेळकर शैलीत आणि तरीही गांभीर्याने उत्तरे दिली. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, एवढाच मर्यादित हेतू लक्षात घेतल्यास हा कार्यक्रम नक्कीच यशस्वी झाल्याचे म्हणावे लागेल. मात्र शिक्षक दिनी शिक्षकांचे आणि शिक्षणाचे महत्त्व सांगून पुढे वर्षभर शिक्षणसंस्था गबर होण्याचे मार्ग प्रशस्त करण्याची वृत्ती कायम राहिल्यास असा संवाद साधणे हा उपचारच होऊन बसेल. अनेक राज्यांत स्थानिक भाषेच्या शाळांची दुरवस्था, खासगी शिक्षण संस्थांची धन करून सरकारी शाळांचा बळी देणारी धोरणे, शाळेत शिकवण्याऐवजी ट्यूशनवर भर देणारे शिक्षक, तुटपुंज्या वेतनावरचे शिक्षक, केंद्रीय बोर्डांच्या शाळांची मनमानी आणि आर्थिक भरभराटीभोवती फिरणारी वैचारिकता तयार झालेला समाज, अशा अनेक समस्या या क्षेत्रापुढे उभ्या आहेत. शिक्षक आणि शिक्षणाविषयी बोलून झाल्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा सुधारणांची गाडी राजकीय अडचणींच्या रस्त्यावर बंद पडते. 'मुलांशी संवाद साधण्याची इच्छा झालेला पं.नेहरूंनंतरचा पहिलाच पंतप्रधान' अशी प्रशस्ती मोदींनी मिळवली. पं. नेहरूंनी अनेक बाबतीत मूलगामी बदल घडवत देशाला दिशा दिली. मोदींनीही तसे काही करावे, अशी अपेक्षा करूया
No comments:
Post a Comment