Total Pageviews

Sunday, 14 September 2014

KASHMIR FLOODS AN UPDATE

आता रोगराईचा धोका जम्मू-काश्मीरमधील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्याचे संपूर्ण प्रशासन ठप्प झाल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्यामुळे. या राज्यात एखाद्या आकस्मिक घटनेच्या वेळी किती भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची कल्पना यावी. लष्कर, वायुसेना, एनडीआरएफच्या जांबाज जवानांनी रात्रंदिवस राबून मोठीच मदत केल्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असे कृतज्ञतापूर्वक उद्गारही त्यांनी काढले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच हवाई पाहणीत जे अनुभवले, त्यावरून स्थिती किती गंभीर आहे, याचे आकलन त्यांना झाले. गेल्या रविवारी जम्मू आणि काश्मीर अशा दोन्ही भागांची मोदींनी हवाई पाहणी केली आणि उद्या सोमवारपासून वायुसेनेची विमाने आणि हेलिकॉप्टर्स तातडीने मदतीला येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. लगोलग सोमवारला ५० टन मदत सामुग्री घेऊन हर्क्युलस हे वायुसेनेचे महाकाय मालवाहू विमान दाखल झाले आणि मग मदतीचा जो ओघ सुरू झाला, तो संपूर्ण जग विविध वाहिन्यांवर पाहतच आहे. गेल्या आठवडाभरापासून लष्कर, वायुसेना, एनडीआरएफ आणि नाविक दल तेथे जिवाची पर्वा न करता, प्रलयात अडकलेल्यांना शोधून, बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी झटत आहेत. गेल्या पाच दिवसांत पावसाने दिलासा दिल्यामुळे मदतकार्य वेगाने करण्यात या सर्व यंत्रणांना यश येऊन, सुमारे दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात यश आले. पण, आता पाणी जसजसे ओसरू लागले आहे, तसातशा नव्या समस्या समोर आ वासून उभ्या आहेत. ओमर अब्दुल्ला सरकारची आता खरी कसोटी आहे. कारण, १५ ते ३० फूट पाण्याखाली किती लोक होते, त्यांचे पुढे काय झाले, हे कुणालाच माहीत नाही. पाणी ओसरल्यावर आता त्यांचे मृतदेह अडकलेल्या स्थितीत सापडत आहेत. अनेक जनावरेही मृत झाली आहेत. यामुळे तेथे रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे तसे सोपे. पण, अनेक दिवसांपासून पाण्यात बुडालेले, सडलेले मृतदेह आणि जनावरांना बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावणे सर्वाधिक कठीण काम आहे. सर्वांत जिकिरीचे आणि धोक्याचे काम म्हणजे मृत जनावरांची विल्हेवाट! नागपूर जिल्ह्यात मोवाड येथे काही वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात सुमारे २०० जनावरे बुडून मृत्युमुखी पडली होती. ती फुगलेली जनावरे प्रचंड कष्टाने बाहेर काढण्यात आली. या सर्व जनावरांचे जागीच शवविच्छेदन केल्यानंतर २०० मृतदेहांना दोन ट्रक लाकडांवर ठेवण्यात आले. त्यानंतर मातीचे तेल ओतण्यासाठी एक पूर्ण भरलेला टँकरच लागला होता. यावरून मृत जनावरांची विल्हेवाट लावणे किती कठीण काम असते, त्याची कल्पना यावी. मोवाड हे तसे छोटेसे गाव. पण, जम्मू-काश्मीर तर कोट्यवधी लोकसंख्येचे मोठे राज्य. सुमारे दहा लाख लोक महाप्रलयामुळे प्रभावित झाले आहेत. आता पाणी ओसरल्यामुळे किती नागरिकांचा बळी गेला, किती जनावरे मृत झाली, हे हळूहळू कळू लागले आहे. अनेक दिवसपर्यंत हे मृतदेह तसेच पाण्यात पडून राहिल्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा विषारी वायू निर्माण होतो. शिवाय त्यांचे अवशेष पाण्यात मिसळतात व संसर्गजन्य रोगांना बळ मिळते. त्यामुळे या मृतदेहांना बाहेर काढण्याचे मोठेच काम आता लष्कर आणि एनडीआरएफला करावे लागेल. कारण, राज्य शासनाची यंत्रणा तर पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आतापर्यंत या दोन्ही भागातील मृतांचा आकडा अडीचशेच्या वर गेला होता. पण, आता त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत. श्रीनगरच्या जी. बी. पंत इस्पितळात चौदा बालकांचे मृतदेह सापडले आहेत. पूर एवढा भीषण होता की, या इस्पितळाचा बराचसा भाग पाण्यात बुडाला होता. त्यामुळे पाण्यात अडकून या निष्पाप चौदा बालकांना प्राण गमवावे लागले. देवाच्या कृपेने शंभरेक बालकांना तिथल्या स्टाफने व लोकांनी वाचविले होते. लष्कराच्या चमूला ही माहिती मिळताच, त्यांनी तिकडे धाव घेतली आणि या सर्व बालकांना तातडीने श्रीनगरच्या लष्करी इस्पितळात आणले. यापैकी ५० बालकांची प्रकृती चिंताजनक आहे. काही तर नवजात अर्भके आहेत आणि त्यांना चार दिवस दूध न मिळाल्यामुळे अनेक व्याधींनी त्यांना ग्रासले आहे. त्यांच्या आईवडिलांचा अतापता नाही. काही अर्भकांना इनक्युबेटरमध्ये ठेवले आहे. लष्कराच्या या अतुलनीय कार्याचे सर्वच पक्षांनी तोंडभरून कौतुक केले आहे. रोगराई पसरू नये म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली आणि जखमी व आजारी लोकांची विचारपूस करून एकूणच स्थितीचा आढावा घेतला. रोगराई पसरू नये म्हणून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. रोज बारा लक्ष पाण्याच्या बाटल्या तयार करणारी सहा संयत्रे व १०० टन औषधींचा पुरवठा आधीच पाठविण्यात आला आहे. पण, काही नतद्रष्ट नेते या राष्ट्रीय आपत्तीचे राजकारण करीत आहेत. पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती या राजनाथसिंहांशी फोनवरून बोलल्या. त्यांनी तर अजूनही राज्याला केंद्राकडून पुरेशी मदतच मिळाली नाही, अशी अफलातून तक्रार करून नाराजी व्यक्त केली. आठवडाभर त्या आणि त्यांचे कार्यकर्ते झोपले होते का? त्या आणि ते का धावून गेले नाही? लष्कराकडून जे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, ते त्यांना दिसले नाही का? त्या म्हणाल्या, जी काही मदत केली ती लष्कराने आणि काही स्वयंसेवी संघटनांनी. नशीब त्यांनी लष्कराला धन्यवाद दिले! ओमर अब्दुल्लाही म्हणाले की, सहा महिने मोफत धान्य देऊ. कुठून देऊ, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. कालच या राज्यातील मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटले. अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अविरत सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. म्हणजे केंद्र कोट्यवधींचे अन्नधान्य सहा महिने पुरविणार आणि ओमर ते फुकटात वाटून राजकारण करणार? ओमरचे नशीब बलवत्तर, त्यांना मोदींसारखा पंतप्रधान मिळाला. पण, एकीकडे सर्वपक्षीय बैठक बोलवायची आणि स्वत: मात्र राजकारण करायचे, हे ओमर आणि मेहबूबा या दोघांनाही शोभलेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये आलेली ही विपदा राष्ट्रीय आपत्ती आहे. या भीषण स्थितीत सर्व राजकीय पक्षांनी या राज्याच्या मदतीसाठी, पुनर्वसनासाठी आवर्जून मोदी सरकारला साथ देण्याची तयारी दर्शविली आहे. विविध राज्ये, उद्योगपती, वाहिन्या, वर्तमानपत्रे मदतनिधी देत आहेत. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही, गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या. त्यात प्राधान्याने साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी विमानातून मोठमोठे पंप आणावेत, जेसीबी आणि चिखल काढणारी यंत्रे आणावीत, अशी मागणी केली. गृहमंत्रालयाने यापूर्वीच लगतच्या अनेक राज्यांतून असे पाणी उपसणारे मोठमोठे पंप पाठविले आहेत. शिवाय चिखल बाहेर काढण्यासाठी मोठमोठी यंत्रेही पाठविली आहेत. दिल्लीत २४ तास संपर्क ठेवणारी ‘सॅटकॉम’ यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे तेथे आवश्यक असणार्‍या सुविधा पुरविणे सोयीचे झाले आहे. हे सर्व मदतकार्य सुरू असतानाच, काही नतद्रष्टांनी अन्नाची पाकिटे घेऊन येणार्‍या हेलिकॉप्टरवर दगडांचा मारा केल्यामुळे त्याला परत जावे लागले. यापूर्वीही असेच प्रकार घडले आहेत. एनडीआरएफच्या एका जवानाच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. हे नतद्रष्ट कोण? ते पूरग्रस्त असूच शकत नाहीत. याचा अर्थ ते एकतर फुटीरवादी असावेत किंवा पाकिस्तानातील पुराच्या आडोशाने भारताच्या हद्दीत घुसले असावेत. त्यामुळे लष्कराला या आघाडीवरही सतर्क राहावे लागेल.

No comments:

Post a Comment