ऑनलाईन’ रणधुमाळी
लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्येही ‘ऑनलाईन’ प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे. युती आणि आघाडीचा घोळ निस्तरण्यापूर्वीपासूनच प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ मीडियाचा आधार घेतला. भाजपाप्रमाणेच कॉंग्रेस आणि इतर पक्षांना सोशल मीडियाचा प्रभाव कळल्याने त्यांनीदेखील स्वत:चे ‘गल्ली ते दिल्ली’ असे संघटनेतील विविध आघाडी आणि सेलचे खाजगी फेसबुक पेज बनविले आहे. ‘व्हॉट्स ऍप’च्या माध्यमातून काही सेकंदांच्या व्हिडीओ क्लिप पाठवूनदेखील उमेदवार कामाला लागले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रचारासाठी सर्वांना कमी वेळ मिळाला आहे. परंतु, बहुतांश मंडळी ‘ऑनलाईन’ विश्वाच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात असल्याने त्यांना अल्प कालावधीचा विशेष फरक पडलेला नाही. राजकारण्यांची ‘ऑनलाईन’ गरज ओळखून या क्षेत्रातील व्यावसायिकांनीदेखील ‘ऑनलाईन’ प्रचारासाठी आपले ‘रेटकार्ड’ तयार ठेवले आहे. जसे की, तीन भाषांमध्ये संकेतस्थळ, संवादात्मक ब्लॉग बनविण्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च आकारण्यात येतो. फेसबुक पेज बनवून रोज किमान ५ पोस्ट, ४० हजारांवर लाइक्स, ट्विटर अकाउंट, यूट्युबवर व्हिडीयो अपलोडिंग, जी-प्लस, लिंकडीन अकाउंट व संवाद असे सर्वसमावेशक पॅकेज घेतल्यास त्याची किंमत ५ लाखांच्या घरात आहे. केवळ व्हॉइस कॉलमार्फत मतदारांपर्यंत पोहोचायचे असेल तर ३० हजार, व्हॉट्स ऍप किंवा फेसबुकवर डिजिटल बॅनरसाठी १० ते १५ हजार, २० सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपसाठी ५० हजार ते ३ लाख रुपयांचे पॅकेज उपलब्ध आहे. २५ सप्टेंबर २०१४ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार भाजपाला मिळालेले फेसबुक लाईक्स ६३ लाख ७१ हजार ०५८, तर ८ लाख, १६ हजार ४२५ ट्विटर फॉलोअर्स आहेत. कॉंगे्रसला ३४ लाख ३६ हजार ०१९ फेसबुक लाईक्स अणि २ लाख, २६ हजार ३७० ट्विटर फॉलोअर्स आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला २ लाख, ७६ हजार ५०७ फेसबुकवासींनी लाईक केले असून त्यांचे ४१ हजार ८९० ट्विटर फॉलोअर आहेत. या तुलनेत शिवसेना आणि ‘सबकुछ’ राज असलेली मनसे बर्याच मागे दिसून येते. शिवसेनेला १४ हजार ०१२ फेसबुक लाईक्स आणि ८ हजार ३५९ ट्विटर फॉलोअर्स असून मनसेला ६ हजार ४६७ लाईक्स आणि ३ हजार ५२० ट्विटर फॉलोअर्स आहे. यंदा ‘ऑनलाईन’ प्रचारावर निवडणूक आयोगाची नजर राहणार असली, तरी ही ‘ऑनलाईन’ रणधुमाळी मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहू न देण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर राहणार आहे.
- निखिल भुते
No comments:
Post a Comment