तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तान किती वर्षे गोंजारून ठेवणार आहे? पाकिस्तान गेली काही वर्षे स्वतःसाठी एक मोठ्ठा खड्डा खणत आहे, हे निश्चित. भारताला संपविण्याची स्वप्ने पाहणाऱया पाकिस्तानने आजवर जागतिक पातळीवर खोटारडेपणाचा कळस गाठला. गेली काही वर्षे ते पचले परंतु जगभरात विशेषतः ख्रिस्तीबहुल युरोपियन राष्ट्रांमध्ये व अमेरिकेला जेव्हा दहशतवादाची प्रत्यक्षात झळ पोहोचायला सुरुवात झाली, सारे देश खडबडून जागे झाले व पाकिस्तान हा धादांत खोटे बोलणारा देश, पाकिस्तान ही दहशतवाद्यांसाठी स्वर्गभूमी आहे हे जगाने ओळखले. भारतात वारंवार हल्ले करणाऱया दहशतवाद्यांचा म्होरक्या असलेल्या हाफिज सईद याच्या मुसक्या आवळा अशी भारताने वारंवार पाकिस्तानला विनंती करून झाली. पाकिस्तानने उलटपक्षी भारतावरच आरोप सुरू केले मात्र पाकिस्तानची ही नाटके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओळखली व पाकिस्तानची 270 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत बंद करून एक जबरदस्त धक्का दिला. या धक्क्यातून पाक अद्याप बाहेर पडलेले नसतानाच गुरुवारी भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या बारा सैनिकांना कंठस्नान घालून बदला घेतला. या प्रकारामुळे पाकिस्तानला आता जोरदार हादराही बसलेला आहे. दीड आठवडय़ात भारताने दुसऱयांदा पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकविलेला आहे. पाकिस्तान हा आपला एकमेव कट्टर शत्रूदेश आहे. भारताने आतापर्यंत सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. पाकिस्तानशीही ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु सापाला कितीही दूध पाजले तरी तो विषमुक्त होत नाही. कडुनिंबाच्या झाडाच्या मुळात कितीही साखर टाकली तरी ते झाड आपला कडवटपणा काही सोडणार नाही. भारताने पाकिस्तानला कितीही मदत केली आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तरी ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान आर. पी. हाजरा हे आपल्या वाढदिनीच हुतात्मा झाले. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने आपल्या सवयीनुसार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर हे दुर्दैवाने हुतात्मा झाले. भारतीय जवानांनी हाजरा यांच्या निधनानंतर पाकचा बदला घेण्याची गर्जना करून ‘एक का बदला दस से!’ याप्रमाणे भारतात राहून पाकिस्तानवर हल्ला न चढविता पाकिस्तानात घुसून पाकच्या एक डझन सैनिकांचा खात्मा केला. त्यावेळी भारतीय बहादूर जवानांचा आत्मा शांत झाला. गेले काही महिने सातत्याने पाक सैनिकांकडून भारतावर हल्ले होत आहेत. ते परतविण्याचे काम भारताने वारंवार केले खरे, परंतु नववर्षाच्या पहिल्याच सप्ताहात भारतीय लष्कराने पाकचे गुन्हे सव्याज परत केले. भारताने जी शौर्य कामगिरी शुक्रवारी बजावली त्याला तोड नाही. आजवर भारताने पाकिस्तानकडून खूप काही सोसले परंतु भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही. शांतताप्रिय म्हणून किती हल्ले सहन करायचे? गुरुवारचा भारताने केलेला हल्ला म्हणजेच दोन आठवडय़ातील हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक आहे. यापूर्वी 25 डिसेंबर रोजी देखील भारताने पाकमध्ये घुसून त्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. इंग्रजीत म्हण आहे ‘टिट फॉर टॅट’. भारताने पाकिस्तानला जशास तसे नव्हे तर सव्याज सारे काही दिलेले आहे व हे व्याज कितीतरी जास्त पटीने वसूल करून घेतले. आता यानंतर भारताचे हेच धोरण असणे आवश्यक आहे. भारतापासून आपल्याला धोका आहे व भारत काही आता गप्प बसणार नाही, असा एक चांगला संदेश या निमित्ताने का होईना पाकिस्तानलाही पोहोचला व पाकिस्तानचे लाड पुरविणाऱया चीनलाही पोहोचायला काही वेळ लागलेला नाही. पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरलेला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो व अनेक नवयुवकांना दहशतवादाचे प्रशिक्षण देऊन भारतात पाठवतो, मात्र भारतीय हद्दीत घुसलेले बहुतांश दहशतवादी हे परत मायभूमीत पोहोचलेले नाहीत. एका बाजूने अमेरिकेने अर्थपुरवठा बंद करून पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एवढी कडक कारवाई त्या राष्ट्राविरोधात केलेली आहे व या कारवाईमुळे पाकिस्तान जर्जरावस्थेत पोहोचलेला आहे. भारताने एकाच्या बदल्यात बारा हे तसे योग्य प्रमाण ठरविलेले आहे. पाकिस्तानला भारताने गुरुवारी जो धडा शिकविला त्यातून पाकिस्तानने बोध घ्यावा व धडाही शिकावा! याउपर भारताच्या वाटय़ाला जाल तर परिस्थिती बिकट होईल, असा संदेश या सर्जिकल स्ट्राईकमधून पाकला पोहोचविला आहे व तो देखील बेधडक कृतीतून. भारताने गुरुवारी जे पाऊल उचलले ते अत्यंत क्रांतिकारी आहे. ही केवळ सुरुवात आहे व हिमनगाचे टोक असून हिमपर्वत अद्याप खालीच आहे. पाकिस्तानला कोणीतरी धडा शिकविण्याची आवश्यकता होती. अमेरिकेने एका मागोमाग एक असे दोन धक्के देऊन पाकिस्तानचे सारे अर्थसाहाय्य रोखलेले आहे. आता भारताने एका पाठोपाठ एक असे दोन सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकविलेला आहे व तो पाकिस्तानच्या कायम स्मरणात राहील. दहशतवाद्यांना पोसणाऱया, त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱया पाकिस्तानला अद्दल घडविणे अत्यंत आवश्यक होते. भारत काही गप्प बसणारा नाही, हे भारताने पुन्हा एकदा दाखवून देऊन पाकिस्तानचे पितळ उघडे पाडलेले आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला चढविला तर जगात चीन वगळता कोणत्या देशाला वाईट वाटणार तर नाहीच उलटपक्षी सारे जग भारताचे समर्थन करील. पाकिस्तान म्हणजे काय चीज आहे याची जाणीव आता साऱया जगाला झालेली आहे. गुरुवारी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या दणक्याने पाक हादरला नसेल तर नवल! यानंतर भारताकडे वक्रदृष्टीने पाहण्याचा धीर पाकला होणार नाही. भारतीय जवानांनी जो कणखरपणे घेतलेला निर्णय पाकिस्तानला यानंतरच्या कडक इशाराच आहे.
No comments:
Post a Comment