Total Pageviews

Saturday, 13 January 2018

धुळ्याचे लान्स नायक योगेश भदाणे जम्मूत शहीद

पाकिस्तानने आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सुंदरबनी क्षेत्रातल्या भारतीय सैन्याच्या तळावर गोळीबार केला. भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र, यात लान्स नायक योगेश मुरलीधर भदाणे शहीद झाले. योगेश भदाणे (२८) हे धुळे जिल्ह्यातल्या खालाणे गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी पूनम आणि कुटुंबीय आहेत. पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तरात भदाणे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांना वीरमरण आले.
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत आणि जबाबी हल्ल्यांमध्ये सन २०१७ मध्ये पाकिस्तानचे १३८ सैनिक मारले गेले व १५५ जखमी झाले. गुप्तवार्ता संस्थांच्या सूत्रांनी ही माहिती देताना सांगितले की, याच काळात काश्मिरमध्ये २८ भारतीय जवानांना वीरमरण आले तर ७० जवान जखमी झाले. सूत्रांनुसार गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानकडून केले जाणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन व सीमेपलिकडून केला जाणारा गोळीबार याला लगेचच्या लगेच आणि जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे खंबीर धोरण अवलंबिले.
गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये भारतास सोसाव्या लागलेल्या मनुष्यहानीच्या आकड्यास लष्कराने दुजोरा दिला. परंतु पाकिस्तानचे नेमके किती सैनिक मारले गेले वा जखमी झाले याचा आकडा दिला नाही. मात्र पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या प्रत्येक उल्लंघनाचे चोख प्रत्युत्तर दिले गेले, यावर लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी भर दिला.
सीमेवरील हिंसक घडामोडींमध्ये मारल्या जाणा-या लष्करी जवानांच्या नेमक्या आकड्याची कबुली पाकिस्तान सहसा देत नाही. अनेक वेळा मृतांचा आकडा कबुल केला जातो, पण ते लष्करी जवान नव्हे तर नागरिक होते, असा दावा केला जातो. त्यामुळे अशा आकडेवारीसाठी गुप्तवार्ता सूत्रांवर अवलंबून राहावे लागते. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ष २०१७ मध्ये पाकिस्तानने काश्मिरमध्ये ८६० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याआधीच्या वर्षी २२० अशा घटना घडल्या होत्या, म्हणजेच सरत्या वर्षात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना खूपच वाढल्या.

गेल्या वर्षभरात चीनने केली ४१५ वेळा घुसखोरी
गेल्या वर्षी डोकलामवरून भारत व चीन यांच्यात ७३ दिवस झालेला तणाव सर्वांना माहीत आहे. पण २0१७ मध्ये चीनने तब्बल ४१५ वेळा भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. चीनच्या सैनिकांनी २0१६मध्ये २७१ वेळा नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचे प्रयत्न केले होते.

नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये २३ वेळा गंभीर वादाचे प्रसंग घडले. लडाख, केडेमचौक, चुमार, पेंगोंग, स्पांगूर गॅप, हिमाचल प्रदेशमधील कौरिक, उत्तराखंडमधील बाराहोती, अरूणाचल प्रदेशातील नमका चू, सुमदोरोंग चू, असफिला व दिबांग घाट आदी भागांत या घटना घडल्याचे सैन्य दलाचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment