Total Pageviews

Wednesday 3 January 2018

पुन्हा एकदा जेएनपीटी परिसरातून कोट्यावधी रूपये किंमतीचे सोने पकडले


 जेएनपीटीतून तस्करी करून आणलेले १५ किलो सोने पकडल्याची घटना ताजी असतानाच आज बुधवारी पुन्हा एकदा तशाच प्रकारे तस्करी करून आणलेले आणखी १५ किलो सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या प्रकारामुळे जेएनपीटी पुन्हा एकदा तस्करीचा अड्डा ठरू पहात आहे, हे सिध्द होत आहे.
२९ डिसेंबरला उरण तालुक्यातील जीडीएल गोदामातून एसीच्या यंत्रामध्ये लपवून आणलेले १५ किलो सोने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा उरण तालुक्यातील कोप्रोली गावाजवळील ग्लोबिकॉन लॉजिस्टिक या गोदामात १५ किलो सोने पकडण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे जेएनपीटीतून स्कॅन करून हे कंटेनर आणण्यात आले होते. त्या स्कॅनिंग मध्ये हे सोने आढळले नव्हते. मॅन लॉजिस्टिक या सीएचए एजंटने हे दोन्ही कंटेनर आयात केले होते. आणि ते इथपर्यंत आणले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कस्टम कडून मालाची तपासणी सुरू होती. १५ खोक्यामध्ये १५ किलो सोने सापडले असल्याची माहिती गोदामातील कामगारांकडून देण्यात आली. मात्र अद्याप असे बरेच खोके तपासायाचे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
चार दिवसात दोन सोने तस्करीच्या घटना घडल्याने पुन्हा एकदा जेएनपीटी आणि सीमाशुल्क विभागाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. कंटेनर स्कॅन होवून सुद्धा सोने दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नुकतेच पकडलेल्या ग्लोबिकॉन लॉजिस्टिक मध्ये १ जानेवारीपासून येथे माल चढउतार करणाऱ्या कामगारांना कंपनी बाहेर काढले आहे. त्यामुळे यामध्ये संशयाचे जाळे ग्लोबिकॉनच्या अधिकाऱ्यांवर देखील जाते. तसेच या कंपनीतील अधिकाऱ्यांचे यापूर्वी रक्त चंदन व एलसीडी टिव्ही तस्करी प्रकरणातही नाव घेतले जात होते. त्यामुळे संशयाची सुई अधिकाऱ्यांकडे वळत आहे. या बाबत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. त्यांनी पोलिसांना आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनाही या मालाजवळ फिरकू दिले नाही.

देर आए, दुरुस्त आए…!

 जन्मापासूनच अमेरिका पाकिस्तानला पोसत आला. तोच पाकिस्तान दगाबाज देश आहे, असे अमेरिकेने आता जाहीर केले आहे. दगाबाजी, कपट, फसवणूक आणि पाठीत वार करणे हे पाकिस्तानच्या रक्तातच भिनले आहे. आजवर हिंदुस्थानने याचे अनेक कटू अनुभव घेतले. तेच आता अमेरिका अनुभवते आहे. उशिरा का होईना अमेरिकेला या विषाची परीक्षा झाली आहे. देर आए, दुरुस्त आए…’ एवढेच!
पाकिस्तान हा एक नंबरचा दगाबाज आणि धोकेबाज देश आहे, असा साक्षात्कार अखेर अमेरिकेला झाला आहे. गेली कित्येक वर्षे अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सची आर्थिक रसद पुरवणाऱ्या महासत्तेला उशिरा का होईना पाकड्यांचा खरा चेहरा समजला हे बरेच झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षातील पहिले ट्विट पाकिस्तानला उद्देशून केले आहे. या ट्विटद्वारे पाकिस्तानचे वाभाडे काढतानाच ट्रम्प यांनी पाकिस्तानला दमबाजीही केली आहे. अमेरिकेने आजवर पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सची आर्थिक मदत केली. तथापि या मदतीच्या मोबदल्यात दहशतवाद आणि अतिरेक्यांना आश्रय देऊन पाकिस्तानने अमेरिकेची घोर फसवणूक केली. पाकला मदत करणाऱ्या आजवरच्या अमेरिकी नेत्यांनी आपली गणना मूर्खांमध्ये करून घेतली आहे. मात्र आता असे होणार नाही’, असे महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर केले आहे. एवढेच नाही तर अमेरिकेशी दगलबाजी करणाऱ्या पाकिस्तानची २५५ दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत रोखण्याचे संकेतही अमेरिकेने दिले आहेत. खरे तर अमेरिकेने हे पाऊल आधीच उचलायला हवे होते. ९/११ च्या हल्ल्यापासून ते ओसामा बिन लादेनच्या अबोटाबादमधील एन्काऊंटरपर्यंत अनेक वेळा पाकिस्तानचा असली चेहराजगासमोर येऊनही अमेरिकेने पाकिस्तानला
आर्थिक मदतीचा रतीब
सुरूच ठेवला होता. दहशतवादविरोधातील लढाईसाठी आर्थिक सहाय्यया गोंडस नावाखाली महासत्ता दरवर्षी पाकिस्तानात आपली तिजोरी रिकामी करत राहिली. मात्र लादेनसारख्या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूला पाकिस्तानने कित्येक वर्षे लपवून ठेवले. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला खरा; पण त्यानंतरही अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत न थांबवता ती रसद सुरूच ठेवली होती. पाकिस्तान अमेरिकेला आणि अमेरिकेच्या नेत्यांना आजवर बेवकूफ बनवत राहिला, असे ट्रम्प महाशय आज जे म्हणत आहेत ते खरेच आहे. मात्र पाकिस्तानकडून होणारी दगाबाजी उघड्या डोळ्याने साऱ्या जगाला दिसत असतानाही अमेरिकेचे पूर्वासुरीचे राष्ट्राध्यक्ष या विषारी नागाला दूध का पाजत राहिले? अमेरिकेचा कट्टर हाडवैरी असलेल्या चीनच्या मांडीवर बसून पाकिस्तानचे बाळ अमेरिकन बाटलीने दूध पित राहिले आणि दहशतवादविरोधातील लढाई मात्र आहे तिथेच राहिली, हे वास्तव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही आता यावरच बोट ठेवले आहे. ज्या दहशतवाद्यांशी आम्ही लढत आहोत, ज्या संघटनांशी अफगाणिस्तानात आमचे युद्ध सुरू आहे त्यांनाच पाकिस्तान आपल्या भूमीवर आश्रय देत आहे. याच लढाईसाठी मदत म्हणून गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलर्सची भरमसाट रक्कम दिली. मात्र इतकी वर्षे पाकिस्तान अमेरिकेला केवळ झुलवत राहिला. भूलथापा देत राहिला. पाकिस्तानची ही फसवणूक आणि दगलबाजी अमेरिकी नेत्यांना मूर्खात काढणारी आहे, असे ट्रम्प महाशयांना आज वाटते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंध आणि
मुत्सद्देगिरीतील सर्व शिष्टाचार
बाजूला ठेवून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानवर प्रथमच इतक्या तिखट शब्दांत आगपाखड केली आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून वारंवार पाकिस्तानला इशारे दिले गेले, मात्र पाकिस्तानच्या वर्तनात काडीचाही बदल झाला नाही. त्यामुळेच अमेरिकेने आता निर्वाणीची भाषा वापरली आहे. अर्थात अमेरिकेने अशी दमबाजी केली म्हणून पाकिस्तान लगेच सुतासारखा सरळ होईल असेही नाही. उलट गिरे तो भी टांग उपरया उफराट्या तत्त्वानुसार पाकिस्ताननेच आता ट्रम्प यांच्या जहाल ट्विटवरून थयथयाट सुरू केला आहे. पाकिस्तानला खोटारडाआणि कपटीठरवणारे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी राजदूताला पाचारण करून या ट्विटचा जाब विचारला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनीही ट्विट करून ट्रम्प यांच्या ट्विटचे लवकरच उत्तर देऊ, सत्य काय आहे ते जगाला सांगू, असे जाहीर केले आहे. पाकिस्तानने लादेनचे लष्करी संरक्षणात पालनपोषण केले आणि अफगाणिस्तानात घातपाती कारवाया करणाऱया हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानचे खुलेआम संरक्षण आहे, हे सत्य पाकिस्तान जगाला कोणत्या तोंडाने सांगणार आहे? जन्मापासूनच अमेरिका पाकिस्तानला पोसत आला. तोच पाकिस्तान दगाबाज देश आहे, असे अमेरिकेने आता जाहीर केले आहे. दगाबाजी, कपट, फसवणूक आणि पाठीत वार करणे हे पाकिस्तानच्या रक्तातच भिनले आहे. आजवर हिंदुस्थानने याचे अनेक कटू अनुभव घेतले. तेच आता अमेरिका अनुभवते आहे. उशिरा का होईना अमेरिकेला या विषाची परीक्षा झाली आहे. देर आए, दुरुस्त आए…’ एवढेच!


No comments:

Post a Comment