भारताच्या ६९ व्या गणराज्य दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते, लष्करात अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन घडवीत, आपल्या राष्ट्रकर्तव्यासाठी शहीद झालेल्या जवानांना अशोकचक्र, शौर्यचक्र प्रदान करण्यात येते. यंदा हे अशोकचक्र, गरुड कमांडो शहीद ज्योतिप्रकाश निराला यांना मरणोत्तर बहाल करण्यात आले. त्याचा स्वीकार करण्यासाठी जेव्हा ज्योतिप्रकाश यांच्या वीरमाता मालतीदेवी आणि वीरपत्नी सुषमा या व्यासपीठावर आल्या, तेव्हा परिपाठीनुसार शहीद जवानांच्या शौर्य आणि त्यांनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात येते. ती माहिती संपल्यावर अशोकचक्र राष्ट्रपतींनी मालतीदेवी आणि सुषमा यांना प्रदान केले. त्यानंतर ते आसनस्थ झाले. पण, त्यांचे डोळे पाणावले होते. भारतीय वायुसेनेचे विशेष पथक गरुड कमांडोज् युनिटचे कार्पोरल ज्योतिप्रकाश यांचे वय अवघे ३१ वर्षांचे. १८ नोव्हेंबर २०१७ रोजी जम्मू-काश्मीरमधील बांदीपूर जिल्ह्यात चंदरगीर येेथे एका घरात अतिरेकी लपून बसले असल्याची कुणकुण लागताच, निराला यांनी आधी त्यांचे पळून जाण्याचे मार्ग रोखून धरले आणि त्यांना आव्हान दिले. अतिरेक्यांनी निराला यांच्या बाजूने गोळीबार सुरू केला. गोळ्या लागूनही ते डगमगले नाहीत. एकेकाला टिपण्याकडेच निराला यांचे लक्ष केंद्रित झाले होते. आपल्या तत्कालीन व्यूहरचना आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचा वापर करीत, अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन घडवीत सहाही अतिरेक्यांना यमसदनी पाठविले. यात लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख झकी उर रहमान लखवी याच्या पुतण्यासह दोघांचा समावेश आहे. पण, शरीराला खूपच गोळ्या लागल्याने अनेक ठिकाणी झालेल्या जखमा आणि रक्तप्रवाह यामुळे अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.
ज्योतिप्रकाश निराला यांनी देशाच्या रक्षणासाठी लढताना, आपल्या प्राणाची जी आहुती दिली, त्याचे वर्णन ऐकून कुणाचेही डोळे पाणावल्याशिवाय आणि पाकिस्तानबाबत तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहायची नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सारा देश हे दृश्य पाहात होता. साक्षीदार होते आसियान परिषदेचे दहा राष्ट्रप्रमुख. तेथे उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले होते, हेही वाहिन्यांवर दिसले. या गणतंत्रदिनी जे अधिकारी-कर्मचारी तैनात होते, त्यांच्या मनातील दु:खही स्पष्टपणे झळकत होते. आपल्या देशाच्या रक्षणासाठी अशा अनेक शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. अशोकचक्र स्वीकारल्यानंतर ज्योतिप्रकाश यांची वीरपत्नी सुषमा म्हणाल्या, मी आपल्या मुलीलापण मोठी झाल्यावर लष्करातच पाठवीन. माझ्या पतीने देशाचे रक्षण करताना वीरगती पत्करली, त्याचा मला गर्व आहे. युवकांना लष्करात जाण्याची प्रेरणा देणारा हा अशोकचक्र प्रदान कार्यक्रम होता. याशिवाय गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी आपले कर्तव्य बजावताना असामान्य शौर्य दाखविणार्या जवानांना शौर्यचक्र देण्याची घोषणा केली. त्यात सहा लष्करी जवानांचा समावेश असून दोेन जवानांना मरणोत्तर शौर्यचक्र घोषित झाले आहे. १७ हजार फूट उंचीवर आयटीबीपीच्या जखमी जवानाला, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी आणणे, छत्तीसगडमध्ये घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा गोळीबार सुरू असताना, जखमी जवानांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी आणताना, दोन गोळ्याही हेलिकॉप्टरला लागल्या. अशाही स्थितीत अतिशय घनदाट जंगलातून जखमींना सुकमा येथे सुरक्षितरीत्या आणणे यासाठीही दोन जवानांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
गणराज्यदिन देशभरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. ६९ वर्षांपूर्वी २६ जानेवारी १९५० ला भारताला आपले संविधान मिळाले होते आणि भारत हे गणराज्य म्हणून अस्तित्वात झाले होते. देशात अनेक ठिकाणी संविधानाची शपथ देण्यात आली. जागोजागी तिरंगा फडकावण्यात आला. अगदी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) पथकाने १७ हजार फूट उंचीवर उणे ३० डीग्री तापमानातही, जमलेल्या बर्फात तिरंगा फडकावून सलामी दिली. याला म्हणतात राष्ट्रप्रेम! तिरंग्याविषयी आणि आपल्या संविधानाविषयी स्वाभिमान. पण, काहीनी संविधानदिनाला गालबोट लावण्याचे महापाप केले. मुंबईत त्यांनी संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीत, ‘पीओके तुम्हारे बापका नही, वो पाकिस्तान का हैं, उसपर भारत का कोई हक नही, पाकिस्तानके पास भी बम हैं, ये भारत को भुलना नही चाहिये...’ अशा वल्गना करणारे फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला, न्यायमूर्ती चेलमेश्वर यांची राजकीय उद्देशाने प्रेरित पत्रपरिषद संपल्यावर लगेच त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाकपा नेते डी. राजा, ज्यांचा संविधानावर नाही तर चीनवर विश्वास आहे, असे माकपाचे सीताराम येचुरी, ‘पुलिस को जला दो, पुलिस को मार डालो’ असे म्हणणारा- ज्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे- असा पाटीदार नेता हार्दिक पटेल, ज्यांचा या देशाच्या संविधानावर विश्वास नाही, लोकशाहीवर विश्वास नाही, असे नेते राष्ट्रप्रेमी कसे काय असू शकतात ? फारुख अब्दुल्ला यांना राष्ट्रप्रेमी म्हणता येईल ? चीनचे गोडवे गाणार्या आणि ज्यांचा चीनच्या विस्तारवादी धोरणाला खुला पाठिंबा आहे, त्यांना राष्ट्रप्रेमी म्हणता येईल ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या अतिरेकीधार्जिण्या संघटनेकडून आर्थिक मदत घेण्यात कसलीही लाज वाटली नाही, तो जिग्नेश मेवाणी कसा काय राष्ट्रप्रेमी असू शकतो? असे अनेक प्रश्न रॅलीत जे देशप्रेमी आले नाहीत, त्यांच्या मनात आहेत. त्याचे उत्तर आधी या रॅली काढणार्यांनी दिले पाहिजेत. खरे राष्ट्रप्रेमी आणि संविधानाचे रक्षणकर्ते आमचे शूरवीर जवानच आहेत,
No comments:
Post a Comment