Total Pageviews

Sunday, 7 January 2018

भारतीय लष्कर आणि आजचे भारतीय नेतृत्व यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

4 जानेवारीला भारतिय सैन्याने पाकिस्तानच्या 12 ते 15 सैनिकांना ठार केले. एवढेच नाही, तर भारताच्या हद्दीत गोळे डागणार्‍या दोन चौक्याही उद्ध्वस्त केल्यात. 3 जानेवारीला पाकिस्तानच्या लष्कराने अचानक भारतीय हद्दीत गोळीबार करून एका सैनिकाचा जीव घेतला होता. भारतीय लष्कराने लगेच दुसर्‍या दिवशी एकाच्या बदल्यात 15 पाकडे ठार केलेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या चौक्या नष्ट केल्यात. ही बातमी पत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलविणारी आहे. परंतु, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या बातमीला गौण महत्त्व दिले. कदाचित भारताने बदला घेणे हे नित्याचेच झाले आहे, असे त्यांना वाटू शकते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतीय सैनिकांच्या हौतात्म्याचा बदला घेणे सुरू झाले आहे. तोपर्यंत केवळ कडक निषेध करण्यात येत होता. सरकारच्या मानसिकतेत झालेल्या या बदलाचे सर्व भारतीयांनी स्वागत केले आहे. देशाच्या दुश्मनांना दयामाया दाखवायचीच नाही, हे धोरण मोदी सरकारने ठरविले आहे. असे धोरण ठरविणे कठीण असते. दहशतवादात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. अनेक राजकीय नेत्यांपर्यंत लागेबांधे जुळलेले असतात. विविध दबाव गट कार्यरत असतात. ही मंडळी कधीच उघड होत नाही. कुठेही थेट मागणी नसते. अशा सर्व कियाशील घटकांना बाजूला सारून राष्ट्रहिताचे निर्णय घ्यावे लागतात. साधारण राजकारणी मंडळी हे असले निर्णय घेण्यास कचरतात. कारण त्यासाठी फार मोठी किंमत चुकवावी लागते आणि ती देण्यास कुणीच तयार नसते. त्यामुळे आधीपासून जे चालू आहे, जसे चालू आहे, ते तसेच चालू ठेवण्याला या मंडळींचे प्राधान्य असते. मोदी सरकारने या मळलेल्या वाटेने जाण्यास नाकारले. पण, त्यांच्या मार्गात काटे कसे पेरता येतील, यासाठी अनेक जण कामी लागले. देशाची सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा या बाबतीत तरी असला प्रकार घडायला नको होता. पण तो भारतात घडत आहे. सांगण्याचा मुद्दा हा की, भारताने दुश्मनांच्या विरोधात जे कठोर आणि जशास तसे धोरण स्वीकारले आहे, त्याने दुश्मन प्रतिकिया देणारच. स्वीकारलेले कडक धोरण मवाळ करण्याची पाळी भारतावर यावी, असेच पयत्न हे दुश्मन करणार. त्यात नवलही नाही. परंतु, अशा या वातावरणात आम्ही भारतीय, देशभक्त म्हणून कसे वागतो, हे महत्त्वाचे आहे. पाकिस्तानची निर्मितीच मुळी भारतद्वेषातून झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत, पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्वाला तसे पाहिले तर फार गांभीर्याने बघितले जात नाही. कारण तुमच्या शत्रूला जगानेही शत्रू म्हणून स्वीकारले पाहिजे, असा काही नियम नाही आणि तसे होतही नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्या राजनीतीने शत्रूची घेरेबंदी करावी लागत असते. असे म्हणणे चूक ठरणार नाही की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रभावी अशी घेरेबंदी नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळातच झाली आहे.


आपली घेरेबंदी होत आहे, हे न कळण्याइतपत पाकिस्तान मूढ नाही. ही घेरेबंदी अप्रत्यक्ष असल्याने त्याविरुद्ध एकदम बोंबही ठोकता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानला दुसरी आघाडी उघडणे कमप्राप्त आहे. जगासमोर, आमच्यावरदेखील भारत युद्धसदृश परिस्थिती लादतो आहे, हे मांडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हे जागतिक आर्थिक हितसंबंधांवर अवलंबून असते. जगाच्या राजकारणात प्रत्येक देश स्वार्थी असतो आणि त्यात काहीही चूक नाही. त्यामुळे आपल्या आर्थिक हितसंबंधांना तर धक्का पोहोचत नाही ना, याची खात्री प्रत्येक देश करून घेत असतो आणि त्यावरच त्याची प्रतिकिया अवलंबून असते. एकेकाळी पाकिस्तान हा अमेरिकेच्या गळ्यातला ताईत होता. परंतु, दहशतवादाने अमेरिकेला पोळले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, पाकिस्तानशी मैत्री घातक ठरू शकते. अमेरिकेने हळूहळू पाकिस्तानला दूर सारणे सुरू केले. परंतु, चीनवर दबाव ठेवण्यासाठी अमेरिकेला भारताच्या सहकार्याची गरज होती. काँगेसचे सरकार कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली असल्याने ते अमेरिकेला हवे तसे सहकार्य देण्यास तयार नव्हते. त्यामुळे नाइलाजाने का होईना, अमेरिकेला पाकिस्तानवर अर्थकृपा करणे भाग होते. या स्थितीचा फायदा चीनने उचलला नसता तरच नवल होते. त्याने पाकिस्तानला आपल्या कळपात ओढणे सुरू केले. परावलंबी पाकिस्तानला कुणीतरी पाठीशी असणे गरजेचे होते. त्याने चीनशी चुंबाचुंबी सुरू केली. दरम्यान, भारतात राष्ट्रवादी विचारसरणीचे तसेच कम्युनिस्टांच्या दगाबाज वृत्तीला नाकारणारे सरकार आले आणि अमेरिकेने पाकिस्तानला वेगाने दूर सारणे सुरू केले. नरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे आज पाकिस्तान जगात एकटा पडला आहे. नाही म्हणायला त्याच्या पाठीशी चीन आहे. परंतु, बाकी बहुतेक देश पाकिस्तानपासून दूर गेले आहेत. सौदी अरब, इराण, अफगाणिस्तानदेखील! ही कोंडी फोडण्यासाठी पाकिस्तानला कुठेतरी मुसंडी मारणे भाग आहे. पाकिस्तानसाठी भारताची सीमा ही सर्वात योग्य जागा आहे. त्यामुळे तो तिथे वारंवार धुमाकूळ घालत असतो. पूर्व पाकिस्तानचा भाग भारतामुळे वेगळा झाला, याची जखम पाकिस्तानींच्या मनात आहे. तिला कुरवाळण्यासाठी त्याला काश्मिरात हिंसाचार सतत धगधगत ठेवणे अपरिहार्य आहे. ते तो करत आहे. नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तान व काश्मिरी दहशतवाद्यांच्या विरोधात दयामाया दाखविणे बंद केल्यामुळे पाकिस्तानला भारतीय सीमेवर हिंसाचार करणे, हाच एकमेव मार्ग राहिला आहे. नरेंद्र मोदींच्या या धोरणामुळे सीमेवरील हिंसाचार कमी झालेला नाही, याचा दाखला देत मोदींचे विरोधक नेहमी आकमक होत असतात. परंतु, त्यांना ही परिस्थिती तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज नसेल, असे म्हणता येणार नाही, तरीही त्यांचा विरोधासाठी विरोध सुरूच असतो. सर्वसामान्य भारतीयांनी हे सर्व समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही पाकिस्तानचे शे-पाचशे सैनिक मारले म्हणून लगेच पाकिस्तान कुरापती करणे सोडून देईल, अशी अपेक्षा करणे गैर आहे. परंतु, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्याने पाकिस्तानच्या सैन्याचे मनोबल खच्ची होत असते. तेही फार आवश्यक आहे. भारताचे धोरण असेच आकमक राहिले, तर सुमारे 70 वर्षांपासूनचा हा भारत-पाक संघर्ष हळूहळू विझत जाईल, यात शंका नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात संयमाला व योग्य संधीच्या प्रतीक्षेला फार महत्त्व असते. आम्हा भारतीयांनीदेखील तो संयम दाखविला पाहिजे. विरोधकांच्या अपप्रचाराला यत्किंचितही बळी न पडता, भारतीय लष्कर आणि आजचे भारतीय नेतृत्व यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. 4 जानेवारीच्या भारताच्या जबर तडायाचा हाच संदेश आहे!

No comments:

Post a Comment