कोकण
रेल्वे मार्गावरील बाळ्ळी येथील लॉजिस्टिक पार्कमुळे नजीकच्या काळात थेट गोव्याहून
मुंबई-जेएनपीटीपर्यंत कंटेनरची वाहतूक सुरू होणार आहे. बंदराच्या विकासाला चालना
देण्यासाठी कोकण रेल्वे थेट बंदरांना जोडण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रमही हाती
घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात कोकण रेल्वेचा चेहराच बदलेल, असे चित्र आहे.
हिरव्यागार
वनराईतून आणि डोंगर कपा-यातून धावणारी कोकण रेल्वे सा-यांनाच आकर्षणाचा विषय ठरली
आहे. आता या कोकण रेल्वेला आधुनिकतेची साज चढवत ती अधिक वेगवान करण्याचा प्रयत्न
सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन वर्षात कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान होणार आहे.
मुंबई आणि मेंगळुरूला जोडणा-या कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरण, विद्युतीकरणाची कामे वेगाने सुरू झाली
असून, या मार्गाची क्षमता दुपटीने वाढणार
आहे. कोकण रेल्वे मार्गावरील बाळ्ळी येथील लॉजिस्टिक पार्कमुळे नजीकच्या काळात थेट
गोव्याहून मुंबई-जेएनपीटीपर्यंत कंटेनरची वाहतूक सुरू होणार आहे. बंदराच्या
विकासाला चालना देण्यासाठी कोकण रेल्वे थेट बंदरांना जोडण्याचा महत्त्वपूर्ण
कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात कोकण रेल्वेचा
चेहराच बदलेल, असा विश्वास कोकण रेल्वेचे
व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
कोकण
रेल्वे मार्गावर सुरू असणारे विद्युतीकरणाचे काम, क्रॉसिंग स्टेशनची होत असलेली उभारणी, बाळ्ळी येथील लॉजिस्टिक पार्क, स्वच्छ
रेल्वे स्थानक निर्मितीकडे सुरू असणारी वाटचाल या संदर्भात माहिती देण्यासाठी कोकण
रेल्वेकडून नुकतेच पत्रकार दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. उडपी येथून सुरू
झालेल्या दौ-याची सांगता मडगाव येथे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय
गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेने झाली. तीन दिवसांच्या या दौ-यात कोकण रेल्वेच्या
विविध कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी कोकण रेल्वेकडून हाती घेण्यात आलेल्या
महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती श्री. गुप्ता यांनी पत्रकारांना दिली. कोकण
रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान करताना रेल्वेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यादृष्टीने कोकण रेल्वेकडून आवश्यक
पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये रेल्वेच्या दुपदरीकरणाबरोबरच संपूर्ण मार्गाच्या
विद्युतीकरणाच्या कामाला कोकण रेल्वेकडून सुरुवात झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर
दोन टप्प्यात विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात रोहा ते वेरणा आणि
वेरणा ते ठोकूर असे हे विद्युतीकरण केले जाणार आहे. रोहा ते वेरणापर्यंतच्या
विद्युतीकरणाचे काम एल अँड टी कंपनीला तर वेरणा ते ठोकूपर्यंतचे काम कल्पतरू
कंपनीला देण्यात आले आहे. विद्युतीकरणाच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च
अपेक्षित आहे. येत्या तीन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.
सध्या
डिझेलवर कोकण रेल्वेचा सुमारे ३५० कोटी रुपये खर्च होतो. विद्युतीकरणामुळे दीडशे
कोटीपर्यंत बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्नही यातून होणार आहे. त्यामुळे
विद्युतीकरणाचे काम गतीने पूर्ण केले जात आहे. सद्यस्थितीत विद्युतीकरणाच्या
सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, आता
मार्गावर यासाठी आवश्यक पिलर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली जात आहे. यासाठी
फाऊंडेशन घालण्याचे काम मार्गावर युद्धपातळीवर सुरू झाले आहे. विद्युतीकरणाचा मोठा
फायदा कोकणात विकसित होणारी बंदरे आणि उद्योगांना होणार आहे. त्यांचा वाहतूक खर्च
कमी होणार आहे.
‘कोरे’चा स्वच्छता दूत..
केंद्र
सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या
स्वच्छतेकडेही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यामध्ये कुमठा रेल्वे स्थानकातील
स्वच्छतेचे काम लक्षवेधी ठरले आहे. स्वच्छतेचा ध्यास घेतलेले राजस्थान येथील एस.
आर. पटेल या अवलियाने कुमठा रेल्वे स्थानक दत्तक घेऊन स्वखर्चाने या रेल्वे
स्थानकांची स्वच्छता करण्यावर भर दिला आहे. कर्नाटक येथील कुमठा येथे कपडय़ांचे
व्यावसायिक म्हणून गेल्या ३० वर्षापूर्वी स्थायिक झालेले, श्री. पटेल यांनी कुमठा स्थानकाच्या
साफसफाईचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी त्यांनी २० कामगारांची नियुक्ती केली
आहे. कोकण रेल्वेकडून दैनंदिन स्वच्छतेचे काम हाती घेतले जात असले तरी, श्री. पटेल यांनी या कामात विशेष रस
घेत सा-यांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
स्थानिकांना
प्राधान्य
कोकण
रेल्वेत सर्वप्रथम प्रकल्पग्रस्तांनाच प्राधान्य दिले जात असल्याची माहिती
व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. भरतीप्रक्रियेदरम्यान कोकण
रेल्वेकडून परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणा-यांनाच ही संधी दिली
जात आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध होत नसतील तर, अशावेळी त्या-त्या भागातील जिल्ह्यातील
सेवायोजन कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले; परंतु, कोकण रेल्वेत कोकणातील लोकांनाच अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचेही
श्री. गुप्ता यांनी नमूद केले.
मार्गाची
क्षमता वाढवणार
१९९८
पासून मुंबई ते मेंगळुरु कोकण रेल्वे मार्ग कार्यान्वित झाला. त्यावेळी या
मार्गावर ६७ स्थानके होती. ८४.४९६ कि. मी.चे ९१ बोगदे तर १७९ पुलांची संख्या आहे.
गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे मार्ग हा देशातील सर्वात गर्दीचा मार्ग म्हणून
ओळखला जाऊ लागला आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच या मार्गावर मालवाहतूकही मोठय़ा
प्रमाणात होऊ लागली असून,
या मार्गावर नव्याने गाडय़ांची मागणी
प्रवाशांकडून होत आहे. सुट्टीच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर गाडय़ांच्या
फे-यात वाढ केली जात असल्याने अनेक वेळा गाडय़ा विलंबाने धावण्याचे प्रसंग ओढवत
आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव हाती
घेण्यात आला आहे. रोहय़ातून या कामाला सुरुवातही झाली आहे. रोहा ते वीर अशा ४६.८९०
किमीचे दुपदरीकरण होणार असून, या
कामासाठी सुमारे ४१० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम
पूर्णत्वास जाईल, असे सांगण्यात येते. परंतु, कोकण रेल्वेच्या मार्गावर बोगदे आणि
पुलांची असणारी संख्या लक्षात घेता याठिकाणी दुपदरीकरण करणे शक्य नसल्याने
मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी नव्याने रेल्वे स्थानकांची उभारणी करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे.
नवीन
२१ रेल्वे स्थानके
त्यामध्ये
कोकण रेल्वे मार्गावर २१ रेल्वे स्थानके, क्रॉसिंग
स्टेशनची उभारणी करण्यावर भर देण्यात आला आहे. पाहणी दौ-यात इन्नंजे रेल्वे
स्थानकाच्या उभारणीचे काम पाहण्याची संधी मिळाली. नव्याने उभारण्यात येत असलेल्या
२१ स्थानकांपैकी महत्त्वाचे हे एक स्थानक आहे. कर्नाटकातील उडपीनजीकच असलेले हे
ठिकाण. सध्या या स्थानकावर केवळ एकच पॅसेंजर थांबते. त्याशिवाय याठिकाणी अन्य
कोणत्याही सुविधा नाहीत. परंतु, आता
या स्थानकाला आधुनिकीकरणाचा साज दिला जाणार आहे. सुमारे ११ कोटी रुपये खर्चून या
ठिकाणी कायमस्वरूपी स्थानकाची उभारणी केली जाणार आहे. यामुळे या परिसरातील दहा ते
बारा गावांना फायदा होणार आहे. उडपी ते पडबिद्रीदरम्यान हे स्थानक आहे. मार्गावरील
कुमटा स्थानकही अशाच पद्धतीने आकार घेत आहे. यामुळे २१ नव्या स्थानकांमुळे कोकण
रेल्वे मार्गावरील स्थानकांची संख्या ८७ होणार आहे. महाराष्ट्रात इंदापूर, गोरेगाव रोड, सापे, वामने, कळंबणी, कडवई, वेरवली, खारेपाटण, आर्चिर्ण, मिरजण आणि इन्नंजे येथे नव्याने
स्थानके होणार आहेत. याशिवाय माणगाव, विन्हेरे, अंजनी, सावर्डे, आडवली, राजापूर, वैभववाडी आणि मुर्डेश्वर येथे लुप
लाईनची कामे हाती घेतली जाणार आहेत.
लॉजिस्टिक
पार्कची उभारणी
गोवानजीकच्या
बाळ्ळी येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क हा कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी
प्रकल्प मानला जात आहे. कोकण रेल्वे आणि कंटेनर कॉपरेरेशन ऑफ इंडिया लि. यांच्यात
सामंजस्य करार होऊन या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. यामध्ये कंटेनर
कॉपरेरेशनने प्रथमच अशा प्रकारच्या प्रकल्पात ४३ कोटींची गुंतवणूक केली आहे.
जवळजवळ ८१ हजार ३०० स्क्वे. मीटरच्या परिसरात या प्रकल्पाची उभारणी केली जाणार
आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरून कंटेनरची वाहतूक
शक्य होणार आहे. थेट जेएनपीटीपर्यंत कंटेनर ने-आण करण्याची सुविधा निर्माण
झाल्याने या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात मालवाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे
सध्या या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
बंदर
विकासाला देणार चालना
कोकणातील
बंदरे थेट कोकण रेल्वेशी जोडून बंदर विकासाला चालना देण्याचे कामही केले जाणार
आहे. यातूनच रत्नागिरी तालुक्यातील जयगड-डिंगणी रेल्वे लाईनचे काम हाती घेण्यात
आले आहे. जिंदल, मेरिटाईम बोर्ड आणि कोकण रेल्वे यांच्या
माध्यमातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. ३३ कि. मी. मार्गाच्या या कामासाठी ७७१
कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू करण्यात आले आहे. हा
प्रकल्प कार्यान्वित झाल्यास या मार्गावरून पहिल्या दोन वर्षात ८ मिलियन टनची
वाहतूक होईल. त्यानंतर ती १२ मिलियन टनापर्यंत जाईल. याशिवाय बंदर विकासही गतिमान
होणार आहे. विविध प्रकल्पांच्या उभारणीमुळे येत्या दोन-तीन वर्षात कोकण रेल्वेची
क्षमता दुप्पट होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे गतिमान होताना उत्पन्नातही वाढ
होणार आहे. विद्युतीकरण, दुपदरीकरण तसेच बाळ्ळी येथील लॉजिस्टिक
पार्कच्या उभारणीसाठी कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी
अहोरात्र झटत आहेत. कारवारचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक असिम सुलेमान तसेच कोकण
रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, नीलेश
नाईक यांच्यासह इतर उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांनी संपूर्ण मार्गावरील
प्रकल्पांची माहिती दिली.
No comments:
Post a Comment