पतंग उडविणे हा मौजमजेचा खेळ असला तरी त्याला असलेल्या घातक चायना मेड मांजामुळे तो आपत्ती ठरत आहे. हा चायनामेड मांजा पक्षी-प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे त्याच्यावर कायमची बंदी घालणेच योग्य ठरेल.
भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मात्र ही मकरसंक्रांत आता पतंगाच्या चायनामेड मांजामुळे भारतीयांच्या जीवावर बेतते आहे.
मकर संक्रांत म्हटले की नजरेसमोर तिळगूळ समारंभ येतोच, पण जास्त करून पतंग उडवण्याचा कार्यक्रम जास्त लक्षात येतो. या सणानिमित्त राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये पतंगमहोत्सव भरतो. आबालवृद्ध तर या महोत्सवात सहभागी होतातच, पण त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून मोठमोठे राजकारणीही या महोत्सवात सहभागी होतात. त्या दिवशी सर्वसामान्यांप्रमाणे सणांचा आनंद लुटतात. मात्र कोणत्याही सणाचा अतिरेक झाला की त्याबाबत विचार करण्याची वेळ येते. त्याप्रमाणे आता पतंग उडविण्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.
दिवाळीच्या सणात मोठय़ा आवाजाचे ध्वनी आणि वायुप्रदूषण करणारे आणि नागरिकांना त्रासदायक ठरणारे फटाके वाजू लागल्याने अशा फटाक्यांवर बंदी आणण्यात आली. होळी सणात रंगांची उधळण करताना साध्या रंगांऐवजी रासायनिक रंगांचा वापर होऊ लागला. रंगपंचमीच्या आनंदाऐवजी रासायनिक रंगाऐवजी दु:खद प्रसंग घडून आनंदावर विरजण पडू लागले. त्यामुळे होळीनिमित्तच्या रंगपंचमीलाही रंगवापरावर निर्बंध लादण्यात आले. थोडक्यात मिळालेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की त्यावर निर्बंध आणावे लागतात. तसे निर्बंध पतंग उडवण्यावर आणावे लागणार आहेत. सण साजरे करायला कोणाची कोणतीच हरकत राहणार नाही आणि राहू नये. पण अतिरेक झाला की मात्र त्याबाबत विचार करणे भाग पडते.
सध्या प्लास्टिक बंदीचे वारे वाहत असतानाच मकरसंक्रांतीनिमित्त प्लास्टिकचे पतंग उडवले जात आहेत. विविध रंगरूपाचे कापडी आणि प्लास्टिक पतंग आकाशाच्या पोकळीत सोडले जात आहेत. त्यामुळे पक्षी जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पतंगाच्या मांजापासून पक्षी जखमी होऊन मृत होणाच्या घटनांत वाढ होत आहे. पूर्वी साध्या धाग्याचा मांजा असे, पण चढाओढीच्या आणि काटाकाटीच्या स्पर्धेत मात्र मांजाचे स्वरूप पालटत गेले आणि ते प्राणिमात्रांच्या व पक्षांच्या जीवावर बेतू लागले. काटाकाटीच्या स्पर्धेत मांजाला काचेच्या चु-याचे लेपन केल्याने प्रतिस्पध्र्याचा पतंग काटला जात असे, पण मांजा लागला तरी आकाशात घिरटय़ा घालणा-या पक्षांचे पंख रक्तबंबाळ होत असत. रस्त्यात फिरणा-या माणसांच्या मानेला मांजा लागला तरी ते जखमी होत असत. प्राणिमित्रांनी आवाज उठवताच अशा मांजावर बंदी लादण्याचा विचार सुरू झाला. पण काचेच्या मांजाला लगेच नायलॉच्या मांजाचा पर्याय उपलब्ध झाला. काचेच्या मांजाने प्राणी-पक्षी जखमी होत असत. पण नायलॉनच्या मांजाने प्राणी-पक्ष्यांचे जीव जायची पाळी आली. काटला गेलेला पतंग गुल करताना मुले आणि तरुणसुद्धा पतंग घेऊन पळत सुटतात. मात्र मागे लोंबकळणारा मांजा अनेकांच्या मानेत किंवा पायात गुरफटून जीवावर बेतण्याची पाळी येते. संक्रांतीनिमित्त उडवल्या जाणा-या पतंगांच्या मांज्याची संक्रांत पक्ष्यांवर आली आहे. मांजा पक्षांच्या पायात अडकून दोर बांधल्याप्रमाणे पक्षी जखडले जातात. तोच मांजा मानेत अडकून त्यांना गळफासही बसतो. सध्या एका बिल्डिंगवरून दुस-या बिल्डिंगवर केबलच्या वायर सोडलेल्या असतात. त्या केबलना अडकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकून ते फासावर लटकलेल्या अवस्थेत असतात. मोटरसायकलस्वारांच्या मानेत गुरफटल्याने मांजामुळे त्यांच्या जीवावर बेतण्याची पाळी येते. पिंपरी चिंचवडमध्ये पतंगाच्या मांजामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा गळा कापता-कापता वाचलाय. यापूर्वी आधी एका तीन वर्षांचा चिमुकल्याचेही प्राण थोडक्यात बचावले. मांजामुळे त्याचा डोळा कापला गेला होता, त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तर ज्येष्ठ नागरिकाचा गळा आणि हाताचे बोट कापता-कापता बचावले.
मकरसंक्रांतीची चाहूल लागताच पतंगप्रेमींचा सुळसुळाट होतो. पतंग गुल करताना तसाच सोडला जाणा-या या मांजामुळे असे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे या मांजावरच बंदी घालावी, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. भारतात तयार होणारा मांजा घातक नसतो, पण चायनामेड तंगूसच्या मांजामुळे शरीराचा कोणताही भाग कापला जातो. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तंगूसच्या चायनामेड मांजावर बंदी असल्याने तो बाजारात भेटत नसल्याचे सांगण्यात येत असले तरी पतंगप्रेमीना तो मिळतो कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा हा चायनीज मांजा कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो. पतंग उडविणे हा सांस्कृतिक खेळाचा भाग असला तरी कोणत्याही मार्गाने सूड उगविण्याचे ध्येयही गाठता येते. सध्या चीनचे आणि भारताचे संबंध पाहता हे सूडाचे कारस्थान तर नसावे ना, असा कोणालाही संशय येऊ शकतो. त्यामुळे चायनामेड मांज्यावर बंदी घालणेच योग्य ठरेल.
No comments:
Post a Comment