मुंबईतील उद्रेक
आसाममध्ये घडलेल्या घटनेचे हिंसक पडसाद मुंबईमध्ये उमटले. साहजिकच मुंबईकडे अतिरेकी कारवाया, धार्मिक दंग्यांची प्रयोगशाळा म्हणून पाहिले जाते का; हा प्रश्न अस्वस्थ करतो. या शहराला वेठीस धरणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
आसाम, म्यानमारमध्ये घडलेल्या घटनांसाठी शनिवारी मुंबईला वेठीस धरण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. त्याची दहशत इतकी होती की, बाबरी मस्जिद पडल्यानंतर 1992-93 मध्ये मुंबईत धार्मिक दंगली उसळल्या होत्या, त्या जखमांची, यातनांची आठवण मुंबईकरांना झाली. मात्र, मुंबई पोलिसांनी संयमाने आणि वेगाने प्रक्षोभक परिस्थिती हाताळून मुंबईकरांना दिलासा दिला. याबद्दल मुंबई पोलिसांना धन्यवाद देता येतील तेवढे थोडेच आहेत. आसाम, म्यानमारमध्ये मुस्लीम समुदायावर कथित हल्ले सुरू आहेत. आसामच्या प्रश्नावर संसदेतही अलीकडेच चर्चा झाली. दिल्ली, कोलकात्ता, चेन्नईसारख्या शहरांसह मुस्लीमबहुल राज्यातही शांतता नांदत आहे. तरीही शनिवारी मुंबई पेटवण्याचा प्रयत्न झाला. यातून अतिरेकी कारवाया, धार्मिक दंग्यांची प्रयोगशाळा म्हणून मुंबई, महाराष्ट्राकडे पाहिले जाते का; हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईकडे देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिले जाते. या शहरांकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष असते. शिवाय मुंबईत घडलेल्या कोणत्याही घटनांचे पडसाद देश तसेच जागतिक पातळीवर उमटतात. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातूनच या घटनेचे गांभिर्य कळून येते. यापूर्वी असा ‘हायअलर्ट’ बाबरी मस्जिदीच्या पतनानंतरच देण्यात आला होता, ही गोष्ट येथे विचारात घ्यायला हवी. आसाममधल्या दंगलीचे निमित्त करून ’रझा अकादमी’ने काही मुस्लीम संघटनांच्या सहकार्याने मुंबईतील निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु त्यास हिंसक वळण लागून जवळपास 100 वाहनांची मोडतोड करण्यात आली, त्यातली अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यात बेस्टच्या बसची संख्याच 49 होती. 12 पोलीस गाड्या शिवाय वृतवाहिन्यांच्या ओबी यांसारखी वाहनेही जाळण्यात आली. मोर्चात झालेल्या चिथावणीखोर भाषणानंतर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत 55जण जखमी झाले. त्यात 45 पोलिसांचा समावेश आहे. काही मोर्चेक ऱ्यांच्या हातात लोखंडी रॉड, लाठ्या होत्या. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या मोटार सायकलमधून पेट्रोल घेऊन आगी लावण्यात आल्या. शिवाय मोर्चेकऱ्यांनी वारेमाप दगड वापरले. त्यावरून हा मोर्चा किती पूर्वनियोजित कटाचा भाग होता हे सरळ-सरळ दिसून येते. त्यातून आम्ही किती आक्रमक आहोत, हे सिद्घ करता येईल; परंतु अशा कृत्यांने सर्वसामान्य मुंबईकर वेठीस धरले जातात, याची कोणालाही पर्वा नाही. दंगलीवर मुंबई पोलिसांनी तत्काळ नियंत्रण मिळवले, हे खरे असले तरी या मोर्च्यातील छुप्या हेतूबाबत गुप्तचर यंत्रणा इतक्या गाफील कशा राहिल्या हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये रोजगार आहे. कसे ना कसे पोट भरता येते. त्यामुळे येथे देशाच्या कानाकोप-यांतून लोक येत असतात. त्यामध्ये बांगला देशीसुद्घा असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. येथे सर्वानाच घरे घेऊन राहणे शक्य होत नाही. मग ते जागा मिळेल तेथे, मग ते गटारावर राहणे असो, नाहीतर रस्त्याशेजारी असो, आपली पथारी पसरतात. साहजिकच अशी एखादी घटना घडली की त्याचे प्रत्यक्ष परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. शिवाय अफवांनाही धुमारे फुटतात. त्यातून अधिकच आग भडकते. शनिवारी मुंबईत दंगल झाली. त्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षाच्या काही नेत्यांचा हात असल्याचा जावई शोध काही प्रसारमाध्यमांनी लावला. साहजिकच त्याचा सरळ परिणाम जनतेवर होतो व सत्ताधारी असले तरी त्यांच्या हेतूबाबत शंका निर्माण होते. नाहीतर या देशात होणा-या जाळफोळ, मोडतोड, बाँबस्फोट यांसारख्या घटनांमध्ये या देशातल्याच काही अतृप्त आत्म्यांचा समावेश असतो, याचे नावीन्य आता या खंडप्राय देशातील नागरिकांना राहिलेले नाही. निमित्त कोणतेही असो, मात्र अशा घटनांमुळे जनजीवनाबरोबरच शहराची, देशाची आर्थिक घडीही विस्कटते. त्याचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागतात. त्याची किंमत चुकवावी लागते. पाकिस्तानसारख्या देशाला नेमके हेच हवे आहे. त्यासाठी ते देशात कुठे ना कुठे अस्वस्थता राहील यासाठी कार्यरत असतात, हे अनेकदा सिद्घ झाले आहे. 2008 साली मुंबईत बाँबस्फोट झाले. त्याची आखणी करतानाच ते प्रत्यक्ष राबण्याचे कामही पाकिस्तानातूनच होत होते, हे पुढे आले. आता कडव्या धर्माध लोकांच्या हाती आसामचा मुद्दा आला आहे. बांगला देशाच्या निर्मितीपासूनच हा मुद्दा चर्चेत आहे. बांगला देशातून पूर्वेकडील राज्यात मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी होते. घुसखोरांमुळे आसामसह पूर्वेकडील अनेक राज्यांत स्थानिकांच्या हातून तेथील रोजगारही गेलेले आहेत. साहजिकच तेथील जनजीवन कमालीचे अस्वस्थ आहे. त्यावर राष्ट्रीय पक्ष मतपेटीचे राजकारण करीत असल्याने तो प्रश्न सुटलेला नाही, हे कटू असले तरी सत्य आहे. मुंबईत दंगल करून तो प्रश्न सुटणार आहे का, या प्रश्नाचे उत्तर मोर्चेक-यांकडे असणार नाही. देशातील मुस्लीम समाज हा या देशातील मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही, असा वारंवार आरोप करण्यात येतो. अशी एखादी घटना घडली की त्याला पुष्टीच मिळते. त्यामुळे सर्वसामान्य निष्पाप मुस्लीम नागरिकांकडे संशयाने पाहिले जाते. त्यातूनच जातीय सलोखा संपुष्टात येतो. धार्मिक तेढ वाढत जाते. याचा विचार कधी होणार? यापूर्वी सलमान रश्दीच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’या कादंबरीचा निषेध करण्यासाठी प्रथम मुंबईलाच निवडण्यात आले होते. बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुंबई शहरांने खूप यातना भोगल्या आहेत. त्यावेळी शहरात उसळलेल्या धार्मिक दंगली, दाऊद इब्राहिमचे बाँबस्फोट, त्यानंतर कुर्ला, घाटकोपर, रेल्वे आदी ठिकाणी अनेकवेळा झालेल्या बाँबस्फोटांनी या शहराचे कंबरडे मोडले होते. 2008 चा मुंबईवरचा हल्ला तर देशावरचा हल्ला गणला गेला. त्यात अनेक निष्पाप, निरपराध माणसे मारली गेली. आजही घरचा कर्ता पुरुष घराबाहेर पडला की तो सुरक्षितपणे केव्हा घरी परतेल, याकडे घरच्यांचे लक्ष लागलेले असते. साहजिकच यावरून या शहरातील सामान्य नागरिक किती भयाच्या, भितीच्या छायेखाली वावरतो आहे, हे दिसून येते. त्यातूनच धार्मिक उन्माद वाढवणा-या संघटनांचे फावते. जशास तसे उत्तर देण्याचे मनसुबे रचले जातात. कुठे मस्जिदीतील बांग घुमते. मात्र यात बळी पडतो तो सर्वसामान्य माणूसच. सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली की अशा प्रकारांना तर अधिकच खतपाणी घातले जाते. हे सर्व टाळायचे असेल, तर दंगलखोर प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले पाहिजे. केंद्र किंवा राज्य सरकारे अनेक जातीय, धार्मिक संघटनांवर बंदी घालतात. तशी बंदी असे धार्मिक द्वेष वाढवणारे मोर्चे, बैठका, सभांवर घातली पाहिजे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल. अन् आपल्या देशाचे सहिष्णुत्व आबाधित राहीलआसाममध्ये घडलेल्या घटनेचे हिंसक पडसाद मुंबईमध्ये उमटले. साहजिकच मुंबईकडे अतिरेकी कारवाया, धार्मिक दंग्यांची प्रयोगशाळा म्हणून पाहिले जाते का; हा प्रश्न अस्वस्थ करतो. या शहराला वेठीस धरणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
No comments:
Post a Comment