Total Pageviews

Monday, 13 August 2012

MUMBAI VIOLENCE -DAINIK AIKYA EDITORIAL

पेटवलेली दंगल

आसाम मधल्या दंगलींचा निषेध करायच्या गोंडस नावाखाली राजधानी मुुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात धर्मांधांनी हैदोस घालून शनिवारी घडवलेली दंगल पूर्वनियोजितच होती. आसाम मधली दंगल चार दिवसांपूर्वीच आटोक्यात आली. तिथे शांतताही प्रस्थापित झाली. म्यानमारमधल्या अल्यसंख्याक मुस्लीम आणि बहुसंख्याक बौध्द धर्मीयांचा संघर्ष गेली साठ वर्षे सुरु आहे. अशा स्थितीत त्या दंगलींचा निषेध करायसाठी  रझा अकादमी, सुन्नी, जमा झूल उलेमा आणि अवामी विकास पार्टी या संघटनांनी मुंबईत मोर्चे काढायचे काही कारण नव्हते. लोकशाहीत निषेध व्यक्त करायचा सर्व भारतीयांना अधिकार असला, तरी कायदा हातात घेवून झुंडगिरीच्या बळावर पेटवापेटवी, हिंसाचार करायला कुणी चिथावण्या दिल्या, त्या मागच्या सूत्रधारांना तुरुंगात डांबायला हवे. मुंबईत दंगल अचानक घडली, असे पोलिसांचे आणि धर्मनिरपेक्षतावादी सरकारचे म्हणणे असले, तरी वास्तव मात्र तसे नाही. ही दंगल घडवायचीच आणि मुंबईत दहशत निर्माण करायची असा चंग बांधूनच धर्मांध मुस्लिमांच्या म्होरक्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक, या निषेध मोर्चाचा गाजावाजा केला होता. आझाद मैदानावर पंचवीस तीस हजार मुस्लीम जमले, त्या संघटनांचे मुंबईत फारसे अस्तित्व नाही. तरीही इतके मुस्लीम या संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कसे जमले, याचा शोध पोलीस गुप्तचर खात्यानी घ्यायलाच हवा. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात जमाव जमेल, असा अंदाज गुप्तचर खात्याला आला नाही. जवळच्या पोलीस ठाण्यातल्या पोलिसांच्या तुकड्या त्या परिसरात बंदोबस्तासाठी होत्या. पोलिसांचे बळ अपुरेच असेल, अशी खात्रीही मोर्चाच्या संयोजकांना असावी, त्यामुळेच आझाद मैदानातल्या सभेत चिथावणीखोर आगलावी भाषणे करून जमावाला भडकवण्यात आले. या जमावाला कुणीही अडवलेले नव्हते. आसामच्या दंगलींचा निषेध करून या जमावाला शांतपणे परतता आले असते. पण, पुढाऱ्यांनी दिलेल्या चिथावणीमुळेच पोलिसावर या जमावाने हिंसक हल्ले चढवले. प्रचंड दगडफेक केली. परिसरातल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या परिसरात घुसून या दंगलखोर जमावाने वृत्तवाहिन्यांच्या तीन ओबी गाड्या, पोलिसांची वाहने जाळून टाकली. बेस्टच्या वीस गाड्या फोडल्या. तासभर जमावातल्या गुंडांचा या परिसरात मनमानी हैदोस सुरुच होता. पोलिसांच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी आल्यावर अश्रूधूर, लाठीमार आणि हवेत गोळीबार करून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पण त्याची फार मोठी किंमत शांतताप्रिय मुंबईकरांना मोजावी लागली. जवळजवळ तीन तास या परिसरात पोलिसांचे अस्तित्वही जाणवत नव्हते. दंगलखोर जमाव पोलिसांच्यावरच तुफानी दडगफेक करीत होता. दिसेल त्या वाहनावर हल्ले चढवित होता. जमावाच्या दगडफेकीत 45 पोलीस गंधीर जखमी झाल्याची घटना लक्षात घेता, या जमावाकडे दगड कोठून आले? दगडांच्या पिशव्या घेवूनच दंगलखोर आझाद मैदानावर आले असावेत, या संशयाला बळकटी येते. खुद्द पोलिसांनाही तसा संशय आहेच. अचानक सुरु झालेली ही दंगल कठोरपणे अवघ्या तीन तासात नियंत्रणात आणणाऱ्या मुंंबई पोलिसांच्या धाडसी कारवाईची प्रशंसा करायलाच हवी, पण दंगलखोरांच्या तावडीत पोलीस कसे सापडले, त्यांना दंगलखोरांनी कसे घेरले, या दंगलीमागचे निमकहराम कोण? याची चौकशी तातडीने व्हायलाच हवी, अन्यथा अस्तनीतले हे निखारे मुंबईसह राज्याच्या शांततेलाही चूड लावतील.
सरकारचे अपयश
काही दिवसांपूर्वी पुण्यात चार स्फोट झाले, तेव्हा सरकारने हे प्रकरण फारसे गंभीर नसल्याची सारवासारव केली होती. पण आता मात्र विशेष पोलीस पथकाने सुरु केलेल्या तपासात, या स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानवादी दहशतवादी संघटनांशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतल्या दंगलीलाही अशीच रंगसफेदी करून, तो तत्कालीन उद्रेक होता, अशी भूमिका सरकारला घेता येणार नाही. गेल्या तीस वर्षात काश्मीरमध्ये शेकडो सामूहिक कत्तली दहशतवाद्यांनी घडवल्या. पन्नास हजार निरपराध्यांचे बळी गेले, तेव्हा मुंबईतल्या या अतिसंवेदनशील मुस्लीम संघटनांना निषेधाचे साधे पत्रकही का काढावेसे वाटले नाही? आसाममधल्या दंगलीत फक्त मुस्लीम धर्मीयांचेच बळी गेलेले नाहीत, त्यात हिंदूंचेही बळी गेलेले आहेत. त्या दंगलीशी महाराष्ट्राचा काहीएक संबंधही नाही. पण, आसाममधल्या दंगलीबाबत भडक आणि खोटा प्रचार करीत "इस्लाम खतरेेमें'च्या बांगा, एस. एम. एस. आणि फेसबुकवरून दिल्या गेल्या, तेव्हा पोलीसांचे गुप्तचर खाते झोपले होते काय? आझाद मैदानातही अशाच आशयाचे चिथावणीखोर फलक लावले गेले होते. गेले आठ दिवस अत्यंत पध्दतशीरपणे या मोर्चाचा प्रचार सुरु असताना पोलीस आणि गुप्तचर खात्याने अल्पसंख्याकांच्या या निषेध मोर्चाची गंभीर दखल का घेतली नाही? अन्य वेळी चार पाचशे लोकांचा मोर्चा मुंबईत निघाल्यास हजार दोन हजार पोलिसांचा फौजफाटा मोर्चाबरोबर चालत असतो. मोर्चा शांततेने पार पाडायची आवाहने केली जातात. राज ठाकरे, शिवसेनेने आंदोलने केल्यास, उपग्रह वृत्तवाहिन्या, रात्रंदिवस प्रक्षोभक बातम्यांचा रतीब घालतात. देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित-मलिन व्हावी, यासाठी एकतर्फी बातम्या दिल्या जातात. पण, मुंबईतल्या दंगलीत जात्यांधांनी उपग्रह प्रसार माध्यमांना-पोलिसांनाच लक्ष्य करूनही, "सबसे तेज' वाहिन्याही या दंगलीच्या बातम्या देताना का थंडावल्या? या मोर्चाची तयारी अत्यंत नियोजनपूर्वक सुरु होती. मुस्लीम बहुसंख्याक कुर्ला आणि भेंडीबाजार भागात चिथावणीखोर फलक लावलेले होते. इंटरनेटवरून आसामच्या दंगलीची चुकीची माहिती प्रसारित केली जात होती, तरीही पोलिसांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही. महाराष्ट्राचे हेच शूर
पोलीस गणेशोत्सवात मात्र छ. शिवरायांनी अफलजखानाच्या केलेल्या वधाचे चित्रही लावू देत नाहीत. अशा चित्रांनी अल्प संख्याकांच्या भावना दुखावतात, असे आमच्या धर्मनिरपेक्षतावादी सरकारला वाटते आणि पोलीसही त्याच आदेशाची तडफेने अमलबजावणी करतात. महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य आणि शांततेला सुरुंग लावून दंगली घडवायचा कट कुणी रचत असल्यास त्या समाजद्रोह्यांना तुरुंगाच्या गजाआड करायला हवे. एवढी मोठी दंगल झाल्यावरही मुंबई पोलिसांनी रात्री उीशरापर्यंत, या जात्यांध मुस्लीम संघटनांच्या नेत्यांना, दंगलखोरांना अटक करायचे धाडस दाखवलेले नव्हते. पोलिसांचा हा दुबळेपणाच जात्यांधांना अधिक चेव यायला कारणीभूत ठरेल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांनी दंगलीच्या सूत्रधारांना शोधून काढू, त्यांच्यावर कडक कारवाई करू, अशा दिलेल्या ग्वाहीची अमलबजावणी व्हायला हवी. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो, इतकेच

No comments:

Post a Comment