विश्वासघात व अवहेलना हेच हिंदूंचे प्राक्तन आहे.
नव्हे, या देशात हिंदू असणे हाच गुन्हा ठरला आहे.
हिंदू असणे हा गुन्हाच!
आमच्या हिंदुस्थानात ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी हा शब्द एखाद्या शिवीसारखा झाला आहे. सेक्युलर कोणास म्हणावे? याचे मापदंड बदलले आहेत. आज निधर्मीपणाची व्याख्या काय आहे, तर हिंदूंवर अन्याय, अत्याचार होत असताना जो मुर्दाडासारखा गप्प बसतो आणि मुसलमानांना साधी ठेच लागली तरी छाती फोडून रडतो तो निधर्मी! सध्या या निधर्मीपणाचा जोर वाढला आहे व हा जोर का झटका हिंदुस्थानला भारी पडणार आहे. मुंबईच्या आझाद मैदान दंगलीत या निधर्मीवादाचा झटका हिंदूंना बसला आहे व त्यामुळे आमच्यासारख्यांच्या चिंता वाढल्या आहेत. आम्ही अत्यंत बारकाईने काही गोष्टी न्याहाळत असतो. विशेषत: दंगलीसारख्या प्रकरणानंतर अनेक बेगडी समाजवादी, स्वयंसेवी संस्था मुसलमानांच्या बाजूने बोंबा मारतात. मुसलमानांवर पोलीस कसे अत्याचार करतात याचा पाढा न्यायालयात व मीडियात वाचतात. गुजरात दंगलीत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करून अनेक पोलिसांना तुरुंगाची हवा खायला लावली. त्यात ती तिस्ता सेटलवाड, शबाना आझमी वगैरे प्रामुख्याने आहेत; पण मुंबईच्या दंगलीस पंधरा दिवस उलटून गेले तरी यापैकी एकाही बयेने अद्यापि ‘मीडिया’स दर्शन दिलेले नाही. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याबद्दल आरोळी ठोकलेली नाही. याचे कारण असे की, आझाद मैदान दंगलीत मार खाल्ला तो हिंदूंनी. बेदम चोप मिळाला तो मुंबई पोलिसांना. विनयभंग झाला तो महिला पोलिसांचा. हे सर्व मुसलमानांच्या बाबतीत घडले नाही या आनंदात या बाया-बापड्या असायला हव्यात. अर्थात हल्ले पोलिसांवर, महिलांवर, अमर जवान शिल्पावर झाल्यामुळे तिस्ता सेटलवाड किंवा शबाना आझमी यांनी अजिबात तोंड उघडले नाही, कारण या सर्व घटनांमुळे त्यांचा निधर्मीवाद बळकट झाला असून मानवतेचा झरा आझाद मैदान परिसरात वाहू लागला आहे! मागे एकदा पोलीस चकमकीत जावेद फावडा या गुंडास मारल्याबद्दल शबाना आझमी यांनी पोलिसांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. फावड्यास मारून पोलिसांनी मानवतेची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला, पण हीच मानवता आता मुंबई पोलिसांच्या बाबतीत का नाही? महिला पोलिसांच्या अब्रूवर घाला घालणार्या धर्मांध दंगलखोरांच्या बाबतीत या ‘बयां’ची दातखिळी का बसली आहे? की हे सर्व करण्यासाठी त्यांच्या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून अद्यापि हिरवा कंदील मिळालेला नाही? अरुप पटनायक यांच्याशी आमचे वैयक्तिक भांडण नाही. त्यांचे काम चांगलेच होते, पण आझाद मैदान दंगलीत त्यांनी बघ्याची भूमिका घेऊन एकप्रकारे हतबलता दाखवून दिली. त्यामुळे ‘मुस्लिम संघटना’ पटनायक यांचा जो उदो उदो करीत आहेत हा निधर्मीपणाचा कोणता खेळ मानायचा? आसामात बांगलादेशी घुसले आहेत व बोडो हिंदूंना मारत आहेत. लखनौला धर्मांध मुसलमानांनी उच्छाद मांडला. मुंबईसह अनेक शहरांत व राज्यांत उत्तर पूर्वेकडील लोकांना धमक्या देऊन पळवून लावले गेले, परंतु हे सर्व बेगडी ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी डबडेवाले गप्प बसले. जर या घटना गुजरात, मध्य प्रदेश किंवा अन्य भाजपशासित राज्यात घडल्या असत्या तर कॉंग्रेस, सपा, बसपासारख्या पक्षांनी व त्यांच्याबरोबर मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश, तिस्ता सेटलवाड, शबाना आझमीसारख्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘विधवा विलाप’ करून जो आक्रोश केला असता त्यामुळे सरकार व न्यायालयांच्या कानाचे पडदे फाटले असते. गुजरात दंगलीचे खापर दहा वर्षांनंतरही नरेंद्र मोदींच्या शिरावर फोडले जाते. मात्र आसाम हिंसाचाराच्या बाबतीत आसामच्या मुख्यमंत्र्यांना कोणी चरोटा मारायला तयार नाही. मुंबई दंगलीनंतरही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कोणी आरोपीच्या पिंजर्यात उभे करायला तयार नाही. बांगलादेशींची हिंदुस्थानातील घुसखोरी यापैकी कुणालाच मानवतेची पायमल्ली वाटत नाही व या घुसखोरीस विरोध करणारा हिंदू मात्र गुन्हेगार ठरवला जातो. दंगलखोरांच्या मांडीस मांडी लावून बसणारे राजकीय पक्ष चार दिवसांनी त्याच दंगलखोरांच्या विरोधात किंकाळ्या मारीत मोर्चे काढतात. हासुद्धा हिंदूंचा विश्वासघातच नाही काय? पण विश्वासघात व अवहेलना हेच हिंदूंचे प्राक्तन आहे. नव्हे, या देशात हिंदू असणे हाच गुन्हा ठरला आहे.
नव्हे, या देशात हिंदू असणे हाच गुन्हा ठरला आहे.
हिंदू असणे हा गुन्हाच!
No comments:
Post a Comment