Total Pageviews

Sunday, 12 August 2012

MUMBAI RIOTS LOKMAT EDITOIAL

आसामात मुस्लिमांवर होणार्‍या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चाचे बघताबघता हिंसक जमावात रुपांतर व्हावे आणि मुंबईतील बोरीबंदरचा परिसर अचानकपणे जाळपोळीच्या खाईत लोटली जावा ही शनिवारची घटना सर्वांसाठीच अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. आसामात चालू असलेला हिंसाचार हा नक्कीच दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. म्यानमारमध्ये तेथील मुसलमानांवर होणारे हिंसक हल्लेही सर्मथनीय नाहीत, पण मुंबईकरांचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. इत:पर कुणाला आसाम आणि म्यानमार हिंसाचाराचा निषेध करायचा होता, तर शांततापूर्ण निदर्शने करायला व मोर्चा काढायला काहीच हरकत नाही. पण जणू या हिंसाचारास महाराष्ट्र सरकार, मुंबईतील लोक आणि इथला मीडिया जबाबदार आहेत असे गृहीत धरून मुंबईत अनाकलनीय अशी जाळपोळ करण्यात आली, यामागे निश्‍चित अशी काही योजना होती की काय अशी शंका घेण्याजोगी ही परिस्थिती आहे. मुंबईत सध्या फार मोठा जातीय तणाव नाही, उलट शहरात हिंदू-मुस्लिम संबंध कधी नव्हते इतके सलोख्याचे आहेत. विशेषत: २६।११ च्या मुंबई हल्ल्यानंतर मुंबईतील मुस्लिम बांधवांनी आणि रझा अकादमीने या हल्ल्याचा निषेध करण्यात जो पुढाकार घेतला होता, त्यामुळे एकमेकात विश्‍वासाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळेच बहुदा या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असावी. पण ही परवानगी देताना पोलिसांनी जी सावधगिरी बाळगायला हवी होती ती बाळगलेली दिसत नाही. जखमींमध्ये सर्वाधिक संख्या पोलिसाची आहे, यावरूनच पोलिसांचे गुप्तचर अगदीच बेसावध होते हे स्पष्ट झाले आहे. निदर्शकांनी ज्या भागात हिंसाचार घडवून आणला तो मुंबई शहराचा मुख्यभाग आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, महापालिका, अशा अनेक मोठय़ा व महत्त्वाच्या इमारती या भागात असल्यामुळे तेथे सतत वर्दळ आणि गर्दी असते. केवळ शनिवार असल्यामुळे बर्‍याच कार्यालयांना सुटी असल्याने निरपराध लोकांना या हिंसाचाराची झळ बसली नाही, अन्यथा काय प्रसंग घडला असता याची कल्पनाच केलेली बरी. पोलिसांचा बेसावधपणा या जाळपोळीस कारणीभूत असला तरी नंतर मात्र पेलिसांनी परिस्थिती योग्यपणे हाताळून आटोक्यात आणली व मोठय़ा प्रमाणात जीवितहानीही टाळली. या हिंसाचाराचे वैशिष्ट्य म्हणजे जमावाने मीडियाला केलेले लक्ष्य. आसामातील मुस्लिमविरोधी हिंसाचाराचे वृत्त मीडियाने नीट दिले नाही म्हणून त्यांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्ष परिस्थिती याच्या उलट आहे. टीव्ही मीडियाला सध्या सनसनाटी बातम्या सतत हव्या असतात, त्यामुळे आसामचा हिंसाचार मीडियाने व्यवस्थितपणे कव्हर केला आहे. काही साप्ताहिकांनी तर याच आठवड्यात आसामातील घटनांवर मुख्यलेख लिहिले आहेत. त्यामुळे आसाम हिंसाचार हे फक्त दंगलीचे निमित्त असावे असे वाटते. प्रत्यक्ष हेतू यापेक्षाही वेगळा असावा अशी शंका येते. अर्थात आता या सर्व प्रकरणाची पोलिस चौकशी करतील आणि त्यामागचे सत्य तसेच खरे गुन्हेगार शोधतीलच. ही दंगल दोघांचे मृत्यू आणि अनेक वाहनांची जाळपोळ एवढय़ावरच थांबली असली तरी ती यापेक्षा भयानक रूप धारण करू शकली असती हे मात्र नजरेआड करता येणार नाही. मुंबई अशांत राहावी यासाठी दहशतवादी संघटनांचे प्रयत्न चालू आहेत. अनपेक्षितपणे मिळालेल्या या यशामुळे त्यांचा उत्साह वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार, पोलीस व नागरिक सर्वांनाच पूर्ण सावधगिरी बाळगावी लागणार आहे

No comments:

Post a Comment