बबन वाळके
आ पल्या देशाचे होनहार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे, संशयित मुस्लिम युवकांना डांबल्याप्रकरणी मनापासून अश्रू ढाळीत असल्याचे सर्वश्रुतच आहे. तिकडे शरद पवारांनाही मुस्लिम अतिरेक्यांचा अथवा त्यांना मदत करणार्यांचा खूपच पुळका आलेला आहे. उत्तर प्रदेशात तर मुलायमसिंग यादवांना कधी या अतिरेक्यांना सोडतो आणि कधी नाही, एवढी घाई झाली आहे. पण, उच्च न्यायालयाने अशा कोणत्याही संशयिताला सोडता येणार नाही, अशी तंबीच मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पिता मुलायमसिंग यादव यांना दिली आहे. मुलायमचे स्वप्न भंगले. मागे राहुल गांधी यांना मुझफ्फरपूरनगर दंगल पीडितांच्या शिबिरांमध्ये पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय मुस्लिम युवकांच्या संपर्कात आहे, असा साक्षात्कार झाला होता. पुरावा काय तर म्हणे, आमच्या एका इंटेलिजन्स अधिकार्यानेच मला ही माहिती दिल्याचे राहुल गांधी यांनी ठोकून दिले. देशाच्या सुरक्षाविषयक प्रश्नांचा कसा खेळखंडोबा आपल्याच अतिरेकीधार्जिण्या नेत्यांकडून चालला आहे, याचे हे काही पुरावे. यादी तर बरीच लांबलचक आहे.
देशात अतिरेक्यांच्या कारवायांना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिकांची आणि त्यातही मुस्लिम युवकांची मोठी मदत मिळत असते, हे मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यापासून तर अनेक हल्ल्यांमध्ये आमच्या पोलिस दलांनीच उघड केले आहे. हे स्लीपर सेल्स अतिरेक्यांसाठी काम करतात, त्यांना स्थळे दाखवितात आणि नंतर हल्ले केले जातात, ही बाब आता लपून राहिलेली नाही. अशा सर्व मदत करणार्या संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पण, या राष्ट्रद्रोह्यांना सोडा असा टाहो, भाजपा वगळता सर्वच पक्ष फोडत आहेत. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण केवळ भारतातच खेळले जाऊ शकते. कॉंग्रेसला जनता नाकारण्याच्या मन:स्थितीत आहे, हे धडधडीत दिसूनही कॉंग्रेसी नेत्यांना अक्कल आलेली नाही, असेच म्हणावे लागेल. आता हेच पहा. आपले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर गावीच दोन संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी शिंदेंच्या ताफ्यातील एका मोटारीत तलवारींचा साठा सापडला. किती ही सुरक्षेची ऐसीतैसी. पण, शिंदेंना त्याचे काहीही वाटत नाही. अतिरेक्यांनाही कोणतीच भीती वाटत नसल्यामुळे त्यांनी थेट शिंदेंचे गावच निवडले. येथे आपल्याला कुणीही काही करू शकणार नाही, हा त्यांना विश्वास. जेव्हा देशाचा गृहमंत्रीच म्हणतो की, या संशयितांना सोडून द्या तर मग आपले कोण काय बिघडवणार? चला सोलापूरची सफर करूया. आपल्या देशाला इतके नतद्रष्ट गृहमंत्री लाभले आणि ते सुद्धा छत्रपती शिवरायांच्या भूमीत, याची लाज वाटते. शिंदेंना वाटते की नाही, माहीत नाही.
चार वर्षांपासून बस्तान
सरकारचे धोरण सामान्य नागरिकांसाठी किती धोकादायक आहे, हे सोलापूरच्याच घटनेवरून लक्षात येईल. सिमीचा एक हस्तक खालीद अहमद सलीम मुछाले या सिमीच्या कट्टर अतिरेक्याला पाच वर्षांपूर्वी इंदूर पोलिसांनी अटक केली होती. गुन्हा शाबीत झाल्याने त्याला चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण, त्यानंतरही मध्यप्रदेश गुप्तचरांची त्याच्यावर नजर होती. हा मुछाले चार वर्षे शिक्षा भोगल्यानंतर अनेक ठिकाणी फिरून नंतर तो थेट सोलापुरात आला आणि गेल्या एक वर्षापासून तो आपल्या कारवाया येथूनच नियंत्रित करीत होता. गृहमंत्री शिंदे यांना पत्ताच नव्हता. या मुछालेला मध्यप्रदेश पोलिसांनी गेल्या आठवड्यात संशयावरून पुन्हा ताब्यात घेतले आणि त्याने दोन अतिरेक्यांची नावे सांगितली. त्या माहितीवरून मध्यप्रदेश पोलिस आणि एटीएसच्या पथकाने महंमद सादिक वहाब लुंजे आणि उमय अब्दुल हाफीज दंडोती यांना सोलापूरमधील मुस्लिम पाच्छा पेठ वस्तीतून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून तीन शक्तिशाली बॉम्ब, १०२ डिटोनेटर्स, ८१ जिलेटिन कांड्या, गावठी पिस्तुले, सात काडतुसे, संगणक, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह आणि अन्य आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. आता सांगा. मध्यप्रदेश पोलिस अतिरेक्यांबाबत एवढे सतर्क असताना, आपल्या महाराष्ट्र पोलिसांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गावात काय चालले आहे, याचा थांगपत्ता सुद्धा लागू नये, याचेच आश्चर्य वाटते. इज्जत गेली ना राज्याच्या पोलिस दलाची आणि दिल्लीच्या गुप्तचर विभागाची. या अतिरेक्यांकडून जे बॉम्ब हस्तगत करण्यात आले, त्यांची क्षमता एक मोठी इमारत उडवून देण्यासाठी पुरेशी होती. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान मोठी विध्वंसक कारवाई करण्याची या सिमीच्या लोकांची योजना असावी. म्हणजे पुन्हा हिंदूच लक्ष्य. या लोकांनी मिळून बोगस कागदपत्रे आणि ओळखपत्रेही तयार केल्याचे तपासात आढळले. म्हणजे, एवढे सर्व होऊनही आमच्या गृहमंत्र्यांच्या गावात कोण आले, कोण गेले याचा साधा तपास होऊ नये, यापेक्षा दुसरी नामुष्कीची गोष्ट नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गावालाच अतिरेक्यांनी आपले आश्रयस्थान केले असेल आणि राज्य-केंद्राचे पोलिस काहीच करीत नसतील, तर अतिरेक्यांना मोकळे रान मिळणारच. यात सर्वाधिक कौतुक केले पाहिजे ते मध्यप्रदेश पोलिस दलाचे. बीमारू राज्य म्हणून हिणवणार्या कॉंग्रेसच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. मध्यप्रदेश पोलिस सुरक्षेविषयी किती जागरूक आहेत, त्याचा हा धडधडीत पुरावा. शिंदे आणि आर. आर. पाटील यांनी शिवराजसिंह चौहान यांच्याकडून सुरक्षेचे धडे गिरविले पाहिजेत. त्यामुळे थोडीतरी अक्कलवृद्धी होईल; आणि शेवटी संशयितांना सोडून देण्याच्या मागणीचा नादही सोडून दिला पाहिजे. कारण, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गावातच केव्हा आग लागेल, याचा नेम राहिलेला नाही.
No comments:
Post a Comment