Total Pageviews

Saturday, 28 December 2013

INCREASING VIOLENCE AGAINST HINDUS IN BANGLADESH

बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचारांची पुन्हा पुनरवुत्ती १९७० मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत मुजीबूर रहमानच्या आवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) फुटून निघू नये म्हणून याह्याखाननी फार मोठय़ा प्रमाणावर दडपशाही चालू केली. तीस लाखांवर लोकांची कत्तल केली आणि एक कोटी निर्वासित जनता भारतात आली. याचा इतिहास ' गॅरी बास यांच्या पुस्तकात दिला आहे.अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक ,पत्रकार गैरी बास यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द ब्लड टेलिग्राम : निक्सन, किसिंजर ऍण्ड ए फॉरगॉटन जेनोसाईड’ या पुस्तकाने जगात खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक पाहता हेच पुस्तक भारताच्याच एखाद्या लेखकाने लिहायला हवे होते. एका विदेशी लेखकाने बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचाराला जगापुढे मांडले आहे, तरी त्यावर भारत सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही, भारतातील वर्तमानपत्रे, संघटना आणि मानवाधिकारवादी नेत्यांनीही या मुद्यावर तिखट आणि प्रभावी प्रतिक्रिया द्यायला पाहीजे होती.पण, असे काही घडले नाही. १९७१ साली हिंदूंच्या नरसंहाराची बाब उजागर झाली असतानाही, भारताने या नरसंहाराची संभावना, बांगलादेशातील नागरिकांवर झालेले ते अत्याचार आहेत, अशा शब्दांत केली आणि हिंदू शब्दाचा उल्लेख टाळला. गैरी बासच्या या पुस्तकाने भारतातील हिंदूच स्वधर्मी बांधवांच्या दुख: आणि वेदनांप्रती किती उदासीन आहे, हेच पुन्हा एकदा हे सिद्ध केले. आम्हाला आमचे दु:ख आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्य करवून घेण्यासाठी पाश्‍चिमात्यांची गरज भासते. पाकिस्तानी सेनेने पूर्व पाकिस्तानातील हिंदूंचा केलेला नरसंहार कुणा भारतीयाने चव्हाट्यावर आणला नाही. या विषयावर हिंमत दाखवून, सर्व तथ्ये गोळा करून लेखणी चालविली , ती एका अमेरिकन लेखकाने. पाकिस्तानी सैनिकांना हे जेव्हा लक्षात आले की, आपला पराजय निश्‍चित आहे तेव्हा त्यांनी जमाते इस्लामीला हाताशी धरून हिंदूच्या घरासमोर पिवळे निशान लावले, जेणेकरून हिंदू घरांची ओळख तत्काळ व्हावी. त्यानंतर अंगावर शहारे आणणारे हल्ले केले गेले, ज्यात हिंदू महिलांवर बलात्कार, घरांची लुटालूट, जाळपोळ, पुरुष, वृद्ध आणि बालकांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बांगलादेशातील स्थानिक हिंदू संघटनांच्या माहितीनुसार सुमारे ३० लाख बांगलादेशी हिंदू या नरसंहारात मारले गेले. दुर्दैवाने भारतात सरकारने बांगलादेशात मारल्या गेलेल्या हिंदूंच्या बाबतीत दु:ख प्रकट करणारा चकार शब्दही काढला नाही.भारतात मानवाधिकार संघटना ज्या देशाच्या बाहेरील अनेक मानवाधिकारांच्या उल्लंघनावर गळा काढतात, त्यांच्यापैकी एकानेही आपल्या शेजारी देशातील रक्तबांधवांवर झालेल्या अमानुष अत्याचारावर एकही शब्द काढला नाही. परिसंवाद, चर्चासत्रे तर फार दूरच. भारतीय जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांच्यावर होणार्‍या आघातांप्रती गप्प कसा काय बसू शकतो? त्यांची दु:ख, वेदना, अन्यायाबाबत आमची नैतिक जबाबदारी आहे का?. पुस्तकात पुराव्याची संदर्भसूची १३० पानांची आहे. सिनेटर एडवर्ड केनेडींनी निर्वासित छावणीतील स्वयंसेवकाला विचारले- तुम्हाला सर्वात जास्त कशाची गरज आहे? त्यावर स्वयंसेवकाने उत्तर दिले- स्मशानांची. इंदिरा गांधीनी एक गोष्ट भारतीय जनतेपासून काळजीपूर्वक लपवून ठेवली. ती म्हणजे ९० टक्के निर्वासित हिंदू होते. भारतीय उपखंडातील वाचकांना या पुस्तकातून खूपच नवी माहिती मिळेल यात शंका नाही. जमात-ए-इस्लामीचे अत्याचार बांगलादेशाची निर्मिती व्हावी यासाठी शेख मुजीबुर रहेमान आदी प्रयत्न करीत होते, इस्लामी धर्मगुरूंचा मोठा गट या विरोधात होता. पाकिस्तानापासून फुटून निघाल्यास इस्लामी सत्ता अशक्त होईल असे मानणार्‍या या गटास बांगलादेशचे स्वतंत्र होणे मान्य नव्हते. अशा गटाचे नेतृत्व जमात-ए-इस्लामी या संघटनेने केले. या युद्धात जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांनी उघडपणे पाकिस्तानला मदत केली आणि हिंसाचार घडवून आणला. त्याची तुलना दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याने यहुदींवर केलेल्या अत्याचारांशीच होऊ शकेल. बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार या युद्धात ३० लाखांचे शिरकाण झाले. ९० लाख लोकांना स्थलांतर करावे लागले. पाकिस्तानी लष्कर आणि जमातचे नेते यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारांच्या कहाण्या आजही अंगावर काटा आणतात. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबुर रहेमान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या जमात-ए-इस्लामीवर बंदी घातली .मात्र खलीदा झीयांच्या राज्यात जमात-ए-इस्लामी राज्यकर्ते बनले. पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगने २००८ साली निवडणुकीत १९७१ च्या युद्धगुन्हेगारांना शासन करण्याचे आश्वासन दिले आणि सत्ता मिळाल्यावर या सगळ्यांची पाळेमुळे खणून काढायला सुरुवात केली. सत्तेवर आल्या आल्या माजी उद्योगमंत्री आणि जमातचा नेता मतिउर रहेमान नियाझी याला त्यांनी तुरुंगात धाडले आणि युद्धगुन्हेगारांच्या चौकशीसाठी न्यायिक आयोगच स्थापन केला. या आयोगाने २०१० साली जमातच्या अब्दुल कादर मुल्ला यास दोषी ठरवल. इंटरनेट आदी माध्यमांतून जमातचा धर्मवेडा चेहरा अधिकाधिक उघड होत गेला . सुप्रीम कोर्टाने १७ सप्टेबर २०१३ ला मुक्ती संग्रामात मीरपूर भागात हजरत अली लस्कर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येच्या आरोपाखाली कादरला फाशीची शिक्षा दिली. बांगलादेश हा कायद्याने धर्मनिरपेक्ष देश, पण देशात इस्लामची स्थापना करून लोक या घटनेचा बदला घेतील, असे जमातच्या नेत्यांनी म्हटले आहे. मुल्लाच्या फाशीनंतर ठिकठिकाणी सत्ताधारी अवामी लीगच्या बाजूचे मुस्लीम आणि हिंदू नागरिक यांच्यावर हल्ले चढवण्यात आल्याच्या बातम्या आहेत. तिकडे पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांनीही घसाफाडू भाषणे करण्यास सुरुवात केली आहे. हिंदू बांगलादेशी शरणार्थींना स्थायी आश्रय देण्यास नकार विडंबना ही आहे की, आंतरराष्ट्रीय लवादाच्या या निर्णयाची शिक्षा बांगलादेशातील हिंदूंना भोगावी लागत आहे. त्यांच्या घरांवर जमाते-इस्लामीचे गुंड सातत्याने हल्ले करीत आहेत. घरांची जाळपोळ तसेच लुटालूट करीत आहेत व हिंदू स्त्रियांची विटंबना करीत आहेत. ढाका राजशाही, खुलना, बारिशाल, रंगपूर, नौआखाली, बाघेरहाट, लक्ष्मीपूरसारख्या जिल्ह्यांत हजारो हिंदूंवर हल्ले झाले आणि त्यांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. परिणामी, हिंदूंना आपले प्राण वाचविण्यासाठी प्रचंड संख्येत भारतात आश्रय घेणे भाग पडत आहे. हे हिंदू पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीनंतर १९४७ मध्ये भारतात शरणार्थी म्हणून आले होते. संपूर्ण पन्नासच्या दशकात पूर्व पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदूंना भारतात परतणे भाग पडत होते. पुन्हा १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि जमाते-इस्लामीसारख्या संघटनांनी सर्वाधिक अत्याचार व छळ हिंदूंचाच केला. त्यामुळे पुन्हा काही लाख हिंदू भारतात आले. एवढे भीषण अत्याचार होऊनही आता पुन्हा त्यांना शरणार्थी बनविण्यात येत आहे. भारत सरकार आणि आसाम व त्रिपुरासारखी राज्य सरकारे एकीकडे पीडित हिंदू बांगलादेशी शरणार्थींना स्थायी आश्रय देण्यास नकार देत आहे, तर दुसरीकडे बांगलादेशातून आलेल्या मुस्लिम घुसखोरांना देशातील प्रत्येक शहरात घरे आणि नागरिकत्वही मिळत आहे.१९७१च्या मुक्तिसंग्रामाच्या धगीत आजही हिंदू बांगलादेशी होरपळत आहे.ज्या अफगाणिस्तानला भारतातील बहुसंख्यक हिंदूंकडून दिल्या जाणार्‍या करातून अब्जावधी डॉॅलर्सची मदत केली जात आहे ,तेथील संसदेने एक जागासुद्धा हिंदू आणि शिखांसाठी राखीव ठेवण्यास नकार दिला.अफगाणिस्तानात हिंदू आणि शीख मोठ्या मुश्किलीने एक टक्काच शिल्लक राहिले आहेत. भारतात राजकीय व्यासपीठावर बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या दुर्दशेकडे लक्ष देण्यासाठी कुणाजवळ वेळ असणार आहे?

No comments:

Post a Comment