चुमारमध्ये पाच भारतीयांचे अपहरण व सुटका
एलएसीवरील पहिलीच घटना
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ डिसेंबर
चिनी सैनिकांनी लडाख क्षेत्रातील चुमार सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय हद्दीतून पाच भारतीयांचे अपहरण करून आपल्या हद्दीत नेल्याची घटना उघडकीस आली असून, एलएसीवर ही अशाप्रकारची पहिलीच घटना असली तरी ड्रॅगनच्या छुप्या कारवाया सुरूच असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
सीमावाद सोडविण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये असलेल्या करारानुसार वाटाघाटी केल्यानंतर पिपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी या पाचही जणांना भारतीय हद्दीत आणून सोडले, असे सूत्राने येथे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. गुरांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या या पाचही जणांना चिनी लष्कराच्या जवानांनी भारतीय हद्दीत काही किलोमीटर आत येऊन पकडले आणि एलएसीच्या पलीकडे असलेल्या आपल्या कॅम्पमध्ये घेऊन गेले. या भूभागावर आपला कब्जा असल्याचे दर्शविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
या प्रकरणावर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला असल्याचे सांगून लष्करी मुख्यालयाने घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी, स्थानिक लष्करी अधिकार्यांनी या मुद्यावर फ्लॅग मिटिंगची मागणी करून हा मुद्दा उच्च स्तरावर उपस्थित करण्याचा इशारा दिल्यानंतरच ड्रॅगनचे सैनिक नरमले, असा दावा सूत्राने केला आहे. दोन्ही बाजूच्या लष्करी अधिकार्यांनी या मुद्यावर एकमेकांशी संपर्क केला होता. दोन्ही देशांमध्ये नवा सीमा करार झाला तरी भविष्यात येथे काहीच होणार नाही याची खात्री देता येत नाही, असा इशारा संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी यांनी नुकताच दिला होता.
No comments:
Post a Comment