Total Pageviews

Tuesday, 3 December 2013

tarun tejpal tip of ice berg

β तेजपाल हे हिमनगाचे केवळ टोक आहे - योगेश परळे मंगळवार, 3 डिसेंबर 2013 - 05:00 AM IST Tags: tarun tejpal, tehlka magazine, blog, yogesh parale, media, crime against women एका तरुण महिला पत्रकाराने "तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर माध्यमे व इतर क्षेत्रांमध्ये लैंगिक गुन्ह्यांसंदर्भातील आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीस आणि, शुचितेच्या प्रस्थापित देव्हाऱ्यांमधील बडवे व इतरांमधील जुन्या संघर्षास नव्याने सुरुवात झाली आहे. भाजपशासित सरकारच्या कार्यकाळामधील संरक्षण व लष्करी क्षेत्रामधील गैरप्रकरणांच्या उंच लाटेवर स्वार होऊन तेजपाल यांच्या "तेहलका' मासिकाने भारतीय वृत्तपत्र सृष्टीच्या मुख्य प्रवाहामध्ये मोठ्या दिमाखाने प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण मासिकाच्या गेल्या दशकभराच्या प्रवासानंतर तेहलकाचे व एकूणच भारतीय माध्यम व्यवसायाचे अंत:रंग व यामधील बदलत्या मूल्यव्यवस्थेवर भूमिका घेणे अत्यावश्‍यक आहे. तेजपाल हे दोषी आहेत वा नाहीत, हे ठरविणे अर्थातच न्यायव्यवस्थेचे काम आहे; परंतु या प्रकरणाच्या अनुषंगाने घटनादत्त अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मशाल हाती घेऊन समाजहितेषु सत्यांवर प्रकाश टाकण्याचा दावा करणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामधील अपप्रवृत्तींसंदर्भातील आक्षेप नोंदविण्याची ही सुयोग्य वेळ आहे. जागतिकीकरण व आर्थिक उदारीकरणाच्या एका रेट्याने भारतीय स्वातंत्र्ययुद्ध व आणीबाणीविरोधी लढ्याचा वारसा सांगणाऱ्या वृत्तजगताचे पोलाद वा रसायन अशा इतर व्यवसायांप्रमाणेच एक असलेल्या माहितीच्या व्यवसायामध्ये रुपांतर झाले. सर्वार्थाने बदलत्या जगामध्ये "सामर्थ्य' या शब्दाचा अर्थ माहितीवर नियंत्रण असा असल्याने साहजिकच माध्यमांच्या सामर्थ्यात अतोनात वाढ झाली; इतर संस्थांच्या तुलनेत माध्यमांचा रथ चार अंगुळे वर चालू लागला. माध्यमांना इतर संस्थांच्या कारभाराचा जाहीर पंचनामा करण्याचा अधिकार तर मिळालाच; शिवाय आपल्या महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीसाठी व स्वहित संरक्षणासाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची ढालही वापरता येणे शक्‍य झाले. माध्यमसंस्थेचा प्रवास हा असा एकाधिकारशाहीकडे सुरु झाल्याचे भासू लागले आहे. तरुण तेजपाल हे प्रकरण या पार्श्‍वभूमीवर तपासून पाहणे अत्यंत आवश्‍यक आहे. संरक्षण क्षेत्रामधील दलालीचा गैरप्रकार, मणिपूर येथील बनावट चकमक, बंगळुर येथील श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकचे प्रकरण व गुजरातमधील गोध्रा दंगलीवेळी झालेले सामूहिक हत्याकांड अशी अनेक खळबळजनक प्रकरणे तेहलकाने चव्हाट्यावर आणली व या कंपनीचे पत्रकार कौतुकास पात्र ठरले. या प्रकरणांचा तपास करताना साधनशुचितेचे भान बाळगले नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आक्षेपाची प्रसिद्धी व जनप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या पत्रकारांनी फारशी फिकीर केली नाही. त्याबरोबरच "स्टींग ऑपरेशन'च्या या' अमोघ शस्त्राच्या सहाय्याने तेजपाल व तेहलकाचा स्वप्नवत प्रवास सुरु झाला आणि प्रसिद्धी व प्रतिष्ठित पुरस्कारांची रत्नजडित पायदाने चढत तेजपाल हे भारत व दिल्लीमधील विद्वान पत्रकारांच्या प्रभावळीत समाविष्ट झाले. तेहलकाचे हेतु व नि:पक्षपाती भूमिकेसंदर्भात वेळोवेळी शंका उपस्थित करण्यात आल्या; मात्र तेहलकाने निर्विविवादपणे भारतीय माध्यम व्यवसायाच्या प्रवासास एक निर्णायक वळण दिले आहे. परंतु अमाप प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही तेहलकास व्यवसायास आवश्‍यक असणारे आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. यामुळे तेहलका व एकूणच अशा प्रकारच्या वृत्तसमूहांचे व्यावसायिक प्रारुप व यामधील नैतिकतेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तेहलकाचा प्राण असलेल्या स्टींग ऑपरेशनच्या हत्याराचा वापर करून पत्रकार बातमी चांगली किंमत देणाऱ्यास विकू लागले वा काही प्रकरणांमध्ये बातमी न देण्यासाठी किंमत घेऊ लागले. अशा पार्श्‍वभूमीवर पत्रकारितेच्या क्षेत्रामधील अनेक गैरप्रकार उजेडात येऊ नयेत, यासाठी वृत्तसमूह व पत्रकारांनी आटोकाट प्रयत्न सुरु केले. तेव्हा तरुण तेजपाल यांची प्रसिद्ध व वादग्रस्त कारकीर्द ही भारतीय माध्यमांच्या व्यावसायिक समृद्धी व नैतिक अधोगतीकडे झालेल्या प्रवासाची अव्वल साक्षीदार आहे, हे भान ठेवणे गरजेचे आहे. इंडिया टुडे वा आऊटलूकसारख्या प्रतिष्ठित मासिकांमध्ये काम करणाऱ्या तेजपाल यांनी तेहलकाची स्थापना केली. यामागील प्रेरणा काय असावी? केवळ एक पत्रकार म्हणून काम करत असताना येत असणाऱ्या "मर्यादां'ची जाणीव होऊन व्यावसायिक फायद्यासाठी त्यांनी तेहलका या समूहाची स्थापना केली. अर्थात हेतु शुद्ध नसल्यास यामध्ये काहीच वावगे नाही; मात्र एक स्वतंत्र वृत्त कंपनी म्हणून तेहलकाच्या कार्यपद्धतीविरोधात अक्षरश: शेकडो वेळा ओरड करण्यात आली. आपले ईप्सित साध्य करून घेण्यासाठी पत्रकार वेश्‍या पुरवितात; इथपर्यंत या आक्षेपांची व्याप्ती वाढली. या आणि अशा अनेक प्रकरणांचा जाब तेहलका वा अशा अन्य वृत्तपत्रसमूहांना विचारणे अत्यावश्‍यक होते. तेजपाल व तेहलकाचा अभ्यास होणे गरजेचे आहे; कारण भारतीय वृत्तसृष्टीमध्ये नव्या प्रतिभावान कल्पनांचा सुकाळ करण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. तेव्हा, इंडियन एक्‍सप्रेस या वृत्तपत्रापासून आपली कारकीर्द सुरु केलेल्या चारचौंघांसारख्या दिसणाऱ्या तेजपाल यांनी तेहलकासारख्या भारतास हादरवून सोडणाऱ्या मासिकाच्या संपादक पदापर्यंत मारलेली मजल आपल्या क्षेत्राची व्यावसायिक ताकद पूर्णपणे अवगत झालेल्या महत्त्वाकांक्षी तरुणाच्या बेफाम प्रवासाचे द्योतक आहे. मात्र, प्रचंड स्पर्धेच्या निर्दय जगामध्ये स्वत:ला सिद्ध करण्याच्या अट्टाहासामुळे एका चांगल्या पत्रकाराचे पर्यावसन "पीतपत्रकारिते'च्या शिलेदारामध्ये होऊ शकते, हे या कार्यपद्धतीचा अवलंब करणाऱ्या महाभागांनी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. राजकारण, उद्योग, कला अशा अनेक क्षेत्रांमधील अपप्रवृत्तींचा शिरकाव वृत्तसृष्टीमध्येही केव्हाच झाला आहे. मात्र इतर क्षेत्रांमधील प्रकरणांवर माध्यमांनी प्रकाश टाकला व दिव्याखाली अंधार राहिला. लैंगिक शोषण, बातमीच्या माध्यमामधून माहिती देण्यासाठी वा न देण्यासाठी खंडणी (याला दुसरा शब्द नाही) घेणे अशा कितीतरी गैरप्रकारांनी माध्यमांच्या जगामध्ये प्रवेश केला आहे व यामुळे या व्यवस्थेचा पाया ढासळतो आहे; नैतिक मूल्य कमी होते आहे. सध्याच्या माध्यमजगामध्ये असे आकस्मिक उदयास आलेले तेजपाल अनेक आहेत व त्यांना राजकीय आश्रय देणाऱ्या व्यवस्थेचीही चौकशी होणे अत्यावश्‍यक आहे. ते वेगवेगळ्या पातळ्यांवर उदयास आले आहेत. तेजपाल या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामध्ये दोषी असतील वा नसतील; मात्र माध्यमांमध्ये पडलेल्या अनेक चुकीच्या पायंड्यांना त्यांनी महत्त्वपूर्णरित्या हातभार लावला आहे, हे मात्र निशितपणे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment