चिनी दादागिरी भारतीय आणी जपानी प्रतिसाद
चीनच्या पूर्व भागातील समुद्रात सेनकाकू बेटावर आपला दावा जपानने सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सांगितला आहे. गेल्या आठवड्यात अचानक चीनने या बेटावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार जगजाहीर केला. या बेटावरील आकाशातून आमच्या परवानगीविना आपली विमाने न्याल तर याद राखा, असा इशारा चीनच्या अधिकार्यांनी सार्या जगाला देऊन टाकला.पण चीनच्या इशार्याला जपानने भीक घातली नाही. चीनच्या धमक्या वार्यावर उडवत, जपानने आपली विमाने या बेटावरील आकाशातून फिरवून आणली व स्वत:चा कणखरपणा दाखवून दिला.जपानने या देशाला टक्कर देण्याची चालवलेली तयारी भारतासारख्या देशाला आंतरराष्ट्रीय धोरणाचे धडे देण्यास पुरेशी आहे. एकटा जपानच नाही, तर दक्षिण कोरियानेही चीनची मुजोरी सहन न करण्याची आणि गरज पडलीच तर त्याची खुमखुमी जिरवण्याची जाहीर केलेली भूमिकाही चीनच्या माजोरेपणाला आळा घालण्यास कारणीभूत ठरली आहे.
जपानचे सम्राटचा सहा दिवसांचा भारत दौरा
जपानचे सम्राट अकीहितो आणि सम्राज्ञी मिचिको यांचा सहा दिवसांचा भारत दौरा,(२८-०३ डिसेंबर) गेल्या अनेक दशकांतील भारतात होणार्या विदेशी नेत्यांच्या दौर्यांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा मानण्यात येत आहे. जपानचे सम्राट फारच कमी वेळा विदेशाचा दौरा करतात आणि भारत सरकारतर्फे त्यांना दिलेले आमंत्रण १० वर्षांपासून तसेच पडून होते. प्रखर राष्ट्रवादी आणि भारतमित्र जपानी पंतप्रधान शिंजुआबे यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अचानक या प्रलंबित निमंत्रणाचा स्वीकार करण्याचा निर्णय झाला आणि सम्राटांचा भारत दौरा निश्चित करण्यात आला. जपानचे सम्राट प्रत्यक्ष राजकारणापासून दूर तेथील राष्ट्रीय अस्मिता आणि संस्कृतीचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण प्रतीक आहेत. आता जपानमधील प्रत्येक माणसाचे सहा दिवसपर्यंत केवळ भारताकडेच लक्ष राहील.
७९ वर्षीय सम्राट अकीहितो नोव्हेंबर १९६० मध्ये राजपुत्र या नात्याने भारतात आले होते आणि तेव्हा त्यांनी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरची कोनशिला ठेवली होती. आता ५३ वर्षांनंतर ते पुन्हा जपानचे सम्राट या नात्याने भारतात येत आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजोआबे यांनी, म्हटले होते की, भारतासमवेत आमची मैत्री दोन महासागरांच्या संगमाप्रमाणेच आहे. भारताचे क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांना जपानमध्येच आश्रय आणि मदत मिळाली . रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी सर्वसामान्य जपानी माणसाच्या मनात कमालीचा आदर आहे. गौतम बुद्धांचा प्रभाव तर सर्वत्र व्यापून आहेच. जपानचे बौद्ध भिक्खू बंगळुरू तथा बोधगयासारख्या शहरात येऊन येथून क्योतो, कोबे आणि टोकियोत बांधण्यात येणार्या बौद्ध मंदिरांसाठी मूर्ती तसेच शिल्पकारही घेऊन जातात.
संरक्षण आणि सामरिक क्षेत्रात एक नवीन अध्याय
आधुनिक काळात आर्थिक सहकार्यातून विविध प्रकल्पांची उभारणी झाली. मारुती सुझुकीने भारतीय रस्त्यांचा नकाशाच बदलवला आणि येथे वाहनक्रांती आणली, तर मेट्रो तथा पश्चिम मालवाहतूक रेल्वेचे जाळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहराच बदलवत आहे. जपानची वाहने, कॅमेरे, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तथा तंत्रज्ञानाचे उच्च शिखर गाठणारे नवीन आयाम भारतातील औद्योगिक व तंत्रज्ञानविषयक क्रांतीचा सर्वांत मोठा आधार ठरले. महत्त्वाचे म्हणजे, दोन लोकशाहीवादी देशांत होणारे सामरिक आणि लष्करी सहकार्य, भारतातील पूर्व क्षेत्रात संरक्षणाचा नवीन अध्याय जोडणारे आहे. चीन जर सर्वाधिक संशयी होत असेल, तर केवळ जपान आणि भारतदरम्यान वाढत जाणार्या सामरिक संबंधांमुळेच!
जपानी सम्राटांचा भारत दौरा संरक्षण आणि सामरिक क्षेत्रात एक नवीन अध्याय रचणार आहे. जपान जगातील सर्वाधिक शक्तिशाली लोकशाहीवादी सामरिक सहकार्यासाठी भारतासमवेत दूरगामी परिणामकारक आणि दीर्घकालीन करार करण्यास उत्सुक आहे. मात्र, भारत जपानशी तेवढ्याच उत्साहाने, परिणामकारपणे सहकार्याचा हात पुढे करण्याच्या स्थितीत आहे काय? जागतिकस्तरावर वेगाने बदलणार्या राजकीय परिस्थितीचा लाभ उठविण्याची नियतीने दिलेली संधी आमचे सत्ताधारी साधतील, याबाबत आजतरी शंका वाटते. परराष्ट्र मंत्रालयाने ज्या सर्वोच्च पातळीवरून जपानी सम्राट आणि सम्राज्ञीचे स्वागत आणि त्यांचा भारतातील दौरा याला राष्ट्रीय स्तरावरून महत्त्व द्यायला हवे, त्याच्या प्रयत्न झालेले दिसले नाहीत. भारताचे भविष्य पूर्वेकडील देशांशीच जुळलेले आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. जपानी सम्राटांच्या या अतिशय महत्त्वपूर्ण दौर्याचा उपयोग भारत, भविष्यातील धोरणे परिणामकारक रीतीने राबविण्यासाठी आणि सामरिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी करून घेईल त्तरच हा दौरा यशस्वी ठरेल .
चीनच्या माध्यमांमध्ये कडाडून टिका
भारत-चीन सीमेजवळ दौलत बेग ओल्डी परिसरात भारतीय विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने आपल्या सीमेत नवे रडार केंद्र उभारल्याचे आत्ताच उघड झाले आहे.भारत-चीन सीमाप्रश्नी मुजोर भूमिका ठेवणार्या चीनने आता वेगळाच रंग धारण केला आहे . भारताच्या मंगळ अभियानावर चीनच्या माध्यमांमध्ये कडाडून टिका होत आहे. ‘आशिया खंडात सत्तास्थानावर जाण्याची भारताची महत्त्वाकांक्षा असून विशेषत: चीनला ते आपला प्रतिस्पर्धी मानत आहेत,’ असे त्या देशातील सरकार प्रणित ‘ग्लोबल टाईम्स’ या दैनिकात म्हटले आहे. भारतात लाखो गरीब लोक असताना त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी मंगळाचे संशोधन केले जात असल्याची मुक्ताफळेही चीनी माध्यमांनी उधळली आहेत.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा (२९-३०/११/२०१३) केल्यानंतर चीनचे पित्त खवळले.भारताने सीमेवर समस्या उत्पन्न करू नयेत, अशी धमकीवजा सूचना दिली . गेल्याच महिन्यात उभय देशांमध्ये करार होऊन सीमाप्रश्नावरून कोणताही संघर्ष निर्माण न करण्याचे त्या वेळी एकमताने(??) ठरले होते. कोणत्याही प्रकारे समस्या गुंतागुंतीची होईल अशा प्रकारचे पाऊल भारत उचलणार नाही, अशी अपेक्षा असल्याचे मत चीनच्या 'झिन्हुआ' या सरकारी अखत्यारीतील वृत्तसंस्थेने परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते यांनी दिले आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यकरता आपल्याला चिनला काय वाटेल याची चिंता करावी लागते. भारत सरकारने चीनच्या या मग्रुरीला काहीच उत्तर दिले नाही.
जपानने भारताप्रमाणे वाटाघाटी केल्या नाही
हिंद महासागर, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर यासोबतच दक्षिण चीन समुद्र, आर्थिक आणि सामरिक मुत्सद्देगिरीचा मूळ आधार बनले आहेत. या तीनही क्षेत्रावर चीनचे वर्चस्व सातत्याने वाढत होते. मात्र, २००७ आणि २०११ मध्ये जपानशी झालेल्या भारताच्या सामरिक आणि धोरणात्मक करारानंतर दोन्ही देशांतील नौदलाच्या सैनिकांनी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेलाही बरोबर घेत संयुक्तपणे कवायती सुरू केल्या आणि चीनच्या अनिर्बंध एकाधिकारशाहीला वेसण घातले. सामुद्रिक व्यूहरचनात्मक सहकार्याच्या दृष्टीने भारत आणि जपान सहकार्य महत्वाचे आहे.
सेनकाकू बेटावरील हवाई वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याचे चीनचे षडयंत्र हाणून पाडायला जपानला भारता प्रमाणेकुठल्या वाटाघाटी कराव्याशा वाटल्या नाही, की सीमा सुरक्षा कराराच्या कवडीमोलाच्या कागदावर स्वाक्षर्या करायला त्या देशाचे पंतप्रधान भारतिय पंतप्रधानना प्रमाणे बिजिंगमध्ये पोहोचले नाहीत. त्यांनी स्वबळावर निर्णय घेतला.आपल्या आत्मबळावर बळावर जपानने चीनशी टक्कर घेण्याची भूमिका स्वीकारली . भारताच्या तुलनेने छोट्या असलेल्या जपानने चिनी राज्यकर्त्याच्या आक्रमक धोरणासमोर नरमाईने धोरण न स्वीकारता जशास तसेच उत्तर दिले चीनच्या साम्राज्यवादी धोरणाला रोखायच्या सुरू केलेल्या मोहिमेची गंभीर दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी. शांततेच्या गावगप्पा मारत चीनसमोर झुकते धोरण स्वीकारणाऱ्या भारतानेही असाच आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे चीनच्या नांग्या ठेचल्या जाऊ शकतात. हाच जपानने स्वीकारलेल्या धोरणाचा धडा आहे. जपानने सिद्ध केलेली तर्हा भारतालाही आत्मसात करता येईल का?
.
No comments:
Post a Comment