दिल्लीतील गँगरेपमुळे सारा देश ढवळून निघाला आहे. १९७८ साली दिल्लीच्याच गीता चोप्रा व तिचा भाऊ संजय चोप्रा यांचे अपहरण करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी रंगा ऊर्फ कुलजीत सिंग व त्याचा साथीदार बिल्ला ऊर्फ जगदीप सिंग यांनी गीतावर पाशवी बलात्कार केला होता. त्यावेळीही दिल्लीसह सार्या देशात खळबळ उडाली होती. त्यामुळेच रंगा व बिल्ला या आरोपींना फाशी देण्यात आली. चोप्रा भावंडांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. खंडणी मिळाली नाही म्हणून त्यांना ठार मारण्यात आले. परंतु आपल्या मित्रासोबत बसमध्ये गप्पा मारण्यात रंगलेल्या दिल्लीच्या त्या २३ वर्षीय तरुणीचा काय दोष होता? बसमधील वाहनचालक व त्याच्या साथीदारांच्या भावना चाळविल्या जातील असे त्यांनी काय अश्लील चाळे केले होते? मिळालेल्या माहितीनुसार काहीच नाही. तरीही उत्तेजित झालेल्या त्या सहा नराधमांनी त्या मुलीला ‘लक्ष्य’ केले. त्यानंतर दिल्लीत आगडोंब पसरला. आज ३५ वर्षांपूर्वीच्या रंगा-बिल्ला यांच्या पाशवी बलात्काराची आठवण झाली. अशा अपवादात्मक क्रूर घटना आहेत. दिल्लीच्या राजधानीत अशी घटना घडल्यामुळे व मीडियाने हा ‘गँगरेप’ उचलून धरल्याने त्याचे सार्या देशभरात पडसाद उमटले आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी तर महिलांनी आपल्या पर्समध्ये मिरचीची पूड ठेवावी आणि कुणी छेड काढल्यास त्याच्या ती डोळ्यांत फेकावी असे आवाहन केले आहे तर मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी महिलांची छेड काढणार्यांची गय करणार नाही असा इशारा देऊन महिलांच्या तक्रारींचा संबंधित पोलीस उपायुक्तांनी स्वत: तपास करून त्यांना न्याय द्यावा, असा आदेश दिला आहे.डॉ. सत्यपाल सिंह यांनी उपायुक्तांना कामाला लावले आहे तर रघुवंशी यांनी महिलांनाच सक्षम होऊन आपले संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु दूरचित्रवाणी व चित्रपटांतून उत्तेजित करणारी नागडीउघडी दृश्ये दाखविणार्यांना कुणी जाब विचारणार आहे की नाही? पूर्वी कोणत्याही हिंदी-इंग्रजी मॅगेझिन किंवा वर्तमानपत्रांत अश्लील फोटो छापून आले तर मुंबई क्राइम ब्रँचच्या समाजसेवा शाखेतर्फे कारवाई केली जायची. परंतु आता समाजसेवेची अशी धडक कारवाई कुठे दिसूनच येत नाही. उलट दूरचित्रवाणीवर ‘निरोध’च्या तरुणांना पेटविणार्या जाहिराती राजरोसपणे दाखविल्या जातात. तेव्हा केंद्रीय नभोवाणी खाते करते काय असा प्रश्न पडतो. का तेही भ्रष्टाचाराने बरबटले आहेत? टीव्ही चॅनेलवाल्यांनी काय दाखवावे, प्रसिद्ध करावे याबाबत कोणतीच आचारसंहिता नसल्याने अगदी कमरेखालचे ‘कॉमेडी शो’ दाखविले जात आहेत. पूर्वी महिला जास्तीत जास्त अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करायच्या. आता कमीत कमी कपडे घालून अंगप्रदर्शन कसे करता येईल इतके तोकडे कपडे घातले जात आहेत. तंग अशा जीन्स व शॉर्ट टॉप घातले जात आहेत. पूर्वी साडीचा पदर ढळला तरी ती महिला लाजेने चूर व्हायची. आता व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतेही व कसेही कपडे घालायची फॅशन झाली आहे. त्यामुळेही छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाल्याचे पोलीस सांगत आहेत. पूर्वी कुठेतरी चौपाटीवर, झाडाखाली प्रेमीयुगले गप्पा मारताना दिसायची. आता प्रत्येक चौपाटीवर, गार्डनमध्ये, निमर्नुष्य असलेल्या झाडे किंवा स्कायवॉकवर प्रेमीयुगुलाची खुली सीरियल किसिंग सुरू असते. त्यामुळेच ‘नाना-नानी पार्क’ची संकल्पना पुढे आली. घटस्फोटाचे प्रकरण तर कधीतरी ऐकायला मिळायचे. आता एका जोडप्याचा सहा महिन्यांत घटस्फोट होतो. ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ला मान्यता मिळाल्याने तर घटस्फोटाचे प्रमाण या देशात झपाट्याने वाढत आहे. कपडे बदलावेत तशी लग्नं केली जात आहेत. मोबाईल, फेसबुक, टीव्ही चॅनेल या प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढल्याने आई-वडिलांचे विचार-संस्कार बासनात गुंडाळले जात आहेत. ‘इडियट बॉक्स’ आजच्या तरुण पिढीचा खरा मार्गदर्शक झाला आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर, नेटवर ‘ब्ल्यू फिल्म’ अपलोड करून बघू शकता. कुणालाही फॉरवर्ड करू शकता. (परंतु अश्लील चित्रफीत किंवा मेसेजेस फॉरवर्ड करणे गुन्हा आहे.) हवे ते बरे-वाईट मेसेज पाठवून हव्या त्या मुलीच्या मागे लागू शकता. मग अशा सुविधा प्राप्त झाल्या असतील, जग जवळ आले असेल तर का नाही स्वैराचार वाढणार? दिल्लीत सामूहिक बलात्कार करणारे सर्व आरोपी सापडले हे दिल्ली पोलिसांचे भाग्यच म्हणावे लागेल. १४ वर्षांपूर्वी मुंबईच्या रेल्वे डब्यात जयबाला आशरवर हल्ला करणारा, तिला आयुष्यातून उठविणारा गर्दुल्ला मात्र अद्याप सापडलेला नाही. तेव्हा मुंबईचीही दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. माननीय शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर येणारे लोंढे रोखा नाहीतर मुंबईची वाट लागेल, असा ४० वर्षांपूर्वी इशारा दिला होता. परंतु त्यावेळी शिवसेनाप्रमुखांवर संकुचितपणाचा आरोप राज्यकारण्यांनी आणि इंग्रजी पत्रांनी केला. आता काय झाले? बाळासाहेबांचा इशारा खरा ठरला आहे. या मुंबईचा ताबा देशभरातील गुंड, लफंगे व लिंगपिसाटांनी घेतला आहे. त्यामुळे रात्री काय, दिवसाही या मुंबईत महिलांना घेऊन फिरणे येथून पुढे कठीण होणार आहे. आता पोलीसच महिलांनो रात्री-अपरात्री महत्त्वाच्या कामाशिवाय फिरू नका, असे आवाहन करीत आहेत. म्हणजे मुंबईचीही दिल्लीप्रमाणेच बिकट वाटचाल सुरू झाली आहे. या मुंबईत कोण कुठून येतो, कुठे राहतो, काय करतो हेच कळेनासे झाल्याने सारे मुंबईकर भयभीत झाले आहेत. कुचकामी राज्यकर्त्यांचे हे अपयश आहे आणखीन काय
No comments:
Post a Comment