Total Pageviews

Friday 7 December 2012

नौदलाच्या लढाऊ परंपरेत ही विजयाची घटना 'नौदल दिवस' -यशवंत जोगदेव
आधुनिक विकसित देशांच्या तुलनेने भारत युद्धसाहित्य, शस्त्रास्त्रे संपत्तीच्या दृष्टीने मागे असला तरी भारताकडची मिसाइल्स शत्रूवर केवळ हल्लाच नव्हे तर हवेतच शत्रूची मिसाइल्स उद्ध्वस्त करण्याची क्षमता राखतात. त्यामुळेच जगातील जपान, अमेरिका, इस्नयल, रशियाचे नौदल भारतीय नौदलाच्या बरोबर संयुक्त लष्करी कवायती युद्धाभ्यास करण्यासाठी येत असते.भारताच्या इतिहासातील एक स्फूर्तिदायक घटना म्हणजे 3 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या नौदलाने पाकिस्तानचे प्रमुख बंदर कराचीवर केलेली यशस्वी कारवाई! भारतीय नौदलाच्या लढाऊ परंपरेत ही विजयाची घटना 'नौदल दिवस' म्हणून पाकिस्तानविरुद्ध प्राप्त केलेल्या विजयाची एक आठवण म्हणून दरवर्षी साजरी केली जाते.
तसे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक युद्धे भारताला करावी लागली किंवा लादली गेली. सर्वच ठिकाणी भारतीय सैन्य विजयी ठरता पराजयच झाला होता. भारताच्या इतिहासात रामायण काळापासून कुरुक्षेत्र म्हणजेच पानिपत युद्धक्षेत्र म्हणून प्रख्यातच आहे! केवळ महाभारतातील कौरव-पांडव युद्धच नव्हे तर अहमदशहा अब्दालीने केलेली सिंधवरची स्वारी दिल्लीवर केलेल्या आक्रमणातील युद्ध पानिपत येथेच झाले होते. पेशवेकालीन घोर पराजय सदैव विजयश्री प्राप्त करून दिल्लीपर्यंत धडक मारून विजय प्राप्त करणार्‍या मराठय़ांच्या पराक्रमी सेनेचा पराजय पानिपतच्या युद्धात घडून लाखो सैनिक त्या घनघोर युद्धात बळी पडले होते. मराठेशाहीच्या इतिहासातील या शल्याबरोबरच इंग्रजांच्या विरुद्ध अनेक लढाया लढण्यात यशस्वी ठरल्याने देश गुलामगिरीत ढकलला गेला. त्याचे शल्य भारतीय सैनिकांच्या मनात सातत्याने बोचत राहिले होते. ब्रिटिशांच्या राजवटीत ब्रिटिश सैन्याची शिस्त, जागतिक स्तरावरील अनेक कारवायांचा अनुभव, नौदल, वायुदल, तोफखाना, घोडदळ, रणगाडे या आधुनिक युद्ध प्रणालीत भारतीय सैनिकांनी पहिल्या वा दुसर्‍या महायुद्धात एक प्रकारे रणक्षेत्रावरचा केवळ अनुभवच नव्हे, तर आशिया, युरोप, आफ्रिका येथील रणक्षेत्रात विजय प्राप्त केला. या सर्व कालखंडात ब्रिटिशांची गुलामगिरी असली तरी भारतीय सैनिक अनेक दृष्टीने जागतिक स्तरावरील कोठेही जाऊन लढायला तयार झाला.
त्यामुळेच जेव्हा जपानने इंडोनेशियावर आक्रमण करून भारतीय सैन्याला जिंकले, तेव्हा भारताला स्वातंर्त्य मिळवून देण्याच्या पवित्र उद्देशाने नेताजी सुभाषचंद्र बोसांचे नेतृत्वाखाली भारतीय सैन्य मोठय़ा शौर्याने लढले. हा सर्व अनुभव असल्याने स्वातंर्त्य प्राप्तीनंतर पाकिस्तानचे आक्रमण, काश्मीरमधील युद्ध, 1962 चे चीनचे आक्रमण, 1965 मधील पंजाबच्या सीमेवरील युद्ध अशा लढाया भारतीय सैन्याला लढाव्या लागल्या. मात्र 1962 मधील चीनचे आक्रमण, 1965 मधील लढाई ही जेमतेम एक-दोन महिनेच झाली. त्यामुळे निर्णायक विजय भारतीय सैन्याला प्राप्त करता आला नाही. लष्करी दृष्टीने युद्ध जिंकण्यासाठी सैन्याचे प्रशिक्षण, हत्यारे, तोफा, विमाने, रणगाडे, युद्धनौका, विमाने ही आधुनिक युद्धसामग्री अत्यावश्यक आहेच. मात्र हे सर्व असूनही जर सैन्याचे प्रशिक्षण, चिवटपणा, लढाऊ परंपरा नसेल, जनतेचा पाठिंबा नसेल, सरकारचा दृढनिश्चय, मजबूत आर्थिक स्थिती नसेल तर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारे प्रभावी नेतृत्व, प्रेरणा देणारा नेता नसेल तर लष्करी दृष्टीने सामर्थ्यवान असलेले देशही निर्धार नसल्याने युद्धाच्या डावपेचात कमी पडल्याने युद्धे हरले आहेत. ब्रिटिशांचे सैन्य, मोगलांचे सैन्य, मराठय़ांचे सैन्य, फ्रान्सचे सैन्य, जर्मनीचे सैन्य, रशियाचे सैन्य यांना पराजयाचा कटू अनुभव मिळाला तो ते कोठेतरी कमी पडले म्हणूनच!
या सर्व सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार्‍या बाबतीत 1971 सालचे बांगलादेशचे युद्ध मात्र सर्वस्वी वेगळे, प्रेरणादायी, प्रारंभापासून उत्तम नियोजन, डावपेच, तिन्ही सेनादलाचे नियोजन एकत्रित कारवाई या दृष्टीने अद्वितीयच होते. त्या वेळी देशाचे नेतृत्व इंदिरा गांधी करत होत्या. सेनापती होते फिल्ड मार्शल माणिकशॉ. या युद्धाचे नियोजन, शासनाचा पाठिंबा, युद्धसामग्रीची तयारी 1971 च्या एपिल्र-मेपासूनच प्रारंभ झाली होती. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानने अचानक 2 डिसेंबर रोजी भारतावर हवाई हल्ला चढविला. तेव्हा भारतीय सैन्य गाफील नव्हते. भारताची बहुतेक विमाने विमानतळावर असायच्या ऐवजी जमिनीखाली बंकरमध्ये सुरक्षित होती. त्यामुळे दुसर्‍याच दिवशी भारतीय वायुदलाने तुफानी हल्ला पाकिस्तानच्या सर्व विमानतळ लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणावर केला. उलट पाच-सहा महिने शेकडो रेल्वे गाडय़ांनी बांगलादेशच्या सर्व बाजूने भारतीय सैन्याचे मोर्चे, तोफा, दारुगोळा, हत्यारेच नव्हे, तर अन्नधान्य, सैनिक, तळ ठोकून होते. एका दृष्टीने भारतीय सैन्याने बांगलादेशला वेढाच घातला होता. इतकेच नव्हे तर भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी 'मुक्ती वाहिनी' म्हणून स्थानिक बांगलादेशी नागरिकांच्या तुकडय़ांचे नेतृत्वही तेथे अगोदरचे पोचलेले भारतीय सैनिक करत होते. त्यामुळेच युद्ध प्रारंभ झाल्यावर बाहेरून आतून बांगलादेशच्या आघाडीवर पाकिस्तानी सैन्याचे 'सँडविच' झाले. बांगलादेशात पाकिस्तानी सैन्याने अनेक अत्याचार केल्यामुळे जागतिक स्तरावरील अनेक देशांचे समर्थन भारताला मिळाले होते!
इंदिरा गांधींनी आपल्या झंझावाती जगभराच्या दौर्‍यात जगातील अनेक देशांना भेट देऊन त्यांना पाकिस्तानी सैन्याने केलेली अत्याचाराची माहिती दिल्यामुळे जागतिक समर्थनही भारताला मिळाले होते. या युद्धाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे भारतीय नौदलाची धडक कारवाई! मुंबई बंदरामधून निघालेली विमानवाहू युद्धनौका विक्रांत त्याच्या जोडीनेच अनेक नौदलाची लढाऊ जहाजे यांचा काफिला कोणालाही कल्पना नसताना पाकिस्तानच्या कराची बंदराच्या परिसरात पोहचला. सर्वप्रथम त्यांनी तेथून कोणतीही पाकिस्तानी युद्धनौका बाहेर पडू नये म्हणून एक प्रकारे बोटींची 'नाकाबंदी' केली होती. यथावकाश रात्री विक्रांतवरची विमाने बॉम्ब घेऊन कराचीवर झेपावली. त्याचबरोबर विक्रांतवरील महाकाय तोफा धडधडू लागून 25 ते 30 किमी लांबीवरून त्यांचे तोफगोळे कराची बंदरावरील पेट्रोलचे टाक्या सैनिकी आस्थापनाला उद्ध्वस्त करू लागले. बराच वेळ पाकिस्तानी सैन्याला वाटले की, हे हवाई दलाचेच आक्रमण आहे, मात्र प्रत्यक्षात ती नौसेनेची यशस्वी कारवाई होती. त्या हल्ल्यात पेट्रोलच्या टाक्या नष्ट झाल्यामुळे जरी पाकिस्तानकडे सैबंर जेटसारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने होती. तरी त्यांना उडवायला प्रतिहल्ला करायला पेट्रोलच पुरेसे नव्हते. त्यामुळे बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तान विमानदलाला फारसा प्रतिकार करायची संधीच मिळाली नाही. उलट कराची नंतर बांगलादेशच्या लढाईत पुढे सरकरणार्‍या भारतीय सैन्याची आगेकुच रोखण्यासाठी पाकिस्तानचे हवाई दल संपूर्ण भारतावर उड्डाण करून भरपूर पेट्रोल जाळून बांगलादेशातील रणक्षेत्रात पोहचूच शकत नव्हती.
उलट जरी अमेरिकेची युद्धनौका बंगालच्या उपसागरात उभी होती, तरी भारतीय नौदलाने बांगलादेशातील महत्त्वाच्या बंदरामधूनही घुसण्याचे मार्ग बंद केले होते. त्यामुळेच 16 डिसेंबरला बांगलादेशमध्ये पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली. ढाक्यामध्ये भारतीय सैन्याचे प्रमुख जगजितसिंग ब्रार यांनी पाकिस्तानी सैन्याचे जनरल नियाझी यांच्याकडून शरणागती स्वीकारली! भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावणारा, पाकिस्तानची शकले बनविणारा, कूटनीती, युद्धनेतृत्व, सैनिकी क्षमता, डावपेच, हवाई दल, नौदल या सर्वाची संयुक्त कारवाई या सर्वच दृष्टीने बांगलादेशच्या युद्धाचा विजय भारताच्या इतिहासात अद्वितीय ठरतो. म्हणूनच 3 डिसेंबरला त्या युद्धाची स्मृती जागविण्यासाठी गेट वे ऑफ इंडियावर नौदलाचे संचलन, युद्धनौकांची सजावट, रोषणाई केली जाते. 'नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस' या म्हणीप्रमाणे विजयासारखा श्रेष्ठ आनंद नाही. याच राष्ट्रीय भावनेने 3 डिसेंबरचा नौदल दिन सप्ताह भारताच्या विजयश्रीची घटना असल्याने ती स्मृती जागवत भारताच्या विजयाचा आनंद साजरा करूया!
ऍडमिरल देवेंद्र जोशी यांची धाडसी भूमिका
दक्षिण चीन समुद्रावरून वाद उफाळून आला असतानाच, भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल देवेंद्र जोश यांनी आज अतिशय धाडसी भूमिका घेतली आहे.या समुद्रातील तेलाच्या विहिरींचे रक्षण करण्यासाठी गरज भासल्यास, या संवेदनशील भागातही नोदल तैनात करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण चीन समुद्रात तेल उत्खनन करण्याच्या मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असताना आणि चीनने हल्ल्याचीही धमकी दिली असताना, चीनला अशा प्रकारचा इशारा देणारे देवेंद्र जोशी हे भारतीय सशस्त्र दलाचे पहिलेच प्रमुख ठरले आहेत.
भारतीय नौदल जगातील सहावे मोठे नौदल म्हणून ओळखले जाते. नौदल प्रमुख म्हणून जोशी यांनी याच वर्षी सूत्रे स्वीकारली आहेत. पाणबुड्या नष्ट करण्याच्या तंत्रात ते तज्ज्ञ समजले जातात.चीन आपल्या नौदलाचा ज्या गतीने विकास करीत आहे, ती बाब भारतासाठी चिंताजनक अशीच आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
विशेष म्हणजे, उद्या मंगळवारी भारतीय नौदलाचा वर्धापनदिन आहे. या दिनाच्या पूर्वसंध्येवर ऍडमिरल जोशी यांनी आपला आक्रमक पावित्राच सिद्ध केला आहे

No comments:

Post a Comment