पोलीस डायरी
परप्रांतीय आरोपी मुंबई पोलिसांच्या मुळावर- प्रभाकर पवार
मुंबईतील सर्व गुन्ह्यांत ८० टक्के परप्रांतीय गुन्हेगार आहेत. फिर्यादी मुंबईचे व आरोपी परप्रांतातील असल्याने मुंबई पोलिसांची त्यांचा शोध घेण्यासाठी दमछाक होत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. पैशाचा अभाव, तरीही मुंबई पोलीस जीवाची बाजी लावून परप्रांतात पळालेल्या खुनी, दरोडेखोर आरोपींना मुंबईत आणीत आहेत. हे अलीकडील यावर्षीच्या सर्वच गंभीर गुन्ह्यांचा छडा लागल्यानंतर दिसून आले आहे. तेव्हा राज्य शासन लोंढे थांबवणार नसेल तर मुंबई पोलिसांच्या शाखा प्रत्येक राज्यात का स्थापन करीत नाही, आमची ससेहोलपट का करण्यात येत आहे, असा उपरोधिक सवाल मुंबई पोलीस दलातूनच केला जात आहे.मुंबई पोलीस तपासासाठी किंवा फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी जेव्हा परराज्यात जातात तेव्हा त्यांना बर्याच वेळेला वाईट अनुभव येतो. मुंबईत चोरी, घरफोडी, दरोडा घालणार्या बहुसंख्य आरोपींचे आपल्या राज्यातील पोलिसांशी संधान असते. त्यामुळे त्यांना कळवूनही स्थानिक पोलीस आरोपीला अटक करीत नाहीत. टाळाटाळ करतात किंवा मुंबई पोलिसांच्या अटक वॉरंटची खबर देऊन आरोपीला पळवून लावतात. त्यामुळे मुंबई पोलिसांना बर्याचदा माघार घ्यावी लागते. असे वारंवार अनुभव येत असल्यामुळेच मुंबई पोलीस आपल्या फिर्यादी किंवा खबर्याला घेऊन आरोपीच्या गावी पोचतात, परंतु मुंबई पोलिसांचा हा धाडसीपणा कधी कधी त्यांच्या अंगाशी येतो. पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवूनही त्यांना खोटे ओळखपत्र आहे. आपण चोर, दरोडेखोर आहात, असा आरोप ठेवून काही प्रसंगी त्यांना आरोपींच्या साथीदारांकडून मारहाण केली जाते. मग आपला जीव वाचविण्यासाठी मुंबई पोलिसांना आरोपी हाती लागूनही हात हलवत मुंबईला परतावे लागते किंवा नंदकुमार देठेसारखी गत होते. गेल्याच महिन्यात प्रभादेवी येथे भरदिवसा रस्त्यावर इडली विकणार्या दाक्षिणात्य विक्रेत्याची कर्नाटकातून आलेल्या तरुणांनी हत्या केली. त्या आरोपींची दहशत व ते राहत असलेले ठिकाण ऐकून दादर पोलिसांनी त्या राज्यात जाऊन आरोपींना पकडण्याचे धाडस केले नाही. तेथील स्थानिक पोलिसांना कळवून त्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
मुंबईतील घरफोडी, दरोडा, जबरी चोरी व खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात बहुसंख्य आरोपी हे परप्रांतातील असतात व गुन्हा केल्यानंतर ते तत्काळ आपल्या राज्यात पळून जातात. माहिती मिळाल्यावर त्यांना पकडून त्यांच्याकडील चोरीची मालमत्ता हस्तगत करण्यासाठी पोलिसांना अलीकडे विमानानेच प्रवास करावा लागतो. मग हा प्रवास खर्च सरकार देते का? अजिबात नाही. हा सारा खर्च तपास अधिकार्यांनाच मॅनेज करावा लागतो आणि पोलिसांची, सरकारची अब्रू वाचविण्यासाठी गुन्ह्यांचा छडा लावावा लागतो याचा कुणीही राज्यकर्ते विचार करीत नाही. आज मुंबई पोलिसांना सुमारे १० हजारांच्या वर आरोपी वॉण्टेड आहेत. कुणी जामिनावर असताना पळाले आहेत, तर कुणी गुन्हा करून फरारी आहेत. आरोपी मुंबईत येतात, भाड्याच्या घरात राहतात आणि गुन्हा करून पळून जातात. हे आता नित्याचे झाले आहे. नोकरचाकर मिळत नाहीत. म्हणून कुणाही नोकराला कामाला ठेवल्यानंतर तो मालकाचे वैभव पाहून घरातील गृहिणीचा खून करतो आणि घरातील रोकड व ऐवज पळवून नेतो. सर्वात इमानदार म्हणून ओळखल्या जाणार्या गुरखा-नेपाळींनाही आज कामावर ठेवणे धोक्याचे झाले आहे. तेथेही माओवादी घुसले आहेत. त्या फरारी माओवादींना पकडण्यासाठी पोलिसांना नेपाळ गाठावे लागते, परंतु तेथे जाणेही धोक्याचे आहे. नेपाळमध्ये आरोपींच्या शोधासाठी गेलेल्या डोंबिवलीच्या पोलीस अधिकार्यांनाच तेथील पोलिसांनी सहा महिने रिव्हॉल्व्हरचा परवाना नसल्याचे कारण दाखवून जेलमध्ये टाकले होते. चकमकी थांबल्याने आता पोलिसांच्या समस्या वाढल्या असून परप्रांतात जाऊन आरोपींचा शोध घेणे त्यांच्या मुळावर येत आहे.
No comments:
Post a Comment