इंद्रकुमार गुजराल एक अभ्यासू, सुसंस्कृत आणि शालीन राजकारणी
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांना सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.गुजराल (वय ९२) यांचे शुक्रवारी गुडगावमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले होते. शनिवारी दिल्लीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह देशातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. गुजराल यांच्या पाठीमागे नरेश आणि विशाल ही दोन मुले आहेत. त्यांचे बंधू सतीश गुजराल हे प्रसिद्ध चित्रकार आणि वास्तरचनाकार आहेत. त्यांच्या पत्नीचे २०११ मध्येच निधन झाले होते. भारतामध्ये जे काही अभ्यासू, सुसंस्कृत आणि शालीन असे राजकारणी होते, त्यामध्ये इंद्रकुमार गुजराल यांचे स्थान खूप वरचे होते. याचे कारण ते धंदेवाईक राजकारणी नव्हते. अत्यंत अभ्यासू असे त्यांचे व्य्नितमत्त्व होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. परंतु स्वत:भोवती सतत प्रकाशझोत मिरवित ठेवणे याला त्यांनी कधीही महत्त्व दिले नाही. त्यामुळेच ते राजकारणात मागे पडले. ते कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. गांधी घराण्यावर त्यांची आत्यंतिक श्रद्धा होती. 1971 ते 1975 या काळात कॉंग्रेसमधले जे कुणी तरुण तुर्क म्हणून नावाजले होते त्यात इंद्रकुमार गुजराल, मोहन धारिया आणि चंद्रशेखर हे त्रिकूट होते.
4 डिसेंबर 1919 मध्ये पाकिस्तानातील झेलम येथे जन्मलेल्या गुजराल यांनी ऐन तारुण्यात स्वत:ला स्वातंर्त्य चळवळीत झोकून दिले. 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय असलेले इंद्रकुमार फाळणीनंतर भारतात स्थायिक झाले. पुढे काँग्रेस पक्षाशी त्यांची नाळ जुळली. 1964 मध्ये त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली. इंदिरा गांधी यांना 1966 मध्ये पंतप्रधान बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. इंदिरा गांधींनी त्यांच्यावर माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी दिली. ती त्यांनी प्रभावीपणे पार पाडली. आणीबाणीच्या काळात त्यांनी काही काळ भारताचे रशियातील राजदूत म्हणूनही काम पाहिले. गुजराल डॉ्कटरीन राजकारणातील प्रदीर्घ कारकीर्द असलेले आणि देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे इंद्रकुमार गुजराल यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक पदे भूषवली असली तरी एक बुद्धिमान आणि मुत्सद्दी परराष्ट्रमंत्री हीच त्यांची ओळख कायम राहिली. 1989 मध्ये व्ही. पी. सिंग सरकारमध्ये ते परराष्ट्रमंत्री बनले. 1996 मध्ये देवेगौडा सरकारमध्येही त्यांच्यावर पुनश्च परराष्ट्रमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शेजारी देशांशी संबंध कसे असावेत यांची नियमावली तयार करून देशाच्या परराष्ट्र धोरणाला एक नवा चेहरा देणारे परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.त्या वेळी त्यांनी राबविलेली परराष्ट्र धोरणे भारतासाठी लाभदायक ठरली. विशेषत: शेजारी राष्ट्रे बांगलादेश, भूतान, मालदिव, नेपाळ आणि श्रीलंका यांच्याशी सलोख्याचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी त्यांनी एक पंचसूत्री राबविली. त्याचा भारताला मोठा लाभ झाला. 'गुजराल सिद्धांत' नावाने ती आजही ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुजराल यांच्या या पंचसूत्रीची दखल घेतली गेली. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधाबाबतचे त्यांचे धोरण या तत्वावर निर्माण झाले होते व ते ह्यगुजराल डॉक्टरीन या नावाने गाजले होते. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचे राजकारण केले तर फक्त विद्वेशच वाढीस लागेल, शेजारी असलेल्या राष्ट्राशी सतत वितुष्ट ठेवणे योग्य नाही, त्यामुळे संबंध चांगले ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजेत अशी त्यांची धारणा होती. ते एप्रिल १९९७ ते मार्च १९९८ असे फक्त एकच वर्ष पंतप्रधान होते, पण तेवढय़ा अल्प काळात त्यांनी भारत-पाक संबंधांची दिशा बदलून टाकण्याचा प्रयत्न केला.. गेली त्यांचे उर्दू भाषेवर प्रभुत्व होते व ते शायरीही करीत. अशा या कलासक्त व अभ्यासू नेत्याच्या आठवणी भारत-पाक सरहद्दीवर दीर्घकाळ रेंगाळत राहतील.
तत्त्वांशी तडजोड केली नाहीआता पाकिस्तानात असलेल्या झेलम येथे त्यांचा जन्म झाला आणि फाळणीनंतर ते हिंदुस्थानात स्थलांतरित झाले होते. ते स्वत: उत्तम शायर होते. उर्दूवर त्यांचे अस्खलित प्रभुत्व होते. शेजारील देशांशी उत्तम संबंध कसे राखावे याबाबत त्यांनी साकारलेले गुजराल डॉ्कटरीन हे आजही आदर्श मानले जाते. एकदा पंतप्रधानपद भूषविल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरे कुठलेही पद स्वीकारले नाही. आपण पंतप्रधानपद भूषविलेले आहे ते सर्वोच्च पद आहे आणि ते भूषविल्यानंतर आपण अन्य पदाचा मोह धरायचा नसतो, हा राजकारणातला सुसंस्कृत संकेत त्यांनी पाळला. त्यांच्या मुलांच्या रूपाने त्यांची दुसरी पिढी राजकारणात आहे. परंतु त्यांनाही त्यांनी बापाच्या रुबाबावर नव्हे तर स्वत:च्या हिंमतीवर पुढे या अशा शब्दात सुनावले होते. उमेदवारी मिळविण्यापासून ते विजयी होण्यापर्यंत सारे काही तुम्ही तुमच्या कर्तबगारीवर करा. तुमची उमेदवारी आणि तुमचे मंत्रीपद या कशासाठीही मी तुमची शिफारस करणार नाही. कुणाकडेही शब्द टाकणार नाही. असा करारी बाणा त्यांचा होता. अत्यंत मृदू स्वभावाचे गुजराल यांनी राजकारणात तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत सूचना व प्रसारण खात्याचे मंत्री असताना संजय गांधी यांचे आदेश त्यांनी धुडकावून लावले. त्यासाठी त्यांनी मंत्रीपदावर पाणी सोडले. मात्र घटनाबाह्यहस्तक्षेप सहन करणार नाही, अशी कणखर भूमिका त्यांनी त्या वेळी घेतली.
पंतप्रधानपदात अपयशीरुबिया सईद अपहरण प्रकरणातील वाटाघाटीमध्ये पाच दहशतवाद्यांची मुक्तता आणि कुवेतवरील इराकच्या आक्रमणाच्या वेळी सद्दाम हुसेन यांची भेट यामुळे ते वादात राहिले.१९९६ मध्ये जनता दलासहित अनेक पक्षांचे पुरोगामी आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा देवेगौडा मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा एकदा परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले. त्यावेळी देवेगौडा सरकारला बाहेरून पाठिंबा देणा-या काँग्रेसने देवेगौडांना नाकारल्यावर आश्चर्यकारकपणे पंतप्रधानपदाची माळ गुजराल यांच्या गळ्यात पडली.
चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांचे नाव आल्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास त्यांनी भाग पाडले. 1997 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा त्यांचा निर्णय वादात अडकला. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी त्या निर्णयावर स्वाक्षरी न करता तो पुनर्विचारासाठी सरकारकडे परत पाठविला होता. त्यामुळे गुजराल यांच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती.अर्थात लालू प्रसादांचा चारा घोटाळा, उत्तर प्रदेश सरकार बरखास्तीचा निर्णय आणि शेवटी राजीव गांधी हत्या प्रकरणाबाबतचा जैन अहवाल यांच्या तडाख्यात सापडलेल्या गुजराल सरकारला विशेष कामगिरी करता आली नाही. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यावर काही वर्षे राजकारणात राहिल्यावर त्यांनी राजकारणातून बाजूला होणे पसंत केले. परराष्ट्र धोरणाबाबतचा विशेषत: भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचा त्यांचा आग्रह मात्र, त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला आपल्या सहा दशकांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले. मात्र एक शालीन राजकारणी म्हणून ते आपली प्रतिमा कायम ठेवण्यात यशस्वी ठरले. त्यावर त्यांनी कधीही डाग पडू दिला नाही. अलिकडच्या राष्ट्रीय राजकारणाच्या घाणेरड्या प्रवाहात गुजराल यांचे व्यक्तिमत्त्व देशासाठी आदर्श होते आणि आहे. आपण थकल्याचे लक्षात येताच, सत्तेचा आणि खासदारकीचा मोह सोडून ते 14 वर्षांपूर्वी सक्रीय राजकारणातून निवृत्तही झाले होते.सध्याच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकारणात इंद्रकुमार गुजराल यांच्यासारखे नेते अपवादानेच मिळतील. त्यांच्या निधनाने देश एका आदर्शवत राजकारण्याला मुकला आहे.
No comments:
Post a Comment