लोकशाहीने लोकांना काय दिले? नवे संस्थानिक व नवाब निर्माण केले
ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरन ‘‘हिंदुस्थानच्या लोकशाहीने लोकांना काय दिले? काहीच नाही. मात्र नवे संस्थानिक व नवाब निर्माण केले. लोकशाही म्हणजे मंत्र्यांना सुरक्षा व जनतेचा खोळंबा. लोकशाहीतील नवाबांसाठी दिल्लीत सर्वत्र ‘जाम’ लागला आहे. युरोपियन राष्ट्रांतील पंतप्रधान व मंत्र्यांचा साधेपणा आपल्याकडे कधी येणार?
हिंदुस्थानात लोकशाही आहे म्हणजे नक्की काय आहे असा प्रश्न पडावा, असे प्रसंग रोज डोळ्यांसमोर घडत असतात. लोकशाहीचा खरा अर्थ सध्याच्या राज्यकर्त्यांनी बदलून टाकला आहे व लोकशाहीने नवे नवाब, संस्थानिक, महाराजे निर्माण केले. हे राजे व नवाब लोकांपासून तुटले आहेत. दिल्लीस जाण्यासाठी सोमवारी संध्याकाळी मुंबईच्या विमानतळावर पोहोचलो तर मुख्य दारापाशीच पोलिसी गाड्यांचा मोठा ताफा. सशस्त्र पोलिसांची गर्दी. बॉम्बशोधक पथकाची गाडी. बर्याच लाल दिव्याच्या गाड्या. आत प्रवेश केला तेव्हा पोलिसांची वर्दळ जास्तच जाणवली. काही पोलीस गलेलठ्ठ कुत्री घेऊन आतमध्ये फिरत होते. त्यातील एका कुत्रेवाल्याला मी अलगद विचारले, ‘काही गडबड झालीय का?’ त्यावर तो चिलखतधारी पोलीस लाजून म्हणाला, ‘नाही. देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निघाले आहेत.’ लोकशाहीत लोकांपेक्षा सगळ्यात जास्त सुरक्षा मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना लागते. आसामातील हिंसाचारात लोक मारले जात आहेत. पण सरकार चालवणारे सुरक्षेच्या कडेकोट पिंजर्यात फिरत आहेत. मुंबईतील दंगलखोर मुसलमानांनी पोलिसांवर हल्ले केले. पन्नास महिला पोलिसांवर फक्त बलात्कार केला नाही असेच म्हणायचे. बाकी त्यांची अब्रू पोलीस आयुक्तांसमोर लुटली. मात्र पोलिसांची कुत्री मुंबईच्या विमानतळावर हुंगत फिरत आहेत.याआधी चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री होते. त्यांनी सुरक्षेचा हा थाट झिडकारला होता. दिल्लीच्या विमानतळावर त्यांना मी अनेकदा एकट्याने आत शिरताना पाहिले आहे.सर्वत्र ‘जाम’!
आमच्या देशातील लोकशाही कशी आहे ते पहा. दिल्लीच्या रस्त्यांवर राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, उपराष्ट्रपती, सोनिया, प्रियांका, राहुल गांधी या नवाबांसाठी लोकांची वाहने नेहमीच अडवली जातात. राज्यातही मुख्यमंत्री व इतर नवाबांसाठी हेच घडते व यालाच आपण लोकशाही म्हणतो. लोकांचा खोळंबा करून नवाबांसाठी मार्ग मोकळा करणारी लोकशाही देशात सुरू आहे.पांढरा हत्ती!
लोकशाहीचे ढोल हिंदुस्थानात जरा जास्तच वाजवले जातात. पण हिंदुस्थानातील लोकशाही म्हणजे पांढरा हत्ती बनली आहे. हा हत्ती फक्त पैसे खातो. लोकशाहीत ‘व्हीआयपी’ संस्कृती वाढली आहे. हिंदुस्थानचे राष्ट्रपती दीडशे एकरांवरील भव्य प्रासादात राहतात. पंतप्रधान पन्नास एकरांवरील बंगल्यात राहतात. दिल्लीतील मंत्री व बडे अधिकारी वीस - पंचवीस एकरांच्या बंगल्यात राहतात. राज्यातील जिल्ह्यात काम करणारे कलेक्टर, पोलीस अधीक्षकदेखील वीसएक एकरांच्या सरकारी बंगल्यात राहतात. ही आमच्या लोकशाहीची प्रतीके आहेत. नॉर्वेनामक देशाचे पंतप्रधान सामान्य नागरिकांप्रमाणे गल्लीतल्या एका घरात राहतात. स्वीडनचे पंतप्रधानही साध्या घरात राहतात. इटलीच्या पंतप्रधानांचे घर मी पाहिले. आपल्याकडील आमदारांची, नगरसेवकांची घरे त्यापेक्षा मोठी आहेत. हे सर्व राज्यकर्ते घरांपासून कार्यालयापर्यंत पायी जातात किंवा बसने जनतेबरोबर प्रवास करतात. आमच्या देशात याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही.ब्रिटनमधील चित्र!
जुलै महिन्यात ब्रिटनच्या पंतप्रधानांविषयी घडलेला हा प्रसंग बोलका आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरन व त्यांचे अधिकारी ‘सेना दिवस’ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले होते. वाटेत त्यांना कॉफी पिण्याची हुक्की आली. ते एका कॉफी शॉपमध्ये घुसले. तिथे गर्दी होती. तेथील महिला वेटरला कॅमरन यांनी विचारले, ‘कॉफी मिळेल का?’ त्या वेटरने सांगितले, ‘जरूर. पण थोडे थांबावे लागेल. गर्दी आहे व इतरांनी तुमच्या आधी ऑर्डर दिली आहे!’ कॅमरन व त्यांच्या सहकार्यांनी त्या गर्दीत पंधरा मिनिटे वाट पाहिली. महिला वेटरने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. तेव्हा ते दुसर्या ‘रेस्टॉरंट’मध्ये गेले. तेथे त्यांना वेटरने ओळखले व पटकन कॉफी पाजली. ब्रिटनच्या वृत्तपत्रांनी यावर रकाने भरून पंतप्रधानांच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह लावले. हिंदुस्थानात आपले पंतप्रधान व राष्ट्रपती असे उतरून ‘कॉफी शॉप’मध्ये जाणार नाहीत. ते त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही व गेलेच तर आधी सुरक्षा रक्षक त्या कॉफी शॉपमध्ये घुसून ताबा घेतील व इतर गिर्हाकांना बाहेर काढतील. मग आपले पंतप्रधान व त्यांचे कुटुंबीय एकटेच सुरक्षा रक्षक व हुंगणार्या कुत्र्यांच्या गराड्यात चहा पीत बसतील. ही आमची लोकशाही आहे!युरोपियन राष्ट्रांचा साधेपणा!
ब्रिटनचे हेच पंतप्रधान डेविड कॅमरन इटलीच्या शासकीय दौर्यावर गेले. सरकारी कामकाज संध्याकाळी संपल्यावर ते पत्नीसह बाहेर पडले. चालत समोरच्या रस्त्यावरील कॉफी शॉपमध्ये गेले. तेथेही महिला वेटरने त्यांना कॉफी देण्यास नकार दिला. कारण ‘ती खूप व्यस्त’ होती. याचा बाऊ पंतप्रधानांनी केला नाही व आपण ब्रिटनचे पंतप्रधान असल्याची ओळख दाखवून रुबाब मारला नाही. हिंदुस्थानच्या पंतप्रधानांबाबतीत हा प्रकार घडला असता तर ‘हा पंतप्रधानांचा, देशाचा अपमान’ वगैरे मानून जोरात बोंब मारली असती. कारण आमच्या लोकशाहीत प्रोटोकॉल, बडेजाव व नवाबी थाटास महत्त्व आले आहे. युरोपीय राष्ट्रांतील पंतप्रधान साध्या नागरिकाप्रमाणे साध्या घरात राहतात. ते बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यासाठी रस्त्यावरची वाहतूक थांबवून जनतेचे हाल केले जात नाहीत. सुरक्षेच्या नावाखाली लोकांना त्रास दिला जात नाही. आमच्या देशात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार वगैरे जनतेचे नोकरही मोठा फौजफाटा घेऊन फिरत असतात. हा थाटमाट शेवटी जनतेच्या पैशांची उधळपट्टी असते. ब्रिटनचे पंतप्रधानसुद्धा इस्लामी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत व ब्रिटनमध्येही बॉम्बहल्ले झाले आहेत. तरीही पंतप्रधान कॅमरन खुलेपणाने फिरतात व कॉफी पिण्यासाठी चालत ‘कॉफी शॉप’मध्ये जातात. तेथे कोणीच ओळखले नाही म्हणून ‘प्रोटोकॉल’ बिघडला, असे त्यांना वाटले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हेसुद्धा रस्त्यात गाडी थांबवून ‘मॅकडोनाल्ड’मध्ये घुसतात. रांगेत उभे राहून मुलींसाठी बर्गरचे पार्सल घेऊन बाहेर पडतात. लोकशाही ब्रिटनमध्ये आहे. अमेरिकेत आहे, पण हिंदुस्थानच्या नवाबी लोकशाहीशी कुणीच बरोबरी करू शकणार नाही.बुधवारी सकाळी लोधी गार्डनच्या सिग्नलवर अचानक सर्व वाहतूक थांबवून रस्ते मोकळे केले. मी विचारले, ‘कोण चालले आहे...कोणासाठी?’ ट्रॅफिक पोलीस म्हणाला, ‘साहेब, प्रियंका व रॉबर्ट वढेरा निघाले आहेत.’प्रियंका व रॉबर्टची मुलेही आता मोठी होत आहेत एवढाच विचार मनात आला.युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत हिंदुस्थानचा रुपया रसातळाला गेला. ब्रिटन पौंड ८० रुपये, युरो ७० रुपये, अमेरिकेचा डॉलर ५२ रुपये. अशी रुपयाची घसरण. पण लोकशाहीतील नवाबांची किंमत व प्रोटोकॉल वाढतोच आहे
No comments:
Post a Comment