पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांशी चार-पाच सामने खेळले म्हणजे सारं काही आलबेल होईल?
शेखचिल्लीची स्वप्नं पाहण्यात आपल्या भारतीयांचा हात जगामध्ये कोणी धरू शकणार नाही. आपल्या नक्की काय अपेक्षा आहेत? भारत-पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांशी चार-पाच सामने खेळले म्हणजे सारं काही आलबेल होईल? हिंदी-पाकी एकमेकांच्या गळयात गळे घालून फिरतील…? तणाव-बिणाव साफ नाहीसे होतील? सीमेपलीकडूनचा गोळीबार पटकन थांबेल? देशातल्या दहशतवादी कारवाया तर एका झटक्यात थांबतील? की नेहमी जीव मुठीत घेऊन फिरणारी भारतीय जनता लगेच निर्भय, सुरक्षित जीवन जगू लागेल…?का
य गंमत आहे पाहा. एका बाजूला पाकिस्तानचा नराधम दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकावलं म्हणून आपण जल्लोश साजरा करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी पायघडया अंथरण्यासाठी सज्ज होतोय.
क्रिकेटच्या आधारे खेळला गेलेला 30-35 वर्षांपूर्वीचा तो सुप्रसिध्द प्रयोग तुम्हाला आठवतोय? 1965चं काश्मीर युध्द नि 1972चं बांगलादेश युध्द यामुळे भारत-पाकमधले संबंध विकोपाला गेलेले. त्यावर उतारा म्हणून दोन्ही देशांनी वेठीस धरलं ते क्रिकेटला. या खेळाच्या प्रेमापोटी संबंध सुरळीत होतील या भाबडया आशेवर 1978पासून दोन्ही देशात आलटून-पालटून कसोटी मालिका खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. एकदा भारतात तर एकदा पाकिस्तानमध्ये. पुढची सलग 10-12 वर्षं एखाद्या घाण्याला बैल जुंपावेत तसे दोन्ही संघ मारून-मुटकून एकमेकांशी खेळत होते. का, तर म्हणे उभय देशांतले संबंध सुधारावेत म्हणून…!प्रत्यक्षात काय घडलं? हा प्रयोग टिकला नाहीच. संबंध सुधारण्याचे सोडूनच द्या, पुढे ते बिघडतच गेले. इतके, की ऐंशीचं दशक संपत असताना क्रिकेटचे सामने खेळण्याऐवजी, चिघळत गेलेल्या काश्मीर प्रश्नावर दोन्ही देशांचं सैन्य सीमेवर एकमेकांसमोर उभी ठाकली होती. क्रिकेटमध्ये जोडण्याची ताकद होती तर संबंध असे तुटेपर्यंत का ताणले गेले?
बरं, या ऐतिहासिक प्रयोगादरम्यान घडत तरी काय होतं? पाकमध्ये भारतीय खेळाडूंच्या पदरी पडत होती ती अवहेलना, मानहानी अन क्वचित प्रसंगी मारहाणसुध्दा. पाक पंचांचा पक्षपात तर पाचवीला पुजलेला. इतका, की एकदा पाक पंच त्यांच्या गोलंदाजांच्या नो-बॉलकडे जाणून-बुजून करत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्याकरिता सुनील गावस्करला क्रीजच्या पुढे आणखी एक रेषा मारावी लागली होती. मनोज प्रभाकर तर पाक प्रेक्षकांच्या हल्ल्याचं लक्ष्य ठरला होता. याच्या परस्परविरोधी चित्र भारतात दिसायचं. पाक खेळाडू इथे येऊन मस्तपैकी राजेशाही पाहुणचार झोडायचे. शेजारधर्माला जागून भारत त्यांची छान सरबराई करायचा. पण सापाला दूध पाजूनही तो विषच ओकतो, अशातला हा प्रकार!
इम्रान खान हा भारतीय जनतेचं सर्वाधिक प्रेम लाभलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू. त्याच्या गुणवत्तेवर भारतीय प्रसारमाध्यमांनी प्रचंड स्तुतिसुमनं उधळली. त्याच्या राजबिंडया रूपावर तर आख्खं बॉलीवूड फिदा. जगाच्या पाठीवर कुठेही मिळालं नसेल एवढं कौतुक त्याला भारतीयांकडून लाभलं. पण एवढं असूनही त्याचा भारताबद्दलचा द्वेष मात्र कमी झाला नाही. आज हाच इम्रान राजकारणी बनून पाकिस्तानात वावरतोय आणि भारताविरुध्द गरळ ओकतोय. ‘कसाबच्या फाशीच्या बदल्यात भारतीय कैदी सरबजीत सिंगला पाकिस्तानने ताबडतोब फाशी द्यावी,’ अशी मागणी त्याच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने केलीय. सरबजीत हा वाट चुकून पाकिस्तानमध्ये प्रवेश केलेला एक सामान्य माणूस, तर कसाब हा शेकडोंचे बळी घेणारा एक क्रूरकरर््मा. पण या दोघांनाही एकाच तराजूत मोजण्याची किमया इम्रानने केलीय. बहुधा त्याच्या मते हाच बंधुभाव असावा.
एवढी सगळी उदाहरणं डोळयासमोर असूनही इतिहासात वारंवार फसलेला हा बंधुभावाचा खेळ रंगवायला आपण पुन्हा एकदा सज्ज झालोत. त्यासाठी जेवढे भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी आतुर आहेत, तेवढेच आमचे राज्यकर्तेसुध्दा. अर्थात यात अर्थकारणसुध्दा सामील आहेच. भारत नि पाकिस्तान यांच्यातले सामने म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडीच. तिला कसं लाथाडायचं? अशा बक्कळ पैशासमोर देशहित कितीसं महत्त्वाचं! आणि त्याला विचारतो तरी कोण!
एकदा का हा खेळ रंगला की सगळेच आपलं देहभान विसरून त्याचा थरार लुटत राहतील. सारेच त्याच्यात गुंतून राहतील. अशा वेळी – फार नव्हे, अवघ्या चार वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी या देशावर आजवरचा सर्वात मोठा घातक हल्ला चढवला होता, त्याचे चटके देशाला अजूनही पोळत आहेत, बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या डोळयातले अश्रू अजूनही सुकले नाहीत, याचा सर्वांना सोईस्कर विसर पडेल.
आणि मग हळूहळू असे बरेच खेळ रंगत राहतील. कदाचित पुन्हा एखादा हल्ला होईपर्यंत! तेव्हा सर्वांचे डोळे पुन्हा उघडतील. तोपर्यंत नेहमीप्रमाणेच उशीर झालेला असेल. पण त्याची पर्वा आहे कुणाला? आपण तोपर्यंत मस्तपैकी क्रिकेट एन्जॉय करू या!
No comments:
Post a Comment