देशामध्ये
एकही शहर असे नसेल, जेथे स्त्री सुरक्षित आहे
दोषी
कोण? दिल्लीमध्ये रविवारी घडलेल्या घृणास्पद बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले. लोकप्रतिनिधींनाही त्या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी लागली आणि संसदेतही कडक प्रतिक्रिया उमटल्या. बलात्कार्यांना फाशी दिली जावी, स्त्रीसुरक्षा विषयक कायदे कडक व्हावेत, महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष पुरवले जावे वगैरे मागण्या सर्व थरांतून आज केल्या जात आहेत. कोणी मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे काढले, कोणी घोषणा देत आणि फलक नाचवीत निदर्शने केली, कोणी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आणि ज्यांना यापैकी काहीही करणे जमले नाही, त्यांनी घरी आणि कार्यालयांत या भयावह प्रकाराची चर्चा करून निषेध व्यक्त केला. प्रतिक्रिया काहीही असो, या घटनेची वार्ता ज्याच्या ज्याच्या कानी गेली, त्याला तिने अस्वस्थ केले एवढे खरे. सर्वांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली हे खरे, पण एवढे सगळे घडल्यावर पुढे काय? आणखी काही दिवसांनी ही घटना विस्मृतीत जाईल. पुन्हा दुसर्या एखाद्या मुलीवर दुसर्या एखाद्या शहरात असा प्रसंग उद्भवेल, तोपर्यंत सारे शांत झालेले असेल. आपल्या देशामध्ये स्त्रियांवरील अत्याचार वाढत चालले आहेत.केवळ दिल्ली हेच ‘रेप कॅपिटल’ अशा भ्रमात राहण्याचे काही कारण नाही. देशामध्ये एकही शहर असे नसेल, जेथे स्त्री सुरक्षित आहे असे ठामपणे म्हणता येईल. गोवेकरांनीही त्या भ्रमात न राहणेच श्रेयस्कर. स्थलांतरितांचे लोंढे येऊ लागले की गावे बिनचेहर्याची होऊ लागतात. त्यातून अशा समाजकंटकांचे फावते. गुन्हेगारीला मोकळे रान मिळते. माणसांमधील पशुत्व जागे झाले की माणुसकी संपते. मागे उरतो तो केवळ हिंस्त्र श्वापदी चेहरा. या श्वापदांना गुन्हा करण्यापासून रोखू शकेल अशी समर्थ, सजग पोलीस यंत्रणा उभी करण्याच्या दिशेने आपण आजवर काय केले? एखाद्याचा गुन्हा पकडला गेल्यावर त्याला त्याच्या पापाची कठोरातली कठोर सजा नक्की मिळेल याची शाश्वती मुळात आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे का? उद्या याच बलात्कार्यांना खरोखरीच फाशी सुनावली गेली तर मानवाधिकारांचा मुद्दा घेऊन हेच मेणबत्तीवाले पुढे सरसावणार नाहीत कशावरून? गुन्ह्याची तीव्रता पाहून शिक्षाही तेवढ्याच तीव्रतेची असणे ही आज काळाची गरज आहे. कसाबला फाशी दिली म्हणून गळा काढणारे ढोंगी मुंबईत निरपराधांच्या रक्ताचा सडा शिंपला गेला, तेव्हा ‘गुन्हेगारांना सजा द्या’ अशी मागणी करीत होते. प्रत्यक्ष सजा देण्याची वेळ आली तेव्हा मात्र अनेकांना मानवतावाद आठवला. हे निव्वळ ढोंग आहे आणि ते उघडे पाडण्याची वेळ आलेली आहे. देशात आज बलात्काराच्या घटना प्रचंड प्रमाणात घडताना दिसतात. त्यामागे काही मूलभूत गोष्टी कारणीभूत आहेत, ज्यांचाही विचार व्हायला हवा.
स्त्रीची भोगवादी प्रतिमाच सदैव समाजापुढे प्रस्तुत करणारे, तरुणाईच्या लैंगिक भावना चाळवणारे, विकृतीला खतपाणी घालणारे समाजातले विविध घटकही या अशा प्रकारांना अप्रत्यक्षपणे जबाबदार नाहीत का? पोराटोरांचे लेंढार जन्माला घालणे हेच इतिकर्तव्य मानणारे आणि त्यांना संस्कार देण्यात पूर्णतः अपयशी ठरणारे पालक याला जबाबदार नाहीत का? टीव्ही, चित्रपटांपासून ‘किंगफिशर’च्या कॅलेंडरांपर्यंत आणि तथाकथित सौंदर्यस्पर्धांपासून फॅशन शोपर्यंत स्त्रीला एक भोगवस्तू म्हणूनच प्रस्तुत करण्याची आणि त्यावर आपला धंदा करण्याची वृत्तीही समाजामधील या विकृत विचारसरणीला खतपाणी घालत असते. अशा घटनांना अप्रत्यक्षपणे ही मंडळीही जबाबदार आहेच. ‘पेज थ्री’ च्या रूपाने उघड्यावागड्या छायाचित्रांचा रतीब घालणारी वृत्तपत्रे आणि नियतकालिके असोत, गुन्हेगारीला अतिरंजित आणि सवंग रूपात चोवीस तास डोळ्यांपुढे नाचवणार्या वृत्तवाहिन्या असोत, लैंगिकता आणि हिंसाचार यावर गल्ला भरणारे चित्रपट असोत, पोलीस दले सक्षम व्हायला हवीत, कठोर कायदे बनायला हवेत असे म्हणणारे, परंतु प्रत्यक्षात त्यासाठी काहीही न करणारे राजकारणी असोत, त्यांना स्वतःवरील जबाबदारी झटकता येणार नाही. समाजामध्ये अशी विकृती वाढण्यास या सर्वांचेही अप्रत्यक्ष योगदान आहे. आचार - विचारामध्ये सुसंस्कृतता आणण्यात आपली शिक्षण व्यवस्था आणि कुटुंबव्यवस्थाही कमी पडल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे अशा समस्येच्या मुळावर घाव घालण्यासाठी काय करता येईल त्याचाही विचार व्हायला हवा
No comments:
Post a Comment