Total Pageviews

Tuesday, 19 September 2017

हवाईदलाचा भीष्माचार्य By mahadev.kamble


| Publish Date: Sep 19 2017 1:49AM pudhari शनिवारी भारतीय हवाईदलाचे पहिलेवहिले प्रमुख मार्शल अर्जनसिंग यांचे निधन झाले. त्यांची आजच्या पिढीला ओळखही नसेल; पण भारत-चीन युद्धात झालेल्या दारुण पराभवानंतर पुन्हा भारतीय सेनादलाला आपली शान मिळवून देण्यास कारणीभूत झालेल्या 1965 च्या भारत-पाक युद्धाचा हा खरा मानकरी होता. पंडित नेहरूंचे निधन आणि भारताचे नेतृत्व नव्याने करणारे लालबहाद्दूर शास्त्री, याचा फायदा उठवीत काश्मीर पूर्णपणे बळकावण्याची खेळी तेव्हा पाकचे लष्करशहा जनरल आयुबखान यांनी खेळलेली होती. तिला शह देण्याच्या त्या युद्धात अर्जनसिंग यांनी बजावलेली भूमिका अतिशय निर्णायक ठरलेली होती. अकस्मात सुरू झालेल्या त्या युद्धाची तयारी भारताने केली नव्हती. म्हणूनच पाकच्या आक्रमक फौजा मुसंडी मारून पुढे घुसलेल्या होत्या आणि काश्मीर पूर्णपणे भारतापासून तोडण्याचा आयुबखान यांचा डाव जवळपास यशस्वी झालेला होता. कारण, जिथून आक्रमण झालेले होते, त्या भागामध्ये भारतीय पायदळाची कमालीची पीछेहाट झालेली होती आणि दोन दिवस मिळाले तरी पाक सेना यशस्वी ठरली असती. अशावेळी तिथे तातडीने भारतीय सेनादलाची कुमक पाठवणे अजिबात शक्य नव्हते. म्हणूनच तिथे अपुर्या. शक्तीतनिशी किल्ला लढवणार्याु सेनादलाला हवाई दलाने पाठबळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे अर्जनसिंग या महारथीने आपले शौर्य व कुशलता सादर केली. संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हवाईदलप्रमुख म्हणून अर्जनसिंग यांच्याशी सल्लामसलत केली आणि अवघ्या तासाभरात भारतीय हवाईदलाने काश्मीरमध्ये घुसलेले पाकसेनेच्या अत्याधुनिक चिलखती दळ व रणगाड्यांच्या चुराडा करण्याची मोहीम हाती घेतली होती. मुंग्यांचे वारूळ फुटावे तशा रणगाड्यांच्या रांगा भारतीय हद्दीत घुसलेल्या होत्या आणि मोजक्या सैनिक व शस्त्र-सामग्रीनिशी ती आघाडी लढवली जात होती; पण विषय अर्जनसिंग यांच्या हाती गेला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांत पाकसेनेचे कंबरडे मोडण्यात यश आले. इथे नेतृत्वाखाली हा शब्द शोभेचा अजिबात नाही. हा एक सेनापती असा होता, की त्याने सेनेच्या मुख्यालयात बसून लढाया लढल्या नाहीत. थेट आघाडीवर जाऊन आणि हवाई हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होत युद्धनेतृत्व केलेले होते. 1965 च्या त्या युद्धाचा निर्णय त्या मोजक्या हवाई हल्ल्यांनी लावून टाकला आणि महिनाभरही पाकिस्तानला युद्ध चालवता आले नाही. ज्याला भारताची दुबळी बाजू समजून पाकने आक्रमणाचे धाडस केलेले होते. तिथेच त्याचे पुरते खच्चीकरण करून अर्जनसिंग यांच्या हवाई दलाने अपुर्यान सामग्रीनिशी शत्रूला पाणी पाजले. साधने व शस्त्रास्त्रे यावर युद्धे जिंकता येत नाहीत, तर इच्छाशक्तीाच्या बळावर जिंकली जातात; याचे हे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यालाच पुढल्या अर्धशतकात जगाने अर्जनसिंग नावाने ओळखले. 1965 च्या युद्धाशी किंवा त्यातल्या विजयाशी अर्जनसिंग अतूट जोडले गेले. कारण, तेव्हा भारतीय हवाईदल अगदीच बाल्यावस्थेत होते आणि तुलनेने पाकिस्तानी हवाई दलाची साधनसामग्री अतिशय अत्याधुनिक होती. तुटपुंजी विमाने व साधने घेऊन अर्जनसिंग यांनी आपल्या सहकारी जवान वैमानिकांना अशा खुबीने वापरले, की पाकिस्तानपाशी असलेली अमेरिकन आधुनिक विमानेही दिवाळीतल्या फटाक्यासारखी फुसकी ठरली; पण या विजयाच्या श्रेयाने हा सेनापती सुखावला नाही. त्याने भविष्यातील सुरक्षेचा गंभीर विचार करून पाठ थोपटणार्याप सरकार व राजकीय नेत्यांकडून व्यक्तिवगत मानसन्मानापेक्षा हवाईदलाची सज्जता मिळवण्याला प्राधान्य दिले. त्याच्या खास प्रयत्नांमुळे पुढल्या काळात भारतीय हवाईदलाच्या आधुनिकीकरणाला वेग आला. 60 हून अधिक जातींची व बनावटींची विमाने हाताळणार्याा या भीष्माचार्याने, तेव्हा म्हणजे 1965 नंतर ज्या साधने व विमानांचा आग्रह धरला होता, त्यातली बहुतांश सामग्री आजही उपयोगात आणली जाते. हेलिकॉप्टर, वाहतूक विमाने किंवा जेटसारखी वेगवाने लढाऊ विमाने यांचा भरणा हवाईदलात करण्याचा त्यांचा आग्रह सुरक्षेला मजबूत करून गेला. त्यांच्याच संस्कार वा मार्गदर्शनाखाली उभ्या राहिलेल्या हवाईदलाने मग सहा वर्षांनी बांगला युद्धात भारताला अपूर्व यश संपादन करून दिले होते. 1971 च्या युद्धात अर्जनसिंग सेवानिवृत्त झालेले होते; पण त्याही युद्धात पहिल्या दिवशीच पाकिस्तानी हवाईदलाला जमीनदोस्त करून भारताने प्रचंड मुसंडी मारलेली होती. तब्बल अर्धशतकापूर्वी निवृत्ती पत्करलेल्या या सेनापतीने नंतरच्या काळात कधीही स्वत:ला निवृत्त मानले नाही, की सेनादलापासून अलिप्त करून घेतले नाही. अवघ्या दोन वर्षांपूर्वी डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन झाल्यावर वयाच्या 96 व्या वर्षी हा योद्धा त्या रॉकेटमॅनला अभिवादन करायला हजर झाला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रथमच सैनिकी सोहळ्याला आले असताना, त्यांनी अर्जनसिंग यांची मुद्दाम भेट घेतली. अर्जनसिंग यांनी आपल्या खुर्चीतून उठू नये, असे मोदींनी म्हटले; पण ते नाकारून हा सेनापती त्याही अवस्थेत उठून उभा राहिला. देशाच्या पंतप्रधानाला सलामी देणे हे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांनी अभिवादन केलेच. असा वृद्धापकाळातही खडा सैनिक म्हणून जगलेला सेनानी शनिवारी काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावला. एका मान्यवर अमेरिकन सेनापतीच्या शब्दांत सांगायचे तर, ‘सैनिक निवृत्त होत नसतात. ते काळाच्या ओघात अंतर्धान पावत असतात.’ अर्जनसिंग त्याचे मूर्तिमंत प्रतीक होत. भारतीयांसंदर्भात सांगायचे तर भीष्माचार्याचाच हा आधुनिक अवतार म्हणावा लागेल. कारण, ते कधीच निवृत्त झालेले नाहीत. गगनाला गवसणी घालणारी ध्येयासक्ती श्रद्धांजलीची मोताद नसते आदरांजली अखंड हिंदुस्थानातील, अखंड पंजाबात, ल्यालपूर येथे, सैनिकी परंपरा असलेल्या शीख कुटुंबात, अर्जनसिंग यांचा १५ एप्रिल १९१९ रोजी जन्म झाला. आजोबा आणि वडील इंग्रज सैन्याच्या घोडदळात ‘रिसालदार’ होते. अश्वाररोहणाची भारतीय परंपरा गौरवशाली आहे. महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि कित्तुर चेन्नम्मा अशा शूरवीर, धैर्यधर महामानवांची परंपरा आहे ही. साहजिकच नियतीने अर्जनसिंगांना शेकडो-हजारो अश्व शक्तीची विविध विमाने उडविण्यात निष्णात केले. शाळा-कॉलेेज शिक्षणानंतर, इंग्लंडमधील क्रॅनवेल येथे दोन वर्षे त्यांनी सैनिकी-वैमानिक शिक्षण घेतले व त्यात विशेष प्रावीण्य प्राप्त केले. १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. १९४० साली अर्जनसिंग यांना पायलट ऑफिसर या हुद्यावर कमिशन प्राप्त होऊन ते भारतीय वायुसेनेच्या नंबर वन स्क्वाड्रनमध्ये विसाव्या वर्षी रुजू झाले. पुढे त्यांनी आपल्या वैमानिकी जीवनात विविध कारवायांमध्ये साठ विविध प्रकारची, फायटर-ट्रान्सपोर्ट-हेलिकॉप्टर, सर्व प्रकारची विमाने विविध कारवायांमध्ये उडविली. अर्जनसिंगांचे नाव, त्यांच्या आई-वडिलांनी गुरू अर्जनदेव यांच्या नावावरून ठेवले आणि त्यांनी दहाही शीख गुरूंचा आदर्श समोर ठेवून, दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या ‘शबद’चे पालन केले. ‘देहिशिवा, वर मोई एहे शुभकर्मण तों, कबहूँ ना टरूँ ना डरूँ, औ जब जाये लडूँ निश्चूय कर, अपनी जीत करूँ’ १९४४ साली स्क्वाड्रन लीडर अर्जनसिंग, मणिपूरमधील इम्फाळ येथे, नंबर वन स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी फ्लाईंग ऑफिसर आनंद पंडितसारख्या आपल्या सहवैमानिकांसह शेकडो युद्धक-उड्‌डाणे करून, जपानचे भारतावरील आक्रमण थोपवून परतविले. लॉर्ड माऊण्टबॅटन यांनी या धैर्यशाली कामगिरीबद्दल, अर्जनसिंग व पंडित यांना महावीरचक्राच्या दर्जाचा ‘डिस्टिंगविश फ्लाईंग क्रॉस’ दिला. वयाच्या ४४ व्या वर्षी अर्जनसिंग एअर मार्शल झाले व वायुसेनाध्यक्ष झाले. वायुसैनिकी इतिहासातील सर्वात तरुण वायुसेनाध्यक्ष! १९६२ च्या युद्धात दुखावलेला भारतीय स्वाभिमान, १९६५ च्या युद्धात पुन्हा प्रज्वलित-प्रस्थापित करण्यात अर्जनसिंगांचा सिंहाचा वाटा होता. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, सेनाध्यक्ष जनरल चौधरी, नौसेनाध्यक्ष ऍडमिरल सोमण आणि वायुसेनाध्यक्ष एअर मार्शल अर्जनसिंग या निष्ठावंत, धैर्यशील देशभक्तांच्या पंचायतनाने १९६५चे हिंद-पाक युद्ध जिंकून, तिरंग्याची शान अन् देशाची मान उंचावली. पाकिस्तानी आक्रमणानंतर, संरक्षणमंत्री चव्हाणांनी अर्जनसिंगांना बोलाविले होते व सांगितले, ‘‘सेना प्रतिकार करत आहे, पण वायुसेनेच्या मदतीशिवाय कठीण आहे. वायुसेनेला युद्धात उतरण्यास किती वेळ लागेल?’’ ‘‘सर, फक्त एक तास!’’ अर्जनसिंग उत्तरले. एका तासात आपल्या सेनेच्या रक्षणार्थ-समर्थनार्थ भारतीय वायुसेना आकाशात अवतरली आणि पाकिस्तानी सेनेचा, वायुसेनेचा धुव्वा उडविला. एअर मार्शल अर्जनसिंगांच्या निर्भीड, निर्भय, शांत, गंभीर, खंबीर नेतृत्वामुळे आणि सबल, सक्षम, व्यक्तित्व-व्यक्तिमत्त्वामुळेच हे शक्य झाले. सर्वच कनिष्ठ आणि वरिष्ठ वायुसैनिकांनी आणि वैमानिकांनी एकजुटीने, एकात्मतेने, देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन लढा दिला. सेना-नौसेना आणि वायुसेनेमध्ये अद्वितीय ऊर्जा-समन्वय झाला होता आणि त्याचा अप्रतिम परिणाम होऊन, भारताने भूमी-आकाश आणि सागरावर आपले सार्वभौमत्व स्थापित केले. १९६५ च्या युद्धानंतर भारतीय वायुसेनेची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढल्याने, वायुसेनाध्यक्षांचे पद, एअर मार्शलचे एअर चीफ मार्शल करण्यात आले आणि राष्ट्रपती राधाकृष्णन् यांनी, अर्जनसिंगांना ‘पद्मविभूषण’ प्रदान केले. एअर चीफ मार्शल अर्जनसिंग पन्नासाव्या वर्षी निवृत्त झाले. सफल, समाधानी निवृत्ती होती ही! अर्जनसिंगांचे वैशिष्ट्य म्हणजे, वाढत्या वयासोबत, त्यांचे व्यक्तित्व अधिकाधिक प्रफुल्लित, प्रसन्न, प्रभावी होत गेले. पुरुष कसा असावा, पौरुष कसे असावे, याचे त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम उदाहरण होते. त्यांना उत्तम विनोदबुद्धी होती. ते सौम्य, शांत, निग्रही आणि कणखर होते. ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि|’ माणूस चांगला असला की सर्व कसे चांगलेच घडून येते, क्षेत्र कोणतेही असो! याचे त्यांचे जीवन एक उत्तम, उत्कृष्ट उदाहरण होते. २००२ साली, संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात अर्जनसिंगांना ‘मार्शल ऑफ द एअर फोर्स’ हे पद सन्मानाने प्रदान करण्यात आले. हे पद आजन्म असते. सेनेमध्ये असा सन्मान, फील्ड मार्शल माणेकशॉ व फील्ड मार्शल करिआप्पा यांना प्राप्त झाला आहे.पूर्व वायुसेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस म्हणतात, ‘‘मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जनसिंग, आम्हा सर्वांना पितृतुल्य होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य होते. ते भारतीय वायुसेनेचे भीष्म पितामह होते.’’ सौभाग्यवती तेजी अर्जनसिंग, अत्यंत देखण्या, गरिमामय व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. मूर्तिमंत मान-मर्यादा-ममता याचे उत्तम उदाहरण होत्या. अरविंद, आशा आणि अमृता ही त्यांची अपत्ये- आपल्या आई-वडिलांचा आब राखणारी पुढची पिढी.अर्जनसिंगांनी आपली शेतीवाडी विकून जे दोन कोटी रुपये आले, त्याचा एक ट्रस्ट निर्माण केला आहे. त्यातून सैनिक-नौसैनिक-वायुसैनिकांना आणि त्यांच्या पाल्यांना मदत मिळते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी लाल किल्ल्यावरून शंभर विमानांच्या उड्‌डाणाचे नेतृत्व केले होते. स्वित्झर्लंड, केनिया येथे ऍम्बेसेडर- हायकमिश्नोर म्हणून व दिल्लीचे उप राज्यपाल म्हणून त्यांनी सेवा दिली. अनेक खेळांचे ते उत्तम क्रीडापटू होते. अर्जनसिंग एक चतुरस्र, अष्टपैलू, उत्तम, उत्कृष्ट सैनिक-वैमानिक, व्यक्ती व व्यक्तिमत्त्व होते. शनिवार दिनांक १६ सप्टेंबरच्या संध्याकाळी त्यांनी शेवटची सर्वोच्च-उच्चतम गरुडभरारी घेतली आणि अनंतात विलीन झाले. कदाचित यातच आयुष्याची- जीवनाची सार्थकता असते. त्यांना सेना-नौसेना-वायुसेनाच नव्हे, तर अवघे राष्ट्र सलामी देत आहे. शुभास्ते पंथाना: संतु!… ‘‘सितारों से आगे, जहॉं और भी हैं चमन और भी, आशियॉं और भी हैं तू शाहीन हैं, परवाझ हैं काम तेरा तेरे सामने, आसमॉं और भी हैं…’’ (लेखक निवृत्त विंग कमांडर आहेत.)

No comments:

Post a Comment