Total Pageviews

Sunday 24 September 2017

बंगालच्या तथाकथित लोकप्रिय सेक्युलर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नेहमी कोर्टाकडून थप्पड खाण्याची आता सवय झालेली आहे. जणू कोर्टाने कान उपटले नाहीत, तर ममता दीदींना राज्याचा कारभार केल्यासारखे वाटत नसावे. अन्यथा त्यांनी तसे प्रसंग वारंवार कशाला निर्माण केले असते?


थप्पड खाण्याची हौस September 24, 2017 04:00:30 AM भाऊ तोरसेकर 0 Comment दुर्गाविसर्जन, ममता बॅनर्जी, मोहरम काही काळापूर्वी त्यांनी रा. स्व. संघाच्या एका जाहीर कार्यक्रमाला प्रतिबंध घालण्याचा आगावूपणा केलेला होता. संघाच्या कार्यक्रमाने धार्मिक बेबनाव निर्माण होईल असे कारण दाखवून स्वयंसेवकांच्या संचालनाला सरकारी परवानगी नाकारली होती. संघाच्या आयोजकांनी कोर्टात धाव घेतली आणि दाद मागितली. तेव्हा त्यांना तशी परवानगी देण्याचा आदेश कोर्टाने जारी केलेला होता. नामुष्की आल्याने ममतांना माघार घ्यावी लागली आणि तो कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडला. पण तेव्हाही ममतांचा मुखवटा कोर्टाने टरटरा फाडून टाकला होता. वास्तविक कुठलेही कोर्ट राजकीय पक्षांच्या वा त्यातल्या सत्ताधा-यांच्या राजकीय हेतूविषयी मौन पाळत असते. पण ममतांच्या बाबतीत तसे सहसा होत नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळाले, मग कोर्टाला दीदींवर ताशेरे झाडायची वेळ येत असते. तेव्हाही संघाला परवानगी देताना कोर्टाने ममतांवर मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचा अतिरेक होत असल्याचे ताशेरे झाडलेले होते. आता तर ममतांनी ताळतंत्र सोडले असून, आपल्याच बंगाली व प्रामुख्याने हिंदू मतदारालाच लाथाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अन्यथा त्यांनी दुर्गापूजा व त्यातल्या मूर्ती विसर्जनाचा विषय अंगावर ओढवून घेतला नसता. किंवा हायकोर्टाची टिप्पणी आमंत्रित केली नसती. असे आपलेच नाक कापून घेतले नसते. यावर्षी प्रथमच दुर्गाविसर्जन व मोहरम एकाच दिवशी आलेले आहेत. ३० तारखेला दुर्गा विसर्जनाचा मुहूर्त आहे आणि दुस-या दिवशी मोहरम आहे. दोन्ही सोहळ्यांच्या मिरवणूका निघत असतात. त्यात धार्मिक वितंडवाद होऊन दंगल होऊ शकते, असे एक गृहीत आहे. त्यामुळेच मग तशी शक्यता टाळण्याचा सरकारी खाक्या झालेला आहे. अशावेळी मग निर्बंध नेहमी हिंदू सणांवर लादले जात असतात. ते घालणारे पुरोगामी राज्यकर्ते हिंदूच असतात. यालाच कंटाळून हळूहळू हिंदुत्ववादी पक्षांकडे लोकांचा ओढा वळलेला आहे. पण त्यातून काही धडा शिकण्याची बुद्धी पुरोगामी पक्ष व नेत्यांना झालेली नाही. जिथे मग अशा पुरोगाम्यांच्या हाती सत्ता आहे, तिथे हिंदूंची कोंडी करण्याचा अतिरेक होत असतो. ममता हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. वास्तविक त्या पक्क्या बंगाली आहेत आणि म्हणूनच त्यांना बंगालची मानसिकता नेमकी ठाऊक असायला हवी. बंगालचा हिंदू कडवा धर्मनिष्ठ नाही. पण त्याच्या प्रादेशिक अस्मिता भक्कम आहेत, कडव्या आहेत. त्यात दुर्गापूजा हा भावनात्मक प्रश्न आहे. बंगाली लोक दिवाळीपेक्षाही दुर्गापूजेला प्राधान्य देत असतात. अगदी कम्युनिस्ट म्हणवणारे नेतेही अत्यंत मनोभावे सहभागी होतात आणि दुर्गापूजाही साजरी करतात. म्हणूनच असा भेदभाव यापूर्वी बंगालमध्ये कधी होऊ शकला नाही. परंतु ममतांनी त्याचेही ताळतंत्र सोडले आहे. त्यांना हिंदू जनता आणि हिंदुत्ववादी भाजप व संघ यातला फरकच कळेनासा झाला आहे. म्हणूनच की काय, आपले मुस्लिमप्रेम सिद्ध करण्यासाठी आता दीदी बंगाली भावनाही पायदळी तुडवायला निघाल्या आहेत. आधी त्यांनी सरसंघचालक व भाजप अध्यक्षांच्या कार्यक्रमांना जागा नाकारल्या होत्या. मुस्लिमांविषयी आस्था असणे वेगळे आणि ते दर्शवण्यासाठी हिंदूंचा द्वेष करणे वेगळे असते. ममतांनी मागल्या दोनतीन वर्षात मुस्लिमांच्या प्रेमाचे अतिरेकी प्रदर्शन करताना बंगाली हिंदूंना दुखावण्याचा जणू सपाटा लावला आहे. त्यांचा राग संघ-भाजपवर असणे समजू शकते. पण तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी हिंदू बहुसंख्य लोकांना दुखावणे, म्हणजे आपल्याच बंगाली जनतेला लाथाडणे आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार किती ठामपणे ममतांच्या पक्षाला मत देईल हे नक्की नाही. पण बंगाली हिंदू मात्र त्यांच्यापासून दुरावत चालला आहे. विविध लहानमोठय़ा निवडणूका व अन्य कार्यक्रमातून भाजपाला मिळणा-या प्रतिसादातून, त्याची प्रचिती येत असते. ममतांच्या असल्या थिल्लर पुरोगामीपणाने बंगालमध्ये भाजप व संघाला आपले बस्तान बसवणे खूप सोपे होऊन गेले आहे. हायकोर्टानेच त्यांचे कान उपटताना दोन धर्मियात तेढ लावून देऊ नका, असे खडेबोल ऐकवले आहेत. पण अशा रीतीने ममता जणू आपलाच मतदार हाकलून लावत आहेत, इतकाच याचा अर्थ होऊ शकतो. हे त्यांच्या लक्षात येत नसेल असे नाही. पण द्वेषाने माणसे प्रवृत्त झाली, मग त्यांना आत्मघात वा त्यातला मुर्खपणा लक्षात येत नसतो. ममतांसह अनेक मोदी विरोधकांची तीच दुर्दशा होऊन गेलेली आहे. एक गोष्ट सत्य आहे. सात वर्षापूर्वी ममतांनी बंगालची सत्ता मिळवली, तेव्हा त्यांना मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळालेली होती. याचा अर्थ स्वच्छ आहे. ममतांना त्याच मतांनी सत्तेपर्यंत पोहोचवलेले आहे. अलीकडल्या काळात डावी आघाडी व काँग्रेसची हिंदूमते भाजप बळकावत चालला आहे. लोकसभा मतदानानंतरच्या काळात भाजपची बंगलमधील मते सातत्याने वाढत आहेत आणि त्याच्या परिणामी डावे व काँग्रेस त्यांची मते मात्र गमावत चालले आहेत. अशा स्थितीत मुस्लिमांचे अति लांगूलचालन करताना ममतांनी हिंदू मतांचा आपल्याकडला हिस्सा गमावणारे राजकारण करणे, हा आत्महत्येचा प्रयास म्हणावा लागेल. ज्याप्रकारे ममता हे उद्योग करीत आहेत, त्यातून भाजपला विरोध करताना हिंदूमते त्यांच्यापासून दुरावत आहेत. तसेच होत राहिले तर मग नुसत्या मुस्लिम मतांवर ममतांना सत्ता मिळवणे शक्य नाहीच. पण असलेली सत्ताही टिकवणेही शक्य होणार नाही. ते समजण्यासाठी संघ व भाजप म्हणजे हिंदूमते नाहीत, हे ममतांनी लक्षात घेतले पाहिजे. उत्तरप्रदेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भाजप वगळता त्या मोठय़ा राज्यात अन्य कोणीही हिंदू मतांना किंमत देत नव्हता. सहाजिकच अशा समाज घटकात भाजप पुढे जात राहिला. परिणामी मुस्लिम मते भाजपला मिळत नसली, तरी तो पक्ष उत्तरप्रदेशात उर्वरित सर्व पक्षांना धूळ चारू शकला. बंगालमध्येही मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के इतकीच आहे. म्हणजेच तिथे ६०-६५ टक्के हिंदू मते आहेत. त्याचा जितका हिस्सा भाजपच्या वाटय़ाला येईल तितका तो पक्ष शिरजोर होत जाणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी केलेले संघटनात्मक प्रयास उपयुक्त ठरले असतील. ममता अतिरेकी मुस्लिम लांगूल चालन करताना हिंदूंना सातत्याने दुखावत चालल्या आहेत. आताही दुर्गापूजा विसर्जनावर गदा आणून त्यांनी तेच पाप केले होते. कोलकात्यामध्ये मोहरम करणा-या दोनच मिरवणूका निघणार असल्याची सरकारने कोर्टात माहिती दिली. इतक्या मोठय़ा महानगरात फक्त दोन मुस्लिम मिरवणुकांसाठी हिंदूंवर बंदी घालणे, हा निव्वळ अत्याचार झालेला आहे. किंबहूना तीच मिरवणुकांची संख्या सरकारला विचारूनच कोर्टाने ममता सरकारवर ताशेरे झाडले आहेत. पण त्यातून ममता कुठलाही धडा शिकण्याची शक्यता नाही. त्यामुळे बंगालला तृणमूलमुक्त करण्याची त्यांची कामगिरी पुढला काही काळ चालूच राहील. २०१९ साली त्याचे परिणाम लोकसभा मतदानावर होतील, तेव्हाच त्यांना जाग येईल. मात्र त्यानंतर राजकारण सावरून बंगालची आपली सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्यापाशी पुरेशी सवड उरलेली नसेल. कारण अवघ्या वर्षभरात त्यांना बंगालची विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment