Total Pageviews

Monday, 11 September 2017

दगड गेले, ग्रेनेड आले!----बबन वाळके

वेध अतिरेक्यांना आणि लष्करावर दगडफेक करणार्‍यांना, आर्थिक रसद पोचविणार्‍या देशद्रोह्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सध्या धडक मोहीम हाती घेतल्यामुळे, जम्मू-काश्मीरमधील विघटनवादी नेते चवताळले आहेत. आता त्यांनी नवाच मार्ग अवलंबला आहे. सय्यद अली शाह गिलानी, मिरवैझ उमर फारुख, मोहम्मद यासीन मलिक यांनी परवा श्रीनगरमध्ये पत्रपरिषद घेऊन, आता आम्ही ९ तारखेला दिल्लीला जाणार असून, एनआयएच्या मुख्यालयात जाऊन आम्हाला अटक करा, असे सांगणार आहोत, असे जाहीर केले. आम्ही विमानाची तिकिटेही काढली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. पण, या तिघांना दिल्लीला जाऊ द्यायचे की नाही, हे एनआयए ठरविणार आहे. हे जाहीर करण्याच्या अवघ्या काही तासातच श्रीनगरच्या जहांगीर चौकात दगडफेक करणार्‍यांनी लष्कर व पोलिसांवर ग्रेनेड फेकले. त्यात एक दुकानदार ठार झाला व १५ लोक जखमी झाले. ग्रेनेड फेकणाराही जखमी झाल्याचे पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे. याचा अर्थ, आता दगड जाऊन ग्रेनेड आले आहेत! बुधवारी शोपियां पोलिस ठाण्यावरही ग्रेनेड फेकण्यात आला होता. पण, त्याचा स्फोट झाला नाही. काही दिवसांपूर्वी आमच्या लष्करप्रमुखांनी म्हटले होते की, तुम्ही दगड फेकण्याऐवजी गोळ्या चालवाव्या. मग आम्हालाही योग्य उपाय योजता येतील. सध्या ज्या ग्रेनेड फेकण्याच्या घटना दिसत आहेत, ते पाहता वार्‍याची दिशा लक्षात येते. त्यामुळे आता लष्कर आणि पोलिसांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आम्ही दिल्लीला जातो, असे फुटीरवाद्यांनी म्हणणे आणि लगेच ही ग्रेनेडफेक होणे याचा संबंध आहे. एनआयएला रोखण्यासाठी युवकांच्या हातात आता दगडांऐवजी ग्रेनेड देण्याचा नवा उपाय फुटीरवाद्यांनी अवलंबलेला आहे. पण, एनआयए सतर्क आहे. नुकत्याच दिल्ली व श्रीनगरमध्ये ११ ठिकाणी धाडी घातल्या गेल्या आणि नऊ आरोपींना अटकही करण्यात आली. हे धाडसत्र सध्या सुरूच आहे. एनआयएच्या सुरक्षेसाठी प्रामुख्याने श्रीनगरमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोपींपैकी काही जण पाकिस्तानातून भारतात मालाची ने-आण करणारे वाहतूकदार आहेत. यापैकी एक रझ्झाक चौधरी याच्या घरी धाड घातली असता, तीन बंदुका सापडल्या. या सर्वांचे परवाने चौधरी यांनी दाखविल्यावर त्या जप्त करण्यात आल्या नाहीत. हा चौधरी फुटीरवादी नेता शब्बीर शाह याचा जिगरी दोस्त आहे. या धाडीत एक कोटीपेक्षा अधिक नोटा, काही हार्डडिस्क, संपत्ती खरेदी आणि आर्थिक व्यवहाराच्या नोंदी जप्त करण्यात आल्या. आतापर्यंत अतिरेक्यांना पैसे पुरविणार्‍या शब्बीर शाहसह नऊ लोकांना अटक झाली आहे. हे सर्व जण सध्या तुरुंगात आहेत. गृहमंत्रालयाने एनआयएला कारवाई करण्याची पूर्णपणे मोकळीक दिली आहे. त्यामुळेच एनआयएने ही धडक कारवाई हाती घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दगडफेक प्रकरणांमुळे लष्कर आणि पोलिसांची मोठी संख्या यात गुंतवावी लागली आहे. त्यामुळे आर्थिक रसद पोचविणार्‍यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच या लोकांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे. अतिरेक्यांना पैसा पुरविणार्‍या लोकांचा आधी शोध घेण्यात आला आणि नंतर कारवाई सुरू करण्यात आली. यात दिल्लीतीलही काही लोक सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आता येत्या ९ तारखेला अन्य तीन फुटीरवादी नेते दिल्लीत जातात की, त्यांना श्रीनगरमध्येच अटक केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment