06-Sep-2017
सार्याा जगाला ज्याची नितांत गरज वाटत होती, तो मुद्दा परवा चीनच्या ‘ब्रिक्स’ परिषदेत प्रकर्षाने चर्चेला आला. केवळ चर्चेलाच आला नाही, तर त्या विरोधात उभे ठाकण्यास अर्धे जग सरसावले असल्याचे जे चित्र त्यातून निर्माण झाले, ते त्याहून महत्त्वाचे आहे. तालिबान काय नि अल् कायदा कायदा, जैश-ए-मोहब्बत काय आणि तेहरिक-ए-तालिबान काय, संपूर्ण विश्वा आज ज्या समस्येने ग्रासले आहे, विकासाच्या वाटा ज्यामुळे खुंटल्या आहेत, शांततेत जगू इच्छिणार्यां च्या मार्गात ज्याचा मोठा अडथळा होतोय्, तो दहशतवाद निखंदून काढण्याचा वज्रनिर्धार भारतासह चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आदी देश करतात, अगदी एकत्रितपणे करतात, विशेषत: ‘ब्रिक्स’ परिषदेत उपस्थित झाल्यानंतर त्या त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या सखोल चिंतनाअंती या संदर्भातला निर्णय होतो, ही बाब लाखमोलाची आहे. कालपर्यंत पृथ्वीतलावरील भारतासारख्या ज्या देशांना कायम दहशतवादाचा सामना करावा लागला, कधी बॉम्बस्फोट तर कधी सुरुंगांची पेरणी करत त्यांनी घडवलेल्या रक्तपातात ज्यांना आपली शेकडो मौल्यवान माणसं गमावावी लागली, दहशतवादाविरुद्धचा तो संघर्ष उर्वरित जगातले लोक दुरून केवळ बघत राहिले होते. आपल्याला स्पर्धेतही ज्याचे अस्तित्व नकोय् अशा एका देशाचा दहशतवादाच्या मार्गाने परस्परच काटा निघतोय् म्हटल्यावर आनंदाच्या उकळ्या फुटल्या, मनातल्या मनात गुदगुल्या होत राहिल्या काहींना. पण, धर्माच्या नावावर हिरवा रंग लेऊन आलेल्या दहशतवादाची झळ जसजशी सर्वांनाच बसू लागली, सारेच जसजसे त्यामुळे पोखरले जाऊ लागले, तसतशी त्याविरुद्ध लढण्याची गरज प्रतिपादित होऊ लागली. कालपर्यंत भारतासारखे काही बोटावर मोजण्याइतके देश एकट्यानेच आतंकवाद्यांविरुद्धची लढाई लढत होते. आम्ही तर काय, काश्मिरात फोफावलेल्या दहशतवादाशी लढलो, पंजाबातील त्यांच्या विरोधातील लढाईत आम्ही कित्येक लढवय्ये तरुण गमावले, कधी पूर्वांचलात आमचेच लोक आमच्याच विरोधात उभे केले गेले, तर कधी नक्षलवाद्यांच्या माध्यमातून भारतात रक्ताचे पाट वाहविण्याचे प्रयत्न झाले. दिल्ली, मुंबई, हैदराबादेतले बॉम्बस्फोट तर एव्हाना आमच्या सवयीचे झाले होते. इतका तो दहशतवाद या देशाने कणखरपणे सहन केला. कधी यशस्वीपणे टोलावून लावला, तर कधी त्याचे परिणाम भोगले. इतकेच कशाला, अगदी पाकिस्तानने २६/११ ला केलेला थेट हल्लादेखील अनुभवला या देशाने अन् तो परतावूनही लावला तेवढ्याच शिताफीने.
दहशतवादाविरुद्धचा त्याचा लढा अद्याप थांबला नाही. ना जंगलातल्या नक्षल्यांविरुद्धचा, ना काश्मिरातल्या फुटीरवाद्यांविरुद्धचा. इतर देशांचे तसे नाही. अगदी कालपर्यंत ते या लढाईपासून स्वत:ला दूर ठेवत आले होते- जाणीवपूर्वक. जणू काय, दहशतवाद्यांच्या रडारवर आपण कधी येणारच नसल्याच्या गुर्मीतले वागणे चालले होते त्यांचे. पण, लादेनच्या रूपातला दहशतवाद जेव्हा न्यूयॉर्कमधील ट्वीन टॉवर्स बघता बघता धराशायी करून गेला तेव्हा अमेरिकेला, सीरियामधले दहशतवादी जेव्हा दाराशी येऊन झाडाझडती घेऊ लागले, यांची हवेतली विमानं मारा करून जमिनीवर पाडू लागले, तेव्हा रशियाला, अगदी परवा परवाच्या रक्तपाताने तर फ्रान्स, इंग्लंडसारख्या देशांनाही आता, दहशतवाद ही केवळ एखाद्दुसर्याह देशाची ‘त्यांच्यापुरती’ समस्या नसल्याचे आणि त्याविरुद्ध लढणे ही काही कुणाची एकट्याची जबाबदारी नसल्याचे धगधगते वास्तव ध्यानात आले आहे. नव्हे, त्या वास्तवाची पुरेपूर कल्पना आल्यामुळेच आता त्याचा निकराने सामना करण्याची भाषा बोलली जाऊ लागली आहे. दुसर्यान महायुद्धानंतरच्या काळात युरोपियन सत्ताधीशांच्या काळात ‘ऍण्टी कोलोनियल मुव्हमेंटच्या’च्या माध्यमातून प्रसिद्धी आणि प्रभावाचे तंत्र विकसित करण्याच्या नादात जो थारा दहशतवादाला मिळाला, त्याची कडू फळे चाखण्याची वेळ आज सर्वांवर आली आहे. नंतरच्या काळात दहशतवादाचे स्वरूपही बदलत गेले. हातातली शस्त्रे बदलली. संगणकाचा वापर होऊ लागला. इंटरनेट दिमतीला उभे राहिले. परिणामी दहशतवाद्यांच्या कामाची, हल्ल्यांची, लढण्याची, दडी मारून बसण्याची… सारीच तर्हाा बदलली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. संघटनांची संख्या वाढली. भौगोलिकदृष्ट्या कामाची व्याप्ती वाढली. ‘टारगेट्स’ निवडण्याची पद्धत बदलली. जगाच्या पाठीवरचा कुठलाच देश, विशेषत: गैर इस्लामिक देश त्यांच्या दहशतीपासून मुक्त राहणार नाही, याची काळजी विशेषत्वाने घेतली जात असल्याचे चित्र प्रकर्षाने निर्माण झाले. त्यातून दहशतीमागचे हेतू स्पष्ट होऊ लागले आणि दहशतवाद आता ‘जागतिक’ होऊ लागला असल्याच्या वस्तुस्थितीचे आकलनही शक्य झाले. त्यामुळे त्या मोहिमेत शिरकाव केलेल्या माणसांसोबतच त्यामागे दडलेल्या विचारांशी लढण्याची गरजही आपसूकच प्रतिपादित होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांत वैश्वितक स्तरावर दहशतवादाचा वेगळ्या अंगाने, गांभीर्याने होऊ लागलेला विचार आणि त्याविरुद्धचा लढा उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची व्यक्त होऊ लागलेली गरज, हा त्याचाच परिपाक आहे. ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या पाच देशांच्या प्रमुखांनी त्यावर केलेले शिक्कामोर्तब म्हणूनच महत्त्वाचे आहे. दहशतवाद्यांची सरळ सरळ नावं घेऊन, त्यांना आसरा देणार्याे देशांचा थेट उल्लेख करत, त्याविरुद्ध उभे ठाकण्याची गरज आणि निर्धार जेव्हा ‘ब्रिक्स’ परिषदेच्या मंचावरून चीन, फ्रान्स, ब्राझील, आफ्रिकेसारखे देश व्यक्त करतात, तेव्हा गेली काही दशकं दहशतवादाविरुद्ध एकाकी, पण ठामपणे लढत राहिलेल्या भारतासारख्या देशांनी रचलेला पाया भविष्यात अधिक मजबूत होण्याचे ते संकेत आहेत. दहशतवाद खरोखरीच आता वैश्विरक स्तरावर पोहोचला आहे. दुर्दैवाने धर्माच्या आडून कित्येक देशांचे छुपे समर्थन त्याला प्राप्त आहे. अशा परिस्थितीत त्याचा सामना करणे वाटते तितके सोपेही नाही. तो मुळासकट उखडून फेकण्याची भाषा बोलणारे पाकिस्तानसारखे कित्येक देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहेत. भारतासारख्या देशातही घरातले भेदीच त्यांच्या साथीला उभे राहिले असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. अशा परिस्थितीत आतंकवाद्यांविरुद्ध लढाई उभारायची म्हणजे जिकिरीचेच काम! ज्यांना त्याची झळ पोहोचली त्यांनी लढणे वेगळे आणि संपूर्ण जगातून नायनाट करण्याच्या इराद्याने सर्वांनी पेटून उठणे वेगळे. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पॅण्टागॉनवर हल्ला झाला म्हणून अमेरिकेचे लादेनविरुद्ध चवताळून उठणे म्हणजे दहशतवादाला विरोध नव्हे! अजून त्याची आचही पोहोचली नाही अशा देशाने ठामपणे त्याविरोधात उभे म्हणजे दहशतवादाविरुद्धचा लढा ठरेल! आतंकवाद चिरडून टाकण्यासाठी लढावयाच्या अशा लढ्यासाठीच संपूर्ण जगाने एकत्र येण्याचा निर्धार करण्याची गरज आहे. चीनमधील ‘ब्रिक्स’ परिषदेतून परवा नेमका तोच बाणा, नेमकी तीच भूमिका व्यक्त झाली आहे…
No comments:
Post a Comment