बस्तरमधील अबुझमाडचं जंगल नक्षलींची राजधानी म्हणून ओळखलं जातं. घनदाट जंगलामुळे अबुझमाडचं रहस्य भेदणं अजूनही सुरक्षा दलांना शक्य झालेलं नाही. मात्र गडचिरोली पोलिसांनी नुकताच हे जंगल भेदण्याचा यशस्वी प्रयत्न केला, त्याचा मागोवा…
गडचिरोली पोलिसांनी अबुझमाड भेदल्याची बातमी अलीकडेच आली. या दाट अरण्यप्रदेशात चालणाऱ्या नक्षलवादी-माओवादी दहशतीची कल्पना असलेल्या अनेकांसाठी हा सुखद धक्का होता. गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरीपासून २० किमी अंतरावरील छत्तीसगडच्या हद्दीत माओवाद्यांच्या हालचालीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सी-६० कमांडोचे पथक थेट सीमा पार करून अबुझमाडमध्ये शिरले. माओवाद्यांशी चकमक उडाली. घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता चार माओवादी जखमी झाल्याचाही अंदाज आहे. घटनास्थळी पोलिसांना सहा घोडे तसेच तीन बंदुकांसह इतर साहित्य आढळले. माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात शिरून घातलेला हा पहिला घाव माओवाद्यांना धक्का देणारा ठरला. अबुझमाड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले ते त्यामुळेच. काय आहे नक्की अबुझमाडमध्ये? ही विचारणा त्यानंतर सुरू झाली आहे.
१९६७मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातून चारू मुजूमदार यांनी भूमिहिन शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आंदोलन उभारले. बंदुकीच्या नळीतून क्रांती घडविण्यासाठी सुरू झालेले हे आंदोलन आंध्र प्रदेशातील कोंडापल्ली सितारामय्या यांनी मजबूत केले. ‘पीपल्स वॉर ग्रुप’ या संघटनेची स्थापना केल्यानंतर नक्षलवादी चळवळ तेलंगणमध्ये वाढली. तिथून चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या अदिलाबाद जिल्ह्यातून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. तिथून प्राणहिता, इंद्रावती या दोन नद्या पार करून ‘पीपल्स वॉर ग्रुप’चे नक्षलवादी बस्तरमध्ये पोचले. खनिज उत्पादनाच्या लालसेतून १९८० ते १९८७पर्यंत अबुझमाडच्या जंगलातील जमीन लीजवर घेऊन आर्थिक शोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात नक्षलवादी आदिवासींच्या मदतीला धावले. नंतर त्यांनी आपले स्थान इथेच मजबूत करून घेतले. १९८०नंतर महाराष्ट्रातील सिरोंचा आणि तेलंगणच्या खम्मम परिसरातून बस्तरमध्ये गेलेल्या माओवाद्यांना अबुझमाड आपला बालेकिल्ला बनविण्यात यश मिळविले. दिवसा सूर्याची किरणेही पोहचत नसलेल्या अबुझमाडच्या जंगलात माओवाद्यांचे ‘जनताना सरकार’ म्हणजेच स्वत:चे सरकार आहे.
बस्तरचा भाग घनदाट जंगलाने वेढला आहे. हजारो कोटींची वनसंपदा आहे. या भागातील जंगलात ७६ प्रकारचे वनउपज आढळतात. १९७०-८५ या काळात तत्कालीन मध्य प्रदेश सरकारला दरवर्षी २५० कोटी रुपये जंगलातील बांबू आणि तेंदूपत्त्यापासून मिळत होते. तिथे लोहखनीज आणि हिऱ्याच्या खाणी आहेत. त्यामुळेच माओवादी कारवायांचा गड असतानाही देशातील बड्या उद्योगसमूहांनी या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. घनदाट जंगल, उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या या जंगलाची तुलना आफ्रिकेच्या जंगलांशी केली जाते. १० ते १५ हजार वर्गकिलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या अबुझमाडमध्ये घनगर्द वृक्षांच्या आणि उंच पर्वतांच्या रांगाच रांगा दिसतील. छत्तीसगड आणि महाराष्ट्राची सीमारेषा विभागणाऱ्या इंद्रावती, पर्लकोटा तर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशला विभागणाऱ्या गोदावरी या मोठ्या नद्या या भागातून वाहतात. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील बिनागुडापासून छत्तीसगडच्या नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर; तेलंगणच्या खम्मम, वारंगल; ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत अबुझमाडचे जंगल परसले आहे. ‘अबुझ’ म्हणजे माहिती नसलेले तर ‘माड’ म्हणजे उंच रहस्यमय प्रदेश असलेला भाग. या दोन्हीचे मिश्रण असलेला हा भाग असल्याने अबुझमाड म्हणून ओळखला जातो. अजूनही येथील आदिवासी अर्धनग्न अवस्थेत जीवन जगतो. माडमध्ये २४० गावे आहेत. भारतातील पहिले महासर्वेक्षक अॅडवर्ड एव्हरेस्ट यांनी १८७२ ते १८८० या काळात अबुझमाडच्या सर्वेक्षणाचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांना अपयश आले. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही कुठल्याही सरकारला ‘माड’ची नेमकी भौगोलिक परिस्थिती अजूनही माहिती नाही. अमुक हे असेच हा भल्याभल्यांचा दावा अबुझमाडमध्ये फसतो ते त्यामुळेच.
माओवाद्यांनी या जंगलात स्वतःची समांतर व्यवस्था तयार केली आहे. शाळेतील शिक्षक असो की जंगल संरक्षणासाठी काम करणारे वन कार्यकर्ते, सर्वत्र माओवाद्यांचा वरचष्मा आहे. रुग्णालयातील कर्मचारी तसेच आदिवासींच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या विविध वन समित्या इथे कार्यरत आहेत. अंमल मात्र माओवाद्यांचाच चालतो. माओवाद्यांनी स्वतःची संचारप्रणाली तयार केली असून तेवढ्या हद्दीची त्यांची रेडिओ प्रसारण सेवाही आहे. अबुझमाडमध्ये माओवाद्यांचा सर्वोच्च नेता मुप्पाला लक्ष्मणराव ऊर्फ गणपती, मिलिटरी कमांडचा प्रमुख नंबाला केशव उर्फ गंगन्ना, भूपती यांच्यासह केंद्रीय समितीचे बडे नेते वास्तव्याला आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी माओवाद्यांनी बंकरही तयार करून ठेवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, माओवाद्यांची सैनिकी शाळाही अबुझमाडमध्ये आहे. गुरिल्ला पद्धतीने सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचे प्रशिक्षण देणारे कॅम्प माओवाद्यांनी या जंगलात तयार केले आहेत. १९९०च्या दशकात माओवाद्यांनी देशातील नक्षलप्रभावित भागात गुरिल्ला पद्धतीने सुरक्षा दलांवर हल्ले सुरू केले. गुरिल्ला युद्ध पद्धतीचे प्रशिक्षण श्रीलंकेतील एलटीटीई या तामिळ अतिरेकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माडमध्ये येऊन माओवाद्यांना दिले होते. माओवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या मैदानांचे हवाई चित्र काही वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी हेलिकॉप्टरमधून घेतले होते.
घनदाट जंगल, उंच पर्वतरांगा, चारही बाजूने नद्या, वन्यप्राणी असलेल्या अबुझमाडमध्ये कुठल्याही सुरक्षा यंत्रणेला काउंटर करण्यासाठी माओवाद्यांनी मजबूत उपाय केले आहेत. माडमध्ये त्यांनी अनेक किलोमीटरपर्यंत भूसुरुंगस्फोटके पेरून ठेवली आहेत. माओवाद्यांच्या या राजधानीची सुरक्षा व्यवस्था समजावून घेण्याचा प्रयत्न गडचिरोलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक शिरीष जैन यांनी केला होता. अबुझमाडचे प्रवेशद्वार असलेल्या गडचिरोलीतील बिनागुंडामध्ये राजवर्धन आणि शिरीष जैन यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले. त्यावेळी तब्बल दोन दिवस गोळीबार करून माओवाद्यांनी दहशत पसरविली होती. त्यावेळी शिरीष जैन यांच्या हेलिकॉप्टरवरही गोळीबार झाला होता. गोळीबार सुरू असताना जैन यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. मतदान पथकाला त्यांनी सुरक्षितपणे हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोलीला परत नेले होते. चंदनतस्कर वीरपन्नचे साम्राज्य उद्ध्वदस्त करणारे के. विजयकुमार त्यानंतर सीआरपीएफचे महासंचालक झाले. त्यावेळी माडमध्ये शिरण्याचा प्रयत्न सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तपणे केला. काही किलोमीटर आत गेल्यानंतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलांवर हल्ले झाले. माडची कठीण भौगोलिक परिस्थिती पाहून सुरक्षा दल माघारी परतले होते. अलीकडेच गडचिरोली पोलिसांनी अबुझमाडमध्ये शिरून माओवाद्यांचे शिबिर उद्ध्व्स्त केले. तिथे सहा घोडे मिळाल्याने माओवाद्यांकडून घोड्यांचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईनंतर जवानांचे मनोधैर्य वाढले आहे. मुळात अबुझमाडवर थेट कारवाईचा विषय अनेकदा सुरक्षा दलांसमोर आला असला तरी थेट कारवाई करणे सुरक्षा दलांनी टाळले आहे. अबुझमाडचा सर्वाधिक भाग नारायणपूर जिल्ह्यात येतो. नारायणपूर पोलिसांना अनेकदा प्रयत्न करूनही अबुझमाडमध्ये शिरणे शक्य झाले नाही. मात्र एकदा ‘माड’मध्ये शिरल्यानंतर बाहेर पडण्याविषयी आत्मविश्वास नसल्याने अबुझमाड माओवाद्यांसाठी नंदनवन, तर सुरक्षा दलांसाठी आव्हान देणारे अरण्य ठरले आहे.
घोड्यांचा वापर
गडचिरोली पोलिसांनी अबुझमाड शिरून केलेल्या कारवाईत माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसाठी जंगलात घोड्यांचा वापर होत असल्याची बाब पहिल्यांदाच अधोरेखित झाली. मुळात माओवाद्यांचे मोठे नेते गणपती रामक्रिष्णासह भूपती, नंबाला, केशव, नर्मदक्का या साऱ्यांचे वास्तव्य अबुझमाडमध्ये आहे. वयाच्या साठाव्या वर्षात पदार्पण केलेल्या या नेत्यांना प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे फिरणे शक्य होत नाही. अशा नेत्यांच्या फिरस्तीसाठी घोड्यांचा उपयोग केला जातो. सोबतच कम्प्युटर आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठीही माओवाद्यांनी घोड्याचा वापर सुरू केला आहे. सर्व नक्षल कार्यकर्ते या भागात स्वतः शेती करतात. माओवाद्यांच्या संघटनेसाठी लागणाऱ्या धान्याची त्या ठिकाणी साठवणूक केली जाते. हे धान्य दलम सदस्यांपर्यंत पोहचविण्यासाठी देखील घोड्यांचा वापर होतो. माओवाद्यांचे घोडदळ हे आतापर्यंत सर्वांसाठीच उत्सुकतेचा आणि विलक्षण चर्चेचा विषय ठरले होते. ऐकिव माहितीमुळे उत्कंठा ताणली गेली होती. गडचिरोली पोलिसांनी चक्क बालेकिल्ल्यात शिरून घोडे जप्त केल्याने माओवाद्यांना चांगलाच हादरा बसला असेल.
सेंट्रल मिलिटरी कमांड
माओवाद्यांकडून सुरक्षा दलांवर आजपर्यंत अनेक मोठे हल्ले झाले. या हल्ल्यांचे स्वरुप गुरिल्ला युद्ध पद्धतीचे असते. त्याची सर्व सूत्रे अबुझमाडमधूनच हलविली जातात. सूत्रधाराची भूमिका सेंट्रल मिलिटरी कमांडची असते. याचा मुख्य असलेल्या गंगन्नाचे वास्तव्य अबुझमाडमध्ये आहे. नक्षल चळवळीचे धागेदोरे किती विस्तारले आहेत याची कल्पना यावरून येते.
माओवाद्यांच्या केंद्रीय समितीत गंगन्ना ऊर्फ नंबाला केशव हा तिसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. गंगन्नासह सेंट्रल मिलिटरी कमांडमध्ये सहा सदस्य आहेत. त्यात देवजी ऊर्फ संजीव, आनंद ऊर्फ कटकम सुधाकर व इतर तिघांचा समावेश आहे. मात्र माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवाया असलेल्या दंडकारण्याची जबाबदारी देवजीकडे आहे. या दंडकारण्यात बस्तर, ओडिशा, गडचिरोली (महाराष्ट्र) आणि तेलंगणचा समावेश आहे. माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमांडमध्ये देवजीच्या नियंत्रणाखाली असलेल्या कमांडमध्ये उत्तर, दक्षिण, पश्चिम, असे तीन कमांड आहेत. त्यात बटालियन आणि कंपनी दलम अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असते. त्यांच्याकडे भूसुरूंगस्फोट घडविण्यासाठी स्फोटके तसेच तांत्रिक माहिती असलेले तज्ज्ञ असतात. यात मोठा हल्ला घडवायचा असल्यास दंडकारण्य मिलिटरी कमांडला देवजीच्या मध्यस्थीने माओवाद्यांचा सर्वोच्च नेता गणपती ऊर्फ मुप्पाला लक्ष्मणराव याची परवानगी घेऊनच गंगन्नाच्या मार्गदर्शनात घटनेची तयारी करावी लागते. एखादे घटनास्थळ निश्चित झाल्यास त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, सुरक्षा दलांची संख्या, स्थानिकांची मदत या गोष्टींवर चर्चा होते. घटना घडण्याच्या साधारणतः महिनाभरापूर्वी जबाबदारी निश्चित केली जाते. जिरम घाटीत काँग्रेस नेत्याच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्यात याची प्रचीती आली होती.
राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याचे आवाहन अनेकदा केल्यानंतरही नक्षल चळवळीतील सहकारी मागे फिरायला तयार नसतात. पोलिसांना निर्देश नसल्याने बरेचदा त्यांच्या विरोधात कारवाई करता येत नाही. पाकिस्तानपासून अन्य देशांनी या गॅपचा फायदा उचलण्याचे प्रयत्न केले. देशाविरोधात लढणाऱ्या माओवाद्यांच्या फौजेला अबुझमाडसारख्या प्रदेशात आश्रय दिला जात असल्याने सुरक्षा दलांच्या जबाबदारीत फार वाढ झाली आहे. शत्रू ठाऊक असतानाही अनेकदा सुरक्षा दलांना चूप बसावे लागते. मात्र निबीड अरण्यात चालणाऱ्या घातकी कारवायांना तोंड देण्यासाठी आता अबुझमाडवर निर्णायक आक्रमणाची गरज आहे. अबुझमाडवर अंमल कुणाचा, या प्रश्नाचे उत्तर माओवाद्यांच्या बाजूने द्यायचे नसेल तर, कणखर कारवाईला पर्याय नाही!
No comments:
Post a Comment