नोंद इस्रायलच्या वेगळेपणाची…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परवाच्या इस्रायलवारीने जागतिक पातळीवरच्या राजकारणाचे फलित काय नि किती साधले गेले, याचा प्रत्यय येईलच येत्या काही दिवसांत. पण एक मात्र खरं की, या दौर्यानंतर हा देश, त्या देशाबाबत जराशा निराळ्या पद्धतीनं विचार करू लागला आहे. त्याच्याशी वागण्याच्या कालपर्यंतच्या प्रचलित पद्धतीत आमूलाग्र बदल होतो आहे. एक मित्रराष्ट्र म्हणून इस्रायलकडे बघण्याची तर्हाही एव्हाना वेगाने बदलते आहे. एरवी पंतप्रधानांच्या दौर्याची चर्चा फारतर एका विशिष्ट उंचीवरील लोकांमध्येच होते. पण, यावेळचे आगळे वैशिष्ट्य असे की, यंदा या देशातला सर्वसामान्य माणूसही त्याबाबत बोलताना दिसतोय्. ही किमया, इस्रायल नावाच्या इवल्याशा देशाची आहे. बहुधा म्हणूनच, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्या देशाने घेतलेल्या भरारीपासून, तर कृषी क्षेत्रातल्या आपल्याला लाजविणार्या प्रगतीपर्यंत… सर्वच मुद्यांवर सामान्य भारतीय माणूस बोलू लागलाय्. तीव्रतेनं प्रतिक्रिया व्यक्त करू लागला आहे. विशेषत: कृषिक्षेत्रात त्या देशाने साधलेली किमया तर सार्या जगाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. अशा एका गुणवान देशात सात दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांची भेट घडते आणि सुरुवात होते, ती एका नव्या पर्वाची…
आपल्या तुलनेत जमिनीचा एक छोटासा तुकडा असलेल्या आणि केवळ दहा टक्के पाऊस पडणार्या इस्रायलमधील कृषिउत्पन्न आपल्यापेक्षा दहा पटीने जास्त आहे. दुधासारख्या शेतीपूरक व्यवसायातही तिथल्या शेतकर्यांनी नेत्रदीपक प्रगती साधली आहे. हा परिणाम, हे यश, शेतकर्यांच्या कर्तबगारीचे आहे अन् सरकारच्या नियोजनाचेही. पाऊस कमी पडला म्हणून तिकडे कुणी रडत बसत नाही, की कर्जमाफीची मागणी करायला लागलीच सरकारदरबारी हजरही होत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन नाही आणि तोडफोड, जाळपोळ, लाठीमार, भाज्या उघड्यावर फेकून फोटो काढण्याचा प्रकारही नाही. शेती फुलवण्याचे त्यांचे प्रयोग जागतिक पातळीवर सर्वदूर अभ्यासले अन् स्वीकारले जाताहेत. आमच्या देशात मात्र, आमचा शेतकरी दिवसागणिक पराधीन कसा होईल, तुटपुंज्या मदतीचा तुकडा समोर फेकून मिंधा करत त्याला उपकाराच्या ओझ्याखाली कायम दाबून कसा ठेवता येईल, त्याच्या मताचा राजकारणासाठी वापर कसा करून घेता येईल, एवढाच विचार होतो शेतकर्याच्या बाबतीत. तंत्रज्ञानाच्या मदतीने साधावयाच्या आर्थिक प्रगतीशी जणू त्यांचे काही एक घेणेदेणे नसल्यागत सारा प्रवास सुरू आहे. कायम शेतीच्या, शेतकरीहिताच्या बाता हाणणारा ‘जाणता राजा’ही राजकारणच करीत राहिला या मुद्यावर. इस्रायलचा आदर्श समोर ठेवून आपल्या बळीराजाला आधुनिक शेतीचा मंत्र शिकविण्याची गरज वाटली नाही त्यालाही कधी. प्रत्येकाने केवळ मतांच्या राजकारणाच्या भोवतीच शेतकर्यांचे प्रश्न फिरवत ठेवले. प्रश्न सुटण्यापेक्षा ते कायम राहण्यातच आपला राजकीय लाभ असल्याचे भान जपतच जणू कारभार सुरू राहिला आजवर. त्यामुळे शेतकरी कायम आपल्या पायाशी लोटांगण घालत राहिला पाहिजे, याची तजवीज करण्यातच सर्वांची हयात गेली. अजूनही चालली आहे. आज शेतकर्यांच्या कर्जमाफीची मागणी करणार्या तमाम जनांनी कालपर्यंत सत्तेत असताना किती शेतजमीन उद्योजकांच्या घशात घातली विचारा त्यांना!
खरंच! वाळवंटात शेती फुलवणार्या इस्रायलचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. पाऊस कमी पडतो ना, मग त्यांनी त्यावरचे उपाय शोधले. कमी पाण्यात शेती पिकविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. शेतीपूरक व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले. जगाच्या नकाशावरच्या एका टीचभर देशाला जे जमले, ते १३० कोटी लोकसंख्येच्या, जगातील बलाढ्य लोकशाही व्यवस्थेला जमत नाही, ही बाब लाजिरवाणी असल्याची खंत व्यक्त झाली कधीतरी? उलट, आम्ही तर इतरांना खूश करण्याच्या नादात इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याचे धाडसदेखील दाखवू शकलो नाही कित्येक वर्षं! आता कुठे, विद्यमान पंतप्रधानांच्या दौर्यानंतर इस्रायलची महती पहिल्यांदाच कळल्याच्या थाटात त्याचे गुणगान सुरू झाले आहे. त्या देशाच्या चौफेर प्रगतीची दखल घ्यायलादेखील सत्तर वर्षे लागलीत बघा आम्हाला! अनुकूल स्थिती असतानाही, या कालावधीत आमच्याकडे शेतीचे जे हाल झाले अन् विपरीत परिस्थिती असतानाही त्यांनी जो चमत्कार घडवला, तो बघितल्यानंतर भारतातील शेतकर्यांच्या, स्वार्थी राजकारणातून झालेल्या शोषणाचे पितळ आपसूकच चव्हाट्यावर आले आहे. शेतकर्यांच्या समस्या सोडवायच्या म्हटल्या की, मोर्चे काढण्यापलीकडले उपाय ज्यांना कधी सुचले नाहीत ते शेतकरीनेते, बळीराजा कायम कर्जबाजारी राहील अशी योजना आखूनच काम करणारे सरकार, धरण बांधायला घेतलं तरी आधी स्वत:चे खिसे भरण्याचा विचार करणारी भ्रष्ट सरकारी यंत्रणा, चार्यापासून तर शेणापर्यंत… भ्रष्टाचाराची एकही संधी न सोडणारे लालूप्रसादांसारखे राजकीय नेते… या पार्श्वभूमीवर इस्रायल नावाच्या एका छोट्याशा देशाच्या तुलनेत आपण माघारलो असल्याची लाज वाटण्याशिवाय पर्यायतरी कोणता उरतो आपल्यापुढे?
ना जमीन सुयोग्य, ना वातावरण. ना, हवा तेवढा पाऊस. अशात, ज्या परिसरात झाड उगवण्याची कदाचित कल्पनाही आम्हाला करवणार नाही, त्या वाळवंटात त्यांनी शेती फुलवली. केवळ फुलवलीच नाही, तर कृषिमालाच्या निर्यातीत जगात अव्वल स्थान प्राप्त करण्यापर्यंतची मजल त्यांनी मारली. आज, शेती हा या देशातला एक प्रमुख ‘उद्योग’ ठरला आहे. याच्या नेमकी उलट परिस्थिती आमच्या देशात आहे आणि तरीही आपला देश कृषिप्रधान असल्याच्या दाव्यावर आम्ही ठाम आहोत…! त्यांनी समुद्राच्या खार्या पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यास योग्य पाणी तयार करण्याचे तंत्र शोधून काढले आहे. आणि आपल्या देशात अजूनही खेड्यात घडाभर पाण्यासाठी पाच-पाच कि. मी. पायपीट करावी लागते. कुठे आहोत आपण?
बरं, एकट्या सरकारलाच कशाला गुन्हेगार ठरवायचं यासाठी? शेतकरीही नाही का तेवढाच दोषी? कायम कुणाच्यातरी दावणीला बांधलं जाण्याचं प्राक्तन त्यांनीतरी कुठे झिडकारलं कधी? हा आला त्यानं राजकारण केलं, तो आला त्यानं फसवलं! हा आपला नागवा तो नागवाच. नेत्याचं नावही ठाऊक नसलेल्या दूरवरच्या एखाद्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कांदा-भाकरीची शिदोरी वळचणीला ठेवून उन्हातान्हात पायपीट करणारा. कधी लाठी खाऊन, तर कधी कर्जदार बँकेच्या दारातल्या चपराश्याची बोलणी खाऊन परतणारा. पण, पेकाटात लाथ हाणून हे वास्तव बदलण्याचे धाडस केले कुणी इथे? बड्या देशांनी गाडलेल्या खुंट्याला स्वत:हूनच आपल्या गळ्यातली दोरी बांधून घेत आलेत नेते आमचे. त्यांना इस्रायलच्या संघर्षाचे गोडवे गायला सवड झालीच कधी होती? तो तर काही लोकांनी हाणून पाडला डाव म्हणून, नाही तर पंडित नेहरू तर त्यांना आवडलेले रशियाचे कृषी मॉडेल भारतात राबवायला निघाले होते. नंतर त्याच देशात त्या कथित ‘यशस्वी’ मॉडलची वासलात लागल्याचे सार्या जगाने बघितले. अनुभवले. ते बोगस मॉडेल अंमलात न आणताही आमच्या देशातील कृषिव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. खरोखरीच त्याची अंमलबजावणी झाली असती, तर काय झालं असतं याची कल्पनाच केलेली बरी!
एकूण, मोदींच्या दौर्यानंतर भारतीयांना इस्रायलची महती काहीशा अधिक तीव्रतेने कळू आणि पटू लागली आहे. तो वैज्ञानिकांचा, संशोधकांचा देश तर आहेच, पण कृषिक्षेत्रातील त्याच्या प्रगतीचे निराळेपणही अधोरेखित करण्याजोगे आहे. योजनांच्या, भ्रष्टाचार आणि राजकारणविरहित अंमलबजावणीमुळेही ही प्रगती साधली गेली आहे. आजवर अपण मागे का राहिलो, याचा विचार करताना, भारतीय जनता इस्रायलचे हे वेगळेपणही नोंदवताहे
No comments:
Post a Comment